झालं, माझं टाळकं सटकलं. मी ज्या विमानात प्रवास करतो आहे, त्याचा पायलट मुस्लिम? शक्यच नाही मला आता प्रवास करणं. मी बेल दाबून एअर होस्टेस ला बोलावलं आणि तिरमिरीत तिला सांगितलं की "पायलट मुस्लिम असल्यामुळे मी या विमानातून प्रवास नाही करू शकणार. विमान परत घेऊन मला विमानतळावर सोडा." माझी कीव करत एअर होस्टेस म्हणाली "सर, विमान ऑल रेडी रन वे वर खूप पुढे आलं आहे. असं नाही करता येणार." मी म्हणालो "मला काही ऐकायचं नाही आहे, मला आताच्या आता सोडा" हे बोलताना माझा आवाज चढला होता. ते ऐकून आजूबाजूचे लोक कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते. त्यात काही जणांच्या चेहऱ्यावर "कसलं येडा माणूस आहे" असा माझ्याप्रति भाव होता. तर काही जणांच्या चेहऱ्यावर माझ्या बद्दल कौतुक दिसलं. ज्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसलं त्यांना मी म्हणालो की मला तुम्ही सपोर्ट करा. तसं म्हंटल्यावर त्यांनी डोळे मिटून झोपण्याचा अभिनय केला.
विमान उडालं. सकाळचीच वेळ होती. खिडकीतून बघितलं तर खाली समुद्र दिसत होता. दोन मिनिटं विचार केला की पाणीच आहे खाली, उडी मारण्याचा पण धाडसी विचार माझ्या मनात आला. मग त्यातील फोलपणा लक्षात आल्यावर हातावर हात ठेवून बसलो. दोन्ही हात माझेच आहेत त्याची काळजी घेतली.
शेजारचा पॅसेंजर जो माझ्याकडे अपार कौतुकाने पाहत होता म्हणाला "तुमची स्टाईल आवडली. पण तुम्हाला म्हणून सांगतो. मुस्लिम नको हा प्रकार जिथे शक्य आहे तिथे वापरायचा फक्त. उदाहरणार्थ, उबर किंवा ओला कॅब ड्रायव्हर किंवा एखादं हॉटेल, झालंच तर न्हावी. ज्या वेळेस जिथे चॉईस नाही, तिथं शहाणपणा करायचा नाही." मला हा डाव आवडला.
मुंबई एअरपोर्टवर माझा ड्रायव्हर रवी आलाच होता. आम्ही पुण्याकडे निघालो. नशीब इतकं बेकार की एक्स्प्रेस हायवे ला तुफान ट्रॅफिक. फुल जॅम. अमृतांजन पॉईंटच्या दोन एक किमी अलीकडे आमची गाडी गचके मारत थांबली. मी रविवर डाफरलो. तो म्हणाला गाडी पूर्ण चेक करून आणली होती. नशीब रस्त्याच्या डाव्या बाजूलाच गाडी होती. तिथल्या बॅरिकेड वर एक मोबाइल नंबर होता. कार रिपेअर म्हणून. रवीला म्हणालो, डायल कर आणि बोलाव त्याला. पाचच मिनिटात समोरच्या बाजूने स्कुटर वर आला. त्याचं नाव विचारलं तर अस्लम. पण विमानातल्या पॅसेंजरचं म्हणणं आठवलं. जिथं चॉईस नाही तिथं शहाणपणा चोदवायचा नाही. दहा मिनिटात त्याला दोनशे रुपये दिले कार दुरुस्तीचे आणि सुखरूप घरी पोहोचलो.
No comments:
Post a Comment