काही वर्षांपूर्वी मला एक जण अप्रोच झाले की उद्योजकतेवर ऑन लाईन बोलायचं होतं. त्यांचा फेसबुकवर ग्रुप होता, असेलही अजून. आणि तो जातीवरून ग्रुप बनवला होता. उद्योजकतेवर बोलायचं होतं, त्यामुळे मी नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. तर आयोजकांनी मला सांगितलं की मला त्या ग्रुपचा मेंबर बनावं लागेल. मी त्यांना म्हणालो की मी कुठल्याच ग्रुप चा मेंबर नाही आहे. ते म्हणाले, मेंबर तर व्हावं लागेल. मी त्यांना खरं कारण सांगितलं की तुमचा ग्रुप एका विशिष्ट जातीच्या लोकांसाठी बनला आहे आणि माझी जात ती नाही आहे. तर ग्रुप चा मेंबर झालेलं चालेल का तुम्हाला? तर फोन वर एकदम शांतता पसरली. मग ते म्हणाले की ऑनलाइन सेशन होईपर्यंत मेंबर रहा आणि नंतर ग्रुप सोडला तरी चालेल. मी अजून एक प्रश्न विचारला की मी तुमच्या जातीचा नाही आहे, तर तुमच्या ऑडियन्स ला चालेल ना मी बोललेलं. त्यांनी होकार दिल्यावर मग मी ग्रुप चा मेंबर झालो आणि ऑनलाइन सेशन पार पडलं.
सेशन झाल्यावर मी काही दिवस ग्रुप चा मेंबर होतो. तिथल्या अनेक पोस्ट पाहिल्या. जात निर्मूलन व्हायला पाहिजे अशा इथे डिंग्या मारणारे अनेक जण तिथं मेंबर होते. ज्या पोस्ट्स वरून इतर जातींची ते टिंगल उडवतात त्या धर्तीच्या अनेक पोस्ट मी त्या ग्रुप वर पाहिल्या. त्याला समर्थन देणारी लोक बघून आश्चर्य पण वाटलं. काही दिवसांनी मनोरंजन बोअर झाल्यावर मी तो ग्रुप सोडला.
माझे एक आडनाव बंधू खास कंपनीत भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. या ना त्या मार्गाने ते शोधत होते की माझी आणि त्यांची जात सेम आहे का ते. शेवटी रिव्हील झालं की ती वेगळी आहे. ते निराश होऊन निरोप घेऊन गेले. नंतर त्यांनी मला फ्रेंड लिस्ट मधून पण उडवलं.
मध्ये मी माझ्या पुतण्याबद्दल एक पोस्ट टाकली होती. पोस्ट कसली, तो लग्नाचा उमेदवार आहे हे जाहीरच केलं होतं. ते वाचून एका मुलीच्या आईचा मेसेज आला की त्यांची मुलगी लग्नाची आहे आणि आडनावावरून आम्ही त्यांच्या जातीचा आहे असं वाटतंय, म्हणून मेसेज केला. मी त्यांना सांगितलं की आम्ही त्या जातीचे नाही आहोत, पण आंतरजातीय लग्नाची तयारी आहे. अच्छा म्हणून त्या गायब झाल्या. 😊 आता चेक केलं तर त्या पण लिस्ट मध्ये नाही आहेत.
जात केंद्रस्थानी न ठेवता प्रत्यक्ष जीवनात जगणं सहज शक्य आहे. सोशल मीडियावर मात्र थोडं अवघडच जातं.
No comments:
Post a Comment