Monday, 5 October 2026

मधली ३ वर्षे मी एका सोसायटीत राहिलो होतो. मस्त एका बिल्डिंगची सोसायटी होती. दोन विंग्ज मिळून तीस एक फ्लॅट होते. खालच्या मजल्यावर एक पराग म्हणून इंटरेस्टिंग माणूस राहायचा. पराग त्याचं नाव. एका टेलिकॉम कंपनीतून त्याने पन्नशीच्या आतच व्हीआरएस घेतली होती. मोठा हरफनमौला होता पराग. अनेक क्षेत्रात त्याची मुशाफिरी होती. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता, एकांकिका लिहायचा, चांगला चित्रकार होता, आवाज कधी कसलेला नसला तरी श्रवणीय होता, अनेक वाद्य वाजवायचा, त्यातही तबल्यावर त्याची चांगलीच हुकूमत होती. व्यवसायाने अभियंता असला तरी कलेचं कुठलंही क्षेत्र त्याला वर्ज्य नव्हतं. त्याची बायको एका कॉलेज मध्ये प्राध्यापिका होती. आणि एकुलती एक मुलगी होती. तीपण अभ्यासात हुशार वगैरे. 

व्हीआरएस घेतल्यावर पराग पुण्यातील एकही सांस्कृतिक कार्यक्रम चुकवायचा नाही. तो आणि त्याची बायको शलाका, बालगंधर्व, पंडित फार्म, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, एस एम जोशी इकडे दर्जेदार कार्यक्रमाला दिसायचेच. पराग चं रुळे गावाजवळ एक फार्म हाऊस होतं. तिथं तो मित्र मंडळींना घेऊन मस्त गाण्याच्या, कवितेच्या वगैरे मैफिली जमवायचा. एकंदरीत एखाद्याला हेवा वाटावं असं आयुष्य होतं परागचं. तो काही एच एन आय वगैरे नव्हता. पण पैशाचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून त्याने चांगलं सेव्हिंग्ज करून ठेवलं होतं. वर परत तो सोसायटीचं काम पण करायचा. आणि शलाकाची नोकरी चालूच होती. 

छंद म्हणून तो आमच्या भागातल्या पोरांना अगदी अल्पदरात तबला शिकवायचा. दोनच बॅच. एक सकाळी सात ते आठ, दुसरी संध्याकाळी सहा ते सात. साहजिक आहे. 

परागच्या खालच्या मजल्यावर एक दीपक म्हणून राहायचा. चाकण च्या एका मल्टी नॅशनल मध्ये जनरल मॅनेजर होता. चाकण ते पुण्यातील घर ये जा केल्यामुळे की कुणास ठाऊक पण हा दीपक कायम कावलेला असायचा.  सोसायटीतल्या अनेक लोकांबद्दल त्याला वीस वर्षे राहून सुद्धा काही तक्रार असायची. दोन चार त्याच्यासारख्या त्रस्त समंधांना घेऊन इतर लोकांच्या कागाळ्या करणे हा दिपकचा आवडता छंद होता. मल्टी नॅशनल कंपनीत जनरल मॅनेजर असूनसुद्धा इतक्या कोत्या मनोवृत्तीचा हा कसा काय असा मला नेहमीच प्रश्न पडायचा. 

त्यातही परागवर, दीपक विशेष खार खाऊन होता. काय कारण होतं माहित नाही, पण चार दिवस गेले आणि त्याने परागची काही तक्रार केली नाही असं व्हायचं नाही. त्यासाठी कुठलंही कारण पुरायचं. पण त्यातही सगळ्यात आवडतं कारण म्हणजे तबला क्लास ला येणारी मुलं. त्यांचा किलबिलाट, लिफ्टचा वापर, पॅसेज मध्ये असणाऱ्या चपला, तबल्याचा आवाज असं काही न काही कारण घेऊन दीपक सोसायटीतल्या भेटेल त्याला तक्रार करायचा. वर पराग सोसायटी चं काम करत असल्यामुळे तर दीपक ला चान्स च मिळायचा. आमच्या विंग मध्ये परागच्या तबला क्लास ला कुणाचा विरोध नव्हता. सोसायटी मधीलच चार पोरं त्याच्याकडे शिकायला जायची. 

गंमत म्हणजे पराग दीपक ला हिंग लावून विचारायचा नाही. आपण बरं अन आपलं काम बरं या न्यायाने हसतमुख चेहऱ्याने लाईफ एन्जॉय करत होता. दीपक मात्र आपण शहणपणाच्या गोष्टी करण्याच्या अविर्भावात मूर्खासारखा वागत राहिला. 

पुढं मी ती सोसायटी सोडली. जाताना मी परागला विचारलं सुद्धा की तुला दिपकच्या वागण्याचा राग येत नाही का? पराग म्हणाला की "येतो की पण थोडाच वेळ. मी जे करतो आहे ते प्रामाणिक पणे करतो. दिपकच्या बोलण्याने न माझ्या अंगाला भोक पडतं आणि बाकी सगळ्यांचा विश्वास असल्याने कामात न काही अडथळा येतो. त्यामुळे त्याचा मूर्खपणा त्याने बाळगावा, माझ्याकडे आहे ते मी सांभाळतो"

नंतरच्या आयुष्यात मला दीपक तर अनेक भेटले पण पराग मात्र एखादाच.