१९९७-९८ ची गोष्ट आहे. मी पवई साकी नाका रोड वर एक कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. ज्यांना भेटायचं ते मीटिंग मध्ये होते म्हणून रिसेप्शन ला बसलो होतो. तितक्यात तिथली एक मुलगी, बहुधा रिसेप्शनिस्ट, तणतणत ऑफिस मधून बाहेर आली. समोरून एक दुसरी मुलगी आली आणि तिने रिसेप्शनिस्ट ला नजरेनेच विचारलं की काय झालं. तर रिसेप्शनिस्ट ने मधलं बोट दाखवून सांगितलं की वाट लागली. तर समोरून आलेली मुलगी म्हणाली "आता परत काही काम सांगितलं ना त्या भाड्याने तर बांबू सर त्याच्यात".
पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटलं तरी मला बॉस ने काय काम सांगितलं, त्याचा स्वभाव कसा आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जजमेंटल न होता मी आपलं मासिक वाचत बसलो. अर्थात मी पण तेव्हा तिशीत होतो आणि त्या मुलीही समवयीन होत्या. त्यानंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा हे ही लक्षात आलं की तरुणाईची जडणघडण तुमच्या भावतालावर अवलंबून असते. एक काळ होता, पॉलिटेक्निक पासून ते अगदी एस के एफ सोडेपर्यंत वाक्य सुरुवात करताना किंवा संपवताना शिवी यायचीच. आजूबाजूचा माहोलच तसा होता की आपण काही वावगं बोलतो आहे असं वाटायचं नाही. मग हळूहळू भवताल बदलत गेला, घरात मूल जन्माला आलं आणि भाषा बदलत गेली. आता शिवी द्यायची म्हंटलं तरी तोंडातून शब्द फुटत नाही.
हे आठवण्याचं कारण म्हणजे आताच्या आंदोलनातील जेन झी ची भाषा.लोक असं बोलत होते जणू ही तरुणाई कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरून आली होती. अरे, ही आपलीच पोरं होती. ते ज्या भवतालात मोठी झाली तो एक समाज म्हणून आपणच बनवला आहे. तुम्हीच त्यांना घडवलं आहे. ही तीच तरुणाई आहे ज्यांचा जन्म इंटरनेट च्या काळात झाला आहे. सोशल मीडियावर बोलली जाणारी भाषा, ओ टी टी वर सरसकट ऐकल्या जाणाऱ्या शिव्या हे स्वीकारलं गेलं आहे. आताच ज्या पिक्चरची भरमसाठ स्तुती झाली त्या धुरंधर चे डायलॉग्ज सहकुटुंब सहपरिवार आपण ऐकले आणि त्यावर टाळ्या पण पिटल्या. माझ्या पिढीने जे सामाजिक वातावरण तयार केलं तिथेच आजच्या तरुणाईची भाषा पण रुजली, इतर वेळेस आपण स्वीकारली. जेव्हा आता ज्या सरकारची भलामण करतो त्याच्या विरुद्ध वापरली गेली तेव्हा मात्र आपल्याला टोचली.
हे झालं भाषेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणाईचा जन्म झाला आणि गेल्या बारा वर्षातील निवडणुकीत ते फर्स्ट टाइम व्होटर झाले होते. बी जे पी ला भरभरून मतं दिली होती. तेव्हा त्यांचं वागणं गोड वाटलं होतं. २०१४ च्या विजयानंतर अनेक आघाडीवर भ्रम निरस झाला तेव्हा प्रतिवाद होता की साठ वर्षाची घाण आहे, थोडा वेळ तर लागणारच. असं म्हणता म्हणता बारा वर्षे झाली. एका तपा नंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं की समाजाचं क्वालिटी ऑफ लाईफ हे सुधारणे तर दूरच पण खालावत चाललं आहे, लॉ अँड ऑर्डर चा बट्ट्याबोळ झालेला दिसतोय, रस्ते/पाणी/स्वच्छता/वीज/शिक्षण यात सुधारणा करण्याऐवजी इतकी ब्रूट मेजोरीटी असूनही अजूनही सरकार चालवणारा पक्ष धार्मिक ध्रुवीकरण आणि मंदिर यातच मश्गुल आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात सुधारणा होण्याचे दूरवर चिन्ह दिसत नाही आहे. ज्या भ्रष्टचाराचा मुद्दा घेऊन सत्ता कमावली तो तर तसाच आहे, बारा वर्षांपूर्वी सोन्याची चेन घालून नेत्यांचे पोस्टर दिसायचे ते तर आजही दिसत आहेत, गावातल्या ट्राफिक ची कंडिशन अजून भीषण झाली आहे.
हे मान्य आहे की या सरकारच्या ध्येय धोरणांमुळे आणि बदलत्या भू राजकीय परिस्थितीमुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पण त्या संधीचं सोनं करण्यासाठीची मानसिकता, इको सिस्टम, सोशल फॅब्रिक नसेल तर जितक्या वेगाने या संधी आल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या नाहीशा होण्याची शक्यता आहे.
नशीब हे की तरुणाई आज निर्नायकी होती, असंघटित होती. स्ट्रक्चर्ड अप्रोच असला असता तर काय झालं असता याचा विचार करावा.
No comments:
Post a Comment