Monday 25 January 2016

स्मरणशक्ती

मी पंचविशीत असताना माझी स्मरणशक्ती  फारच भारी होती. कुठलेही फोन नंबर मला लिहून ठेवावेच लागत नसत. टेलिफोन उचलला की बरोबर नंबर डायल केला जायचा. किंवा गाड्यांचे नंबर लक्षात राहायचे. माझ्या बिझिनेस पार्टनर ला याचं फार कौतुक. मला तो नेहमी म्हणायचा "कसला हुशार आहेस रे तू. कसली सॉलिड मेमरी आहे तुझी" हे ऐकलं की मला ही वाटायचं खरंच आपण हुशार आहोत की काय?

चार पाच वेळा अशी स्तुती झाल्यावर, आणि माझ्याही पार्श्वभागाला हरभर्याच्या झाडावर चढल्यामुळे गुदगुल्या झाल्यावर मी विचार केला "खरं तर काय त्याच्यात हुशारी. जी गोष्ट आपण लिहून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा शोधून काढू शकतो, ती लक्षात ठेवण्यात काय कौतुक" आणि तसंही कुणीतरी म्हंटलच आहे "A pale ink reliable than strong memory" मी वाघेला ला हे बोललो. त्यालाही पटलं ते. यथावकाश मोबाईल फोन आले आणि माझी शायनिंग टाकायची संधी कायमची हुकली. आता तर नंबर लक्षात ठेवायची मेंदूतली चीप कायमची करप्ट झाली आहे.

तसं किस्सा सांगताना लोकं साल सांगतात किंवा मी ही काही लिहिताना लिहितो "१९९२ साली मी बंगलोर ला गेलो असताना……" काही जण जबरी इम्प्रेस होतात या स्टाईल वर. "कसं काय आठवतो हो तुम्हाला" ही कॉमेंट की लागलीच मी ही हुशार्या दाखवत "राहतं लक्षात" वगैरे. खरं तर कोण बघायला जाणार हो ते ९२ साली घडलं की ९४ साली. "१९५२ साली नौशादजींनी मला आणि आशा ताईला दीदी बरोबर कोरस गायला सेट वर बोलावलं" हे वाक्य आल्यावर आई म्हणाली "काय आठवतं न हृदयनाथ जी ना" मी गालातल्या गालात हसलो.

काय सांगताहेत त्याच्या कंटेंट पेक्षा आपण या auxiliary गोष्टींना जास्त भुलतो. खरं तर, कुणी विचारलंच, "कशावरून" तिथे उत्तर नसतं.

त्या गाण्याचा कोरस हृदयनाथ जी आणि आशा जी यांनी गायला आहे, ते गाणं मला आठवत नाही पण साल नक्कीच आठवतं. गोची तिथे होते. 

असाच एक फेसबुकीय अविष्कार माझ्या एका बहिणीशी बोलताना झाला. ती खरं तर व्यवस्थित कुठल्या लेखात काय आवडलं, काय नाही हे मला व्यवस्थित समजावून सांगत होती. काही जणांच्या कॉमेंट किती समर्पक असतात वैगेरे. ते नीट समजावून घ्यायच्या ऐवजी, एक भलताच थ्रेड पकडून मी तिला बोलताना हुशारी दाखवत म्हणालो "अगं काय सांगायचं तुला. गेल्या वर्ष दीड वर्षात मी एकालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही आहे" ती ही  माझ्याकडे अपार कौतुकाने वगैरे बघू लागली. पण समजा तिने मला विचारला असतं "कशावरून म्हणतोस हे?" तर सॉलिड फाफललो असतो, नाही?

खरं तर अजून लिहायचं होतं, पण हा फेसबुकचा पफलू जबरी फिट बसला आहे. त्यामुळे थांबतो.

आणि हो, तर प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


No comments:

Post a Comment