काही मित्र मॅरेथॉन पाळतात, तर कुणी आयर्न मॅन बनतं, एखादा कुणी हिमालयन ट्रेक चा फोटो टाकतं (एव्हरेस्ट बेस कॅम्प), तर कुणी स्काय डायव्हिंग करतं. एखादा चुलत भाऊ खिद्रेश्वर, हम्पी पासून ते अंगकोर पर्यंत सगळी देवळं पालथी घालतो, तर एखादी बहीण तोफे सारखा कॅमेरा घेऊन वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनते. एखादी मैत्रीण वयाच्या पन्नाशीला गिटार शिकते, तर मित्र अचानक बालीच्या समुद्र किनाऱ्यावर योग करताना दिसतो. ओह! गिव मी या ब्रेक.
सोशल मीडिया उघडावं आणि वाटतं की सगळे कसलं भारी आयुष्य जगत आहेत. मी तर बघूनच डिप्रेस होऊन जातो.
आणि कळत न कळत मनात विचार येतो, माझं काही चुकत तर नाही ना? मग वाटतं
अगदीच काही नाहीतर गेला बाजार भूतान ट्रिप तरी करू या का? हिमालय नाही तर के टू एस तरी जमवू का? मॅरेथॉन नाही तर रेसकोर्स ला पाच चक्कर पळू का? लहानपणी तबल्याच्या क्लास लावला होता, तो छंद परत करून बघू का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड खूप छान आहे असं ऐकलं आहे. प्लॅन करू का? जग ज्याची दखल घेईल अशी कोणती तरी गोष्ट आपल्या हातून घडेल का?
यादी वाढत जाते. अन मनात प्रश्न येतो, कुठून घुसलं हे मनात की असं काही केलं तरच भारी आयुष्य जगल्याची भावना तयार होईल?
कधी एखादा मित्र म्हणतो "कुणी सांगितलं सकाळी चार वाजता उठून वाघ बघत फिरायचं?" तर दुसऱ्या मित्राला वाटतं की ताडोबा किंवा रणथंबोर माझं आयुष्य आहे. दोघेही बरोबरच आहेत.
कदाचित एक शाश्वत सत्य आपण विसरत चाललो आहोत. मानव प्रजात ही एकाच गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी जन्माला आली नाही आहे. कुणाला काही अचाट करण्याची इच्छा असते, तर कुणाला ध्यानधारणा, कुणाला डोंगरात साद घालत फिरण्याची मनीषा असते तर कुणाला समुद्राची गाज ऐकत शांतते शी हितगुज करायला आवडतं, काहींना परदेश भावतो तर काहींना गावाकडे जाऊन विहिरीत पोहायला.आणि काहींची आनंदाची परमावधी घरात कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यात असते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे आनंदानुभव घेणं हा त्याचं प्रदर्शन मांडण्यापेक्षा जास्त किमती असू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे.
मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्यांच्या बालपणी आनंदाच्या व्याख्या फार साध्या सरळ सोप्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फॉरेन किंवा काश्मीर ट्रिप नसायची तर कुठल्या तरी काका किंवा मामाकडे मुक्काम असायचा, टीव्ही किंवा थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघणे म्हणजे आनंदाची परमावधी, बाहेर जाऊन आईस्क्रीम खाणे म्हणजे एक सोहळा असायचा. अशा छोट्या गोष्टींमध्ये उत्सुकता असायची, अप्रूप असायचं कारण त्या दुर्मिळ होत्या.
आता या गोष्टी होलसेल मध्ये उपलब्ध आहेत.
कुठेही आणि कधीही फिरायला जाण्यासाठी अगणित पर्याय, अगणित करमणूक, अगणित माहितीचे स्रोत, अगणित अनुभव.
इथे खरी मेख आहे. कोणत्याही गोष्टीचे अगणित पर्याय हा मानसिक थकवा आणतो. पर्यायांचा भडिमार म्हणजे असंख्य शक्यता. आणि या सगळ्या प्रकारात समाधानाऐवजी उरते ती चिंता, काळजी.
यात गंमत अशी आहे की एकदा आपण हे सगळं करू शकतं अशी मनात भावना तयार झाली की या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला जबाबदार ठरवू लागतो. पण कुठलाही माणूस सगळ्याच गोष्टी करू शकत नाही.
कुणी जगातले सर्व देश बघू शकत नाही.
कुणी सर्व कला शिकू शकत नाही.
कुणी सर्व खेळ शिकू शकत नाही.
कुणी सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकत नाही.
कुणी जगातील सर्व आश्चर्य बघू शकत नाही.
कुणी आयुष्य परिपूर्ण जगू शकत नाही.
म्हणून मी बकेट लिस्ट या कल्पनेच्या विरोधात आहे. अँटी बकेट लिस्ट.
आणि अँटी बकेट लिस्ट म्हणजे निराशावादी नव्हे, आळशीपणा पण नव्हे आणि कमी महत्वाकांक्षी असंही नव्हे. तर ती मुक्ततेची भावना आहे. अँटी बकेट लिस्ट म्हणजे सजगपणे हे ठरवणं आहे की मला समाधानी वाटण्यासाठी काय नाही केलं तर चालेल.
मला त्या अनुभवांच्या पाठीमागे नाही धावायचं आहे. मला त्या अपेक्षाच ठेवायच्या नाही आहेत. माझं आयुष्य तुलना करण्यापासून मुक्त असणार आहे.
कदाचित माझी अँटी बकेट लिस्ट मध्ये असेल
- मला मॅरेथॉन धावणं गरजेचं नाही आहे
- पन्नास देशांना भेट देणं हे माझ्यासाठी गरजेचं नाही आहे
- सर्वच छंद मला यायला हवे हा अट्टाहास नाही माझा
- मी छान जगतो हे मला जगाला ओरडून सांगायचं नाही आहे
- मला येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं रूपांतर हे कन्टेन्ट मध्ये नाही करायचं आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "मला याची गरज नाही आहे" ही भावना "हे मला केलंच पाहिजे" पेक्षा खूप समाधान देणारी आहे.
या तथाकथित प्रगत आयुष्याची एक शोकांतिका आहे.
लोक एखाद्या सुंदर ठिकाणी फोटो काढण्यात इतकं मश्गुल होतात की तो अनुभव जगणं विसरून जातात. कुठलं तरी सुंदर निसर्गचित्र आपण मोबाईलच्या स्क्रीनद्वारे बघतो, सूर्यास्त आपला कंटेंट बनतो, कुठे आपण प्रवासाला निघालो तर त्याचा पुरावा होतो, सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी आपण त्याचं डॉक्युमेंट बनवतो. आणि या गर्तेत तो खराखुरा अनुभव हरवून जातो.
कुणास ठाऊक पण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण हे कधीही कुठेही अपलोड केले जात नाही, त्याचं प्रदर्शन मांडावं वाटत नाही आणि त्याचं दुसर्याकडून प्रशस्तीपत्र पण लागत नाही. तेक्षण फक्त जगले जातात, अनुभवले जातात आणि आठवले जातात.
अँटी बकेट लिस्टचा उद्देश खूप साधा आहे. त्याने आपल्याला आयुष्य आकसून घ्यायचं नाही आहे, पण स्वरचित दबावाला झिडकारून द्यायचं आहे, मिनिंगफ़ुल आयुष्यासाठी जागा करायची आहे, जे म्हणून शक्य आहे ते कारण्याऐवजी जे माझं आहे तेच आयुष्य जगण्याचा चॉईस आहे.
कारण शेवटी समाधान कदाचित चेक बॉक्स टिक करण्यातून मिळत नसेल पण काही चेक बॉक्स पूर्णपणे दुर्लक्षित करण्यातून मिळेल.
डॉ प्रसाद राजहंस
No comments:
Post a Comment