Sunday, 19 July 2026

मागच्याच महिन्यात अमेरिकेत स्पेस एक्स चा आय पी ओ आला आणि एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत तर होताच पण त्याबरोबर तो पहिला ट्रिलियनेअर झाला. त्याच वेळेस भारतात अगदी त्या तोडीची नाही पण तितक्याच महत्वाची एक गोष्ट घडत होती. 

आय आय टी खरगपूर आणि आय आय टी मद्रास मधून ड्युअल डिग्री घेऊन बाहेर पडलेले आणि नंतर इस्रो मध्ये आपली उमेदीची सहा एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या पवनकुमार चंदना आणि नागभारत डोका यांनी स्कायरूट एरोस्पेस या अभिनव उद्योगाची हैद्राबाद मध्ये २०१८ साली स्थापना केली. अवकाश ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी न राहता आम जनतेला त्यातून मिळणारे फायदे मिळावेत या उद्देशाने या दोन अत्यंत ध्येयवेड्या अभियंत्यांनी काम चालू केलं. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे दोन अर्ध्वयु विक्रम साराभाई आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारख्या दिग्गजांची लिगसी ला पुढे नेत त्यांनी धाडसी स्पेस प्रॉडक्ट्स आपल्या अभिनव कल्पनेतून त्यांनी साकार केले. 

१८ जुलै २०२६ ला त्यांनी "मिशन आगमन" या प्रोजेक्टद्वारे विक्रम १ नावाचं रॉकेट श्रीहरिकोटा या स्पेस सेंटर वरून अवकाशात झेपावलं. स्पेस कार्यक्रम हे अनेक देशांमध्ये आजही सरकारी माध्यमातून राबवले जातात. त्यात असणारे अवाढव्य खर्च आणि गोपनीयता यामुळे ते साहजिकच आहे. पण सरकारी संस्था बरोबर खाजगिकरणातून असे प्रोजेक्ट यशस्वी करता येतात हे अमेरिका आणि चीन पाठोपाठ भारताने दाखवून दिले आहे. 

स्कायरुट ही एक अजब सक्सेस स्टोरी आहे. १००० लोक काम करणाऱ्या या कंपनीत सरासरी वय फक्त २८ आहे. या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आणि अवघड प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवले यात चंदना आणि डोका यांची नेतृत्व गुणांची प्रचिती येते. आधीच्या अनेक चांद्रयान आणि मंगल यान प्रोजेक्ट प्रमाणे इथेही कमी प्रोजेक्ट कॉस्ट आणि विक्रमी वेळेत हा प्रकल्प स्कायरुटने पूर्ण केला. रु १००० कोटी फंडिंग मिळवणाऱ्या स्कायरुट चं व्हॅल्यूएशन रु दहा हजार कोटीपर्यंत पोहचले आहे. हे दोन संस्थापक आणि स्कायरुट सर्व तरुण एम्प्लॉईज हे अभिनंदनास पात्र आहेत. 

याबद्दल वाचताना इन्स्पेस या भारतीय शासन प्रणित स्वायत्त संस्थेबाबत पण कळलं. भारतीय खाजगी उद्योगांना एरोस्पेस क्षेत्राची दरवाजे उघडे करून देण्यासाठी या नोडल एजन्सीची स्थापना झाली. हे ही वाचून आनंद झाला की त्याचे अध्यक्ष मा पवनकुमार गोएंका आहेत. भारताची वाहन क्षेत्रातील अग्रणी कंपनी महिंद्रा चा कायापालट करण्यात गोएंका साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेस संस्था नवनवीन आयाम प्रस्थापित करेल यात शंका नाही.

भारतात अनेक सन राईज उद्योग उदयाला येत आहेत. एरोस्पेस हे येणाऱ्या काळात अग्रणी असणार आहे, हे आता सिद्ध झाले आहे. 

(संदर्भ: न्यूजपेपर्स, स्कायरुट यांची वेबसाईट, फाउंडर्स चे लिंक्ड इन प्रोफाईल्स) 


No comments:

Post a Comment