Friday, 31 July 2026

आमच्या मातोश्री पैसे खर्च करण्याबाबतीत तशा सढळ हाताच्या. नातू, आम्ही मुलं, सुना वगैरेंना वाढदिवशी किंवा नातवांना  परीक्षेत चांगले मार्क पडले, कुठल्या वास्तुशांती वेळी सटासट पाकीट वाटते. जवळच्या नातेवाईकांना कधी गरज पडली की पैसे काढून देते. 

पण असं असलं तरी एका बाबतीत तिला पैसे खर्च झालेले अजिबात आवडत नाही. ते म्हणजे सिटी मध्ये कुठे जायचं असेल तर तिला रिक्षा किंवा कॅब वर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. ते वाचवण्यासाठी ती कुठलाही आटापिटा करू शकते. म्हणजे आमच्या घरापासून (फातिमानगर) तिला रावेत ला जायचं असेल तर ती मला म्हणते की ड्रायव्हर आधी तुला सोडेल सिंहगड रोड ला आणि मग मला रावेत ला सोडून येईल. मी तिला सांगतो की माझ्या बरोबर कंपनीत येई पर्यंत तू घरून रावेतला पोहोचशील. मी तुला कॅब करून देतो. (त्याचे पैसे पण मीच भरणार असतो खरंतर). पण तिचा तोच हट्ट असतो. कॅब नको, तुला सोडल्यावर ड्रायव्हर मला सोडून येईल. मी तिला हे पण सांगतो की कंपनीतून रावेतला सोडून यायला कारचं जितक्या रुपयाचं पेट्रोल लागतं, तितकेच पैसे कॅब साठी आपल्या घरापासून रावेत साठी लागतात. पण तिला हे गणित काही केल्या कळत नाही. समहाऊ तिच्या डोक्यात ते सिटीबस चे दहा आणि पंधरा रुपयांचे तिकीट फिक्स आहेत. त्यावर ती सिटी अंतर्गत पैसे खर्च करायला नाहीच म्हणते. मी पण आता या विषयावर डोकेफोड करणं बंद केलं आहे. 

इतके दिवस मला वाटत होतं की हा प्रकार फक्त सिटी अंतर्गत प्रवासासाठी आहे. पण नुकताच मला अजून एका गोष्टीवर पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येतं हे जाणवलं. ते म्हणजे औषधं. सुदैवाने माझ्या आईची तब्येत ठणठणीत असते. फक्त आता वयोपरत्वे छोटी मोठी आजारपणं उद्भवतात. सगळ्यात आधी तर तिला डॉक्टरकडे यायचंच नसतं. "मला म्हातारीला काय धाड भरली आहे?" हे पालुपद सारखं चालू असतं. आता काही कारणासाठी तिला अक्षरश: भांडण करून डॉक्टर कडे नेलं आणि त्याने ज्या काही भरमसाठ टेस्ट सांगितल्या, त्या प्रत्येक टेस्ट करताना "या डॉक्टर ला काही कळतच नाही. इतक्या कुठं टेस्ट असतात का साध्या आजारासाठी?" हे वाक्य प्रत्येक अर्ध्या तासाने ती म्हणत होती. तब्येतीला काही झालं याच्या कम्प्लिट डिनायल मोड मध्ये. सर्व टेस्ट आणि तपासण्या झाल्यावर आणि त्यातही त्याचे चार्जेस कळल्यावर, जे मी सांगणं टाळत होतो, तिने मला ठणकावून सांगितलं. "यापुढे काहीही झालं तरी  ते आपल्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जायचं." परवा त्या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे फॉलो अप साठी गेलो होतो आणि त्याने दोन महिन्याने परत बोलावलं तर त्यालाच ऐकवलं "टेस्ट सांगणार नसाल तर येते" नशीब त्या स्पेशालिस्ट डॉक्टर च्या औषधांनी तिला थोडा आराम पडला नाहीतर माझं तिने परत कधीच ऐकलं नसतं. त्याबद्दल डॉक्टर चे आभारच मानायला हवेत. 

इथे खुर्चीत बसल्या बसल्या हात वर केला आणि छातीत थोडी कळ आली की घाबरणाऱ्या माझ्यासारख्याची आई तब्येतीच्या बाबतीत इतकी डेअर डेव्हील कशी काय हे एक मला कोडंच पडलं आहे.

Saturday, 25 July 2026

१९९७-९८ ची गोष्ट आहे. मी पवई साकी नाका रोड वर एक कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ज्यांना भेटायचं ते मीटिंग मध्ये होते म्हणून रिसेप्शन ला बसलो होतो. तितक्यात तिथली एक मुलगी, बहुधा रिसेप्शनिस्ट, तणतणत ऑफिस मधून बाहेर आली.  समोरून एक दुसरी मुलगी आली आणि तिने रिसेप्शनिस्ट ला नजरेनेच विचारलं की काय झालं. तर रिसेप्शनिस्ट ने मधलं बोट दाखवून सांगितलं की वाट लागली. तर समोरून आलेली मुलगी म्हणाली "आता परत काही काम सांगितलं ना त्या भाड्याने तर बांबू सर त्याच्यात". 

पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटलं तरी मला बॉस ने काय काम सांगितलं, त्याचा स्वभाव कसा आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जजमेंटल न होता मी आपलं मासिक वाचत बसलो. अर्थात मी पण तेव्हा तिशीत होतो आणि त्या मुलीही समवयीन होत्या. त्यानंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा हे ही लक्षात आलं की तरुणाईची जडणघडण तुमच्या भावतालावर अवलंबून असते. एक काळ होता, पॉलिटेक्निक पासून ते अगदी एस के एफ सोडेपर्यंत वाक्य सुरुवात करताना किंवा संपवताना शिवी यायचीच. आजूबाजूचा माहोलच तसा होता की आपण काही वावगं बोलतो आहे असं वाटायचं नाही. मग हळूहळू भवताल बदलत गेला, घरात मूल जन्माला आलं आणि भाषा बदलत गेली. आता शिवी द्यायची म्हंटलं तरी तोंडातून शब्द फुटत नाही. 

हे आठवण्याचं कारण म्हणजे आताच्या आंदोलनातील जेन झी ची भाषा.लोक असं बोलत होते जणू ही तरुणाई कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरून आली होती. अरे, ही आपलीच पोरं होती. ते ज्या भवतालात मोठी झाली तो एक समाज म्हणून आपणच बनवला आहे. तुम्हीच त्यांना घडवलं आहे. ही तीच तरुणाई आहे ज्यांचा जन्म इंटरनेट च्या काळात झाला आहे. सोशल मीडियावर बोलली जाणारी भाषा, ओ टी टी वर सरसकट ऐकल्या जाणाऱ्या शिव्या हे स्वीकारलं गेलं आहे. आताच ज्या पिक्चरची भरमसाठ स्तुती झाली त्या धुरंधर चे डायलॉग्ज सहकुटुंब सहपरिवार आपण ऐकले आणि त्यावर टाळ्या पण पिटल्या. माझ्या पिढीने जे सामाजिक वातावरण तयार केलं तिथेच आजच्या तरुणाईची भाषा पण रुजली, इतर वेळेस आपण स्वीकारली. जेव्हा आता ज्या सरकारची भलामण करतो त्याच्या विरुद्ध वापरली गेली तेव्हा मात्र आपल्याला टोचली.  

हे झालं भाषेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणाईचा जन्म झाला आणि गेल्या बारा वर्षातील निवडणुकीत ते फर्स्ट टाइम व्होटर झाले होते. बी जे पी ला भरभरून मतं दिली होती. तेव्हा त्यांचं वागणं गोड वाटलं होतं. २०१४ च्या विजयानंतर अनेक आघाडीवर भ्रम निरस झाला तेव्हा प्रतिवाद होता की साठ वर्षाची घाण आहे, थोडा वेळ तर लागणारच. असं म्हणता म्हणता बारा वर्षे झाली. एका तपा नंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं की समाजाचं क्वालिटी ऑफ लाईफ हे सुधारणे तर दूरच पण खालावत चाललं आहे, लॉ अँड ऑर्डर चा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय, रस्ते/पाणी/स्वच्छता/वीज/शिक्षण यात सुधारणा करण्याऐवजी इतकी ब्रूट मेजोरीटी असूनही अजूनही सरकार चालवणारा पक्ष धार्मिक ध्रुवीकरण आणि मंदिर यातच मश्गुल आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात सुधारणा होण्याचे दूरवर चिन्ह दिसत नाही आहे. ज्या भ्रष्टचाराचा मुद्दा घेऊन सत्ता कमावली तो तर तसाच आहे, बारा वर्षांपूर्वी सोन्याची चेन घालून नेत्यांचे पोस्टर दिसायचे ते तर आजही दिसत आहेत, गावातल्या ट्राफिक ची कंडिशन अजून भीषण झाली आहे. 

हे मान्य आहे की या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे आणि बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्या संधीचं सोनं करण्यासाठीची मानसिकता, इको सिस्टम, सोशल फॅब्रिक नसेल तर जितक्या वेगाने या संधी आल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या नाहीशा होण्याची शक्यता आहे. 

नशीब हे की तरुणाई आज निर्नायकी होती, असंघटित होती. स्ट्रक्चर्ड अप्रोच असला असता तर काय झालं असता याचा विचार करावा. 

Sunday, 19 July 2026

मागच्याच महिन्यात अमेरिकेत स्पेस एक्स चा आय पी ओ आला आणि एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत तर होताच पण त्याबरोबर तो पहिला ट्रिलियनेअर झाला. त्याच वेळेस भारतात अगदी त्या तोडीची नाही पण तितक्याच महत्वाची एक गोष्ट घडत होती. 

आय आय टी खरगपूर आणि आय आय टी मद्रास मधून ड्युअल डिग्री घेऊन बाहेर पडलेले आणि नंतर इस्रो मध्ये आपली उमेदीची सहा एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या पवनकुमार चंदना आणि नागभारत डोका यांनी स्कायरूट एरोस्पेस या अभिनव उद्योगाची हैद्राबाद मध्ये २०१८ साली स्थापना केली. अवकाश ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी न राहता आम जनतेला त्यातून मिळणारे फायदे मिळावेत या उद्देशाने या दोन अत्यंत ध्येयवेड्या अभियंत्यांनी काम चालू केलं. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे दोन अर्ध्वयु विक्रम साराभाई आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारख्या दिग्गजांची लिगसी ला पुढे नेत त्यांनी धाडसी स्पेस प्रॉडक्ट्स आपल्या अभिनव कल्पनेतून त्यांनी साकार केले. 

१८ जुलै २०२६ ला त्यांनी "मिशन आगमन" या प्रोजेक्टद्वारे विक्रम १ नावाचं रॉकेट श्रीहरिकोटा या स्पेस सेंटर वरून अवकाशात झेपावलं. स्पेस कार्यक्रम हे अनेक देशांमध्ये आजही सरकारी माध्यमातून राबवले जातात. त्यात असणारे अवाढव्य खर्च आणि गोपनीयता यामुळे ते साहजिकच आहे. पण सरकारी संस्था बरोबर खाजगिकरणातून असे प्रोजेक्ट यशस्वी करता येतात हे अमेरिका आणि चीन पाठोपाठ भारताने दाखवून दिले आहे. 

स्कायरुट ही एक अजब सक्सेस स्टोरी आहे. १००० लोक काम करणाऱ्या या कंपनीत सरासरी वय फक्त २८ आहे. या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि अवघड प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवले यात चंदना आणि डोका यांची नेतृत्व गुणांची प्रचिती येते. आधीच्या अनेक चांद्रयान आणि मंगल यान प्रोजेक्ट प्रमाणे इथेही कमी प्रोजेक्ट कॉस्ट आणि विक्रमी वेळेत हा प्रकल्प स्कायरुटने पूर्ण केला. रु १००० कोटी फंडिंग मिळवणाऱ्या स्कायरुट चं व्हॅल्यूएशन रु दहा हजार कोटीपर्यंत पोहचले आहे. हे दोन संस्थापक आणि स्कायरुट सर्व तरुण एम्प्लॉईज हे अभिनंदनास पात्र आहेत. 

याबद्दल वाचताना इन्स्पेस या भारतीय शासन प्रणित स्वायत्त संस्थेबाबत पण कळलं. भारतीय खाजगी उद्योगांना एरोस्पेस क्षेत्राची दरवाजे उघडे करून देण्यासाठी या नोडल एजन्सीची स्थापना झाली. हे ही वाचून आनंद झाला की त्याचे अध्यक्ष मा पवनकुमार गोएंका आहेत. भारताची वाहन क्षेत्रातील अग्रणी कंपनी महिंद्रा चा कायापालट करण्यात गोएंका साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेस संस्था नवनवीन आयाम प्रस्थापित करेल यात शंका नाही.

भारतात अनेक सन राईज उद्योग उदयाला येत आहेत. एरोस्पेस हे येणाऱ्या काळात अग्रणी असणार आहे, हे आता सिद्ध झाले आहे. 

(संदर्भ: न्यूजपेपर्स, स्कायरुट यांची वेबसाईट, फाउंडर्स चे लिंक्ड इन प्रोफाईल्स)