गानू सर आणि मी एकमेकांच्या मित्र यादीत कधी आणि कसे आलो हे लक्षात नाही. पण त्यांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट चांगलीच आठवते. २०१४ साली गानू सर गोव्यावरून त्यांच्या एका पुण्यातल्या मित्राला घेऊन डायरेक्ट सेटको मध्ये आले होते. मी नव्हतो कंपनीत पण सुदैवाने जवळच गेलो होतो. ते परत येतो म्हणून सांगून गेले आणि त्याप्रमाणे आलेही.
फेसबुकच्या ओळखीतून भेट हा एक त्या काळी एक औत्सुक्याचा विषय होता. त्यात गानू सरांच्या आणि माझ्या वयात १५ एक वर्षाचा फरक. बरं, दोघांचं फिल्ड वेगळं. ते अकौंटन्सी ची प्रॅक्टिस करणारे तर मी अभियांत्रिकी क्षेत्रातील. पण केवळ फेसबुकवरील पोस्ट वाचून आणि त्यात लिहिलेले व्यावसायिक सिद्धांत आवडले म्हणून कौतुक करण्यासाठी आवर्जून आलेले गानू सर माझ्यासाठी अप्रूप होते.
त्या भेटीनंतर असंख्य वेळा भेटी झाल्या. पण आभासी जगात झालेली ही मैत्री प्रत्यक्षात फुलण्यात मोठा सहभाग गानू सरांचा. जेव्हा कधी म्हणून ते पुण्यात आले त्यातील बहुतांश वेळा ते तर भेटलेच पण मी गोव्याला गेलो तेव्हा ही वाट वाकडी करून ते खास भेटण्यासाठी आले. माझं जे काही समाजसेवी संस्थांबरोबर काम आहे त्याचं नुसतं कौतुक न करता त्यात ते ऍक्टिव्ह पणे सहभागी झाले.
वयाच्या तिशी पर्यंत अगदी पक्के मुंबईकर असलेले गानू त्यानंतर हार्ड कोअर गोयंकर झाले. या सगळ्या प्रवासातील किश्यांचा त्यांच्या कडे खजिना आहे. आमचे फळणीकर सर आणि वैराळकर अण्णा यांच्या सारखं अगदी. या तिघांची गप्पांची मैफल जुळवून आणायची आहे. वाचनाची प्रचंड आवड असलेला हा माणूस हजारो पुस्तकं संग्रही बाळगून आहे. त्याबरोबरच जुन्या जाणत्या शास्त्रीय संगीताच्या गायक गायिकांबरोबरच नव्या युगाच्या लोकांचं गाणं आवडलं तर त्यांचं ते मनसोक्त कौतुक करतात. आणि तिसरी आवड ड्रायव्हिंग ची आणि पर्यायाने प्रवासाची. आता वयोपरत्वे बाहेर गावचं वाहन चालवणं कमी केलं तरी पाच एक वर्षांपूर्वी ते कार ने गोवा ते पुणे मुंबई करणाऱ्या गानू सरांनी जगभर भटकंती केली आहे.
ते भाजप चे खंदे समर्थक च नव्हे तर आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा. त्यांचा काही मित्रवर्ग कधी विरोधी राजकीय सूर लावतात (यात बऱ्याचदा मी पण असतो) तेव्हा ते खेद व्यक्त करतात पण राजकीय मतांतरे असली तरी सौम्य विरोधापलीकडे ते फार व्यक्त होत नाहीत.
या माध्यमातून माझी अनेक जणांशी प्रत्यक्ष अनेक जणांशी चांगली मैत्री झाली त्यापैकी गानू सर एक. मागच्या आठवड्यात एका कॉन्फरन्स च्या निमित्ताने गोव्याला जाणं झालं मग गानू सरांना भेटणं हे स्वाभाविक होतं, त्या प्रमाणे भेटलो सुद्धा. त्यांच्याशी बोलताना ते मुंबई सोडून गोव्याला का आले याबद्दल मला जे समज आहे त्याला पुष्टी देणारं उत्तर यावं म्हणून खोदून विचारलं. पण त्यांनी त्याला शिताफीने टाळलं. पण गोव्यात आज जी बीजेपी ची सत्ता आहे तो येण्यामागे गानू सरांसारख्या पडद्यामागचा कलाकारांचा मोठा हात आहे असं मी मानतो.
गानू सरांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
No comments:
Post a Comment