Friday 1 May 2020

मुक्ती सोपान

आदरणीय मालती ताईंना सप्रेम नमस्कार

करोनाचे साम्राज्य सर्वत्र पसरले आणि वाटले "मुक्ती सोपान काय म्हणते?", कुंदा, माझी धाकटी बहीण कशी असेल म्हणून फोन केला आणि कळले की ती करंदीकर मॅडम कडे, म्हणजे तुमच्याकडे राहायला गेली आहे. जीव भांड्यात पडला. मी खरं तर तिची मोठी बहीण, पण तिला माझ्यापेक्षा तुमचाच आधार जास्त आहे. वेळोवेळी आपण तिच्यामागे सावली म्हणून उभ्या राहता याचे मनस्वी समाधान वाटते.

आमचे वडील कै श्री केशवराव डंक यांनी अनेक गरीब मुलांना आश्रय देऊन शिक्षण दिले. कित्येक गरिबांचे संसार उभे केले. या पार्श्वभूमीवर कुंदाला वृद्धाश्रमात ठेवताना खूप वाईट वाटत होते. तिला आपण कायम आपल्याबरोबर ठेवू शकत नाही या विचाराने मनाला यातना होत होत्या. पण आज ती आपल्या छत्र छायेखाली तिचं जीवन व्यतीत करते आहे यामागे आपला तर चांगुलपणा आहेच आणि वडिलांची पुण्याई सुद्धा आहे असं वाटते. अर्थात कुंदाने सुद्धा मनापासून तिथे काम करून सर्वांचे मन जिंकून घेतले. आलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या मार्गदर्शनाखाली ती व्यवस्थित राहते याचं समाधान मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

सांगायचं तर आम्हा सर्व बहिणीत ती सगळ्यात श्रीमंताघरी दिलेली. अत्यंत समृद्ध घर होतं तिचं. पण दुर्दैव तिचं, नशिबाचे वासे फिरले आणि ती अक्षरश: एकटी झाली. तिच्यावर अशी वेळ यावी हा काळाचा महिमा पण आपल्याकडे राहून आयुष्याच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्याला आकार मिळतोय हे पाहून मन भरून येतंय. आज ती आपल्याबरोबर राहून पुन्हा समृद्ध आयुष्य जगते आहे हे पाहून कृतार्थ वाटते.

बरेच दिवस आपल्याशी संवाद साधायचा होता. इतर काळात जगरहाटीमुळे आणि आपल्या कार्यमग्नतेमुळे ते शक्य झालं नाही. करोना मुळे आजकाल वेळ असतो, तेव्हा मनातले विचार शब्दबद्ध केले.

चि कुंदास अनेक आशीर्वाद. तुझी काळजी आता वाटत नाही कारण तुझ्यामागे समर्थ हात आहेत मालतीताईंचे. त्यांचा आधार हा मोलाचा. तू व्यवस्थित राहतेस, पण वडीलकीच्या नात्याने काळजी घे असं सांगावंसं वाटतं. बाकी ठीक. आमच्या सगळ्यांच्या तब्येती छान आहेत.

पुन्हा एकदा साऱ्यांना नमस्कार

कुमुद मंडलिक 

No comments:

Post a Comment