Saturday 16 May 2020

करोनाशी दोस्ती

बस झालं करोनाला घाबरणं. लस येईपर्यंत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणार आहे. आणि अशा बऱ्याच साथी येऊन गेल्या आहेत ज्यावर औषध सापडलं नाही आपण त्याच्या बरोबर जगणं शिकलो आहे. कुणास ठाऊक काही चांगल्या सवयी लागतील अन त्या प्रोसेस मध्ये बाकीचे आजार कमी होतील.

सोशल डिस्टंसिंग आणि जरा बरं वाटत नसेल तर गप घरी पडून राहणे हे कळीचे मुद्दे आहेत. त्याबरोबर पर्सनल हायजिन हे महत्वाचं असणार आहे.  लोकांना जास्त भेटाभेटीची भानगड नाही. घर-कामाची जागा-घर इथं फिजिकल अस्तित्व. बाकी सगळ्या गोष्टीवर तिलांजली. गर्दीच्या ठिकाणी तर नकोच नको. करोनाला थोडी कळतं, तुम्ही मंदिरात दर्शनाच्या लायनीत उभे आहेत की मॉल मध्ये गमजा मारताहेत.

आता शासनाने सुद्धा एक पेशंट सापडला तर तीन किमी चा एरिया सील करणं वगैरे भानगडी थांबवाव्या. त्या माणसाची फक्त चौकशी करून तो ज्यांना भेटला त्यांची टेस्ट करावी अन बाकी सोडून द्यावं. आभाळ फाटलं आहे, कुठं कुठं पळणार, पोलीस अन डॉक्टर लोक.

समाजाच्या लोकांनी सुद्धा जरा सद्सद्विवेक बुद्धी जागृत करावी. बिल्डिंग मध्ये एक करोना पेशंट सापडला सगळं संपलं असा आकांडतांडव करणं थांबवावं. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर वेळेस गुलाबाचं फुल द्यायचं आणि तोच कर्मचारी जर पॉझिटिव्ह आला तर त्याला बिल्डिंग मध्ये परवानगी नाकारायची हा दुटप्पीपणा थांबवावा.

उगं आपले पेशंटचे मोठमोठे आकडे बघून डोकं खराब करून घेऊ नये. बघायचेच असेल तर त्यातून बरे झालेल्या पेशंटचे आकडे बघा, मरणाऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त आहेत ते.

आपापल्या घरी परत जाणाऱ्या लोकांची काळजी घेऊ यात. विमानातून पुष्प वृष्टी छानच आहे. पण हेलिकॉप्टर मधून फूड पॅकेट्स या लोकांवर टाकायला पण बहुधा तितकाच खर्च येईल, नाही का? योग्य चॉईस करू यात.

चला, एका नवीन जीवन प्रणालीचा अंगीकार करू यात. कुणास ठाऊक करोनाशीच दोस्ती होईल.

आणि एकमेकांना मर्यादेपलीकडे दुखवायचं नाही हा दोस्तीचा नियम आहे.

No comments:

Post a Comment