Thursday 21 January 2016

मायबोली

नील मंडलिक, पृथ्वीराज शिंदे, प्रथमेश कवूर, ध्रुव पुरंदरे हे चार मित्र आहेत. वय ११ ते बारा वर्ष. चौघांचे आई बाप मराठी भाषिक आहेत. ही चार ही पोरं घरात उत्तम मराठी बोलतात. पण गंमत अशी आहे की एकमेकांशी बोलताना मात्र हिंदी बोलतात.

कितीही झालं तरी मराठी भाषेवर माझं प्रेम आहे. अंह, थांबा. अस्मिता वैगेरे भानगडी नाही. गर्व तर त्याहून नाही. पण भाषेची आस्था, तर ती नक्कीच आहे. काय असेल ते असो, इंग्रजी भाषेने मला मोहवून कधीच टाकलं नाही. मान्य आहे, तिथेही अप्रतिम लिखाण आहे. आणि मी त्याला मुकतो आहे. पण हे ही तितकंच खरं की इंग्रजी भाषेमुळे पोटाची भ्रांत मिटली पण हृदयाला हात घातला तो मराठी भाषेनेच. माझं शिक्षण मराठी भाषेत झालं. व्यवसायाचा भाग म्हणून मला इंग्रजी बोलावं लागतं. सतत बोलल्यामुळे त्यातही सहजता आली. पण तिचा वापर फक्त तितकाच.बाकी स्वप्न मराठी भाषेतच पडतात. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळेच सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आणि कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केलेलं  मराठी गीत ऐकताना अंगावर रोमांच उठतात. 

कितीही उंची हॉटेल मध्ये गेल्यावर मी वेटर ला मराठीत खाण्याची ऑर्डर देतो. पोरांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस असे भाव असतात की मी या पोरांचा बाप नसून, गाडीचा ड्रायव्हर आहे. आणि त्याने या पोरांना जेवायला आणलं आहे. 

मुळात आपल्याला उगाच न्यूनगंड असतो इंग्रजी येत नसल्याचा. किंवा ज्यांना चांगलं बोलता येतं, त्यांना अहंगड. बाकी देशात अक्षरश: बोंब आहे पण त्यांच्या बोलण्यातून हे न्यूनत्व आणि गंडत्व जाणवत नाही.  इंग्रजी मातृभाषा असणारा आमचा जेफ माझ्या इंजिनियर ला म्हणाला सुद्धा "Do not feel bad that your English is not good. It is not your mother tongue. And believe me, your English is better than my Marathi."  त्यामुळे कधी कुणी भारी इंग्रजीत काही लिहिलं की स्तिमित होतोही पण काही काळच. पुन्हा वाचण्याची हिंमत होत नाही. पण पुल, वपु, रणजीत देसाई, अनिल अवचट हे पुन्हा पुन्हा वाचले जातात.

अगदी काल औरंगाबाद ला स्पिंडल या टेक्निकल विषयावर भाषण द्यायचं होतं. वीस एक जण होते. मी विचारलं "मराठीत बोलू का" सगळ्यांनी सहमती दाखवली. नेहमीच्या इंग्रजी प्रेझेन्टेशन पेक्षा नक्कीच खुललं आणि मला व लोकांना खूप मजाही आली.

भाषेचं संवर्धन बोली भाषेतून होत असावं. त्यामुळे भाषा टिकवायची असेल तर संवाद मराठीत व्हावे. अर्थात प्रतिवाद ही . मातृभाषेत जितकं व्यवस्थित व्यक्त होता येतं तितकं परभाषेत नाही असं माझं मत आहे. जब्बार पटेल, श्रीराम लागू, सुधा मूर्ती याचं इंग्रजी आपल्याला भावतं याचं कारण मला असं वाटतं की ते विचार मातृभाषेत करत असावेत. तर सांगायचा मुद्दा हा की आपण ही आपल्या भाषेचा मुक्त हस्ते वापर करावा. की मुक्त मुखे म्हणू. काही ठिकाणं माझ्या लक्षात आली आहे तिथे विनाकारण इंग्रजी बोललं जातं. संवादातल्या दोघानाही मराठी येत असतं पण भाषा हिंदी किंवा इंगजी. कोणती ठिकाणं ही?

- पंचतारांकित हॉटेल्स
- मॉल मधील सेल्स ची लोकं.
- McDonald किंवा Domino मधील ऑर्डर घेणारी मुले किंवा मुली
- Inox किंवा तत्सम थियेटर मधील तिकीट देणारी पोरं 
- विमानतळावरचा ग्राउंड स्टाफ. आणि थोड्या फार फरकाने एयर होस्ट वा एयर होस्टेस ही.
- HDFC, ICICI किंवा Citibank अशा बँकेत काम करणारी मंडळी

वगैरे.

काही सूचना आहेत.

- कौंटर वर गिऱ्हाईक आलं की बोलीभाषेच्या तीन ऑप्शन चं कार्ड द्यायचं. मराठी, हिंदी वा इंग्रजी. गिऱ्हाईकाने जी भाषा निवडली त्या भाषेत संभाषण व्हावं.
- विमानाचं तिकीट काढतानाच संभाषणाची कुठली भाषा पाहिजे हे लिहिता यावं. आणि जर ती भाषा बोलणारा स्टाफ असेल तर "आपल्याला ब्रेकफास्ट साठी नॉनव्हेज देऊ की व्हेज" हे सकाळी च कुणी प्रसन्न आवाजात विचारलं, की तब्येत कशी खुश खुश होऊन जाईल, नाही?

तसंही, वर उल्लेखलेल्या लोकांपैकी ७०% टक्के इंग्रजी बोलताना एकदम टिनपाट वाटतात. अहो हे जाऊ द्या, सुरेल गळ्याच्या श्रेया घोषाल ची कधी मुलाखत ऐकली. इंग्रजी बोलण्याच्या नादात, ती तिच्या बोलण्यातल सत्व हरवून बसते.

आणि पुन्हा सांगतो यात आकस कुठेही नाही, पण मायबोली बोलली जावी. हे दहा वर्षाच्या पोरात दुसऱ्या भाषेत बोलण्याचं खूळ डोक्यात घुसलं आहे ते निघून जावं इतकीच इच्छा. बाकी मर्जी आपापली. 

No comments:

Post a Comment