Thursday, 5 November 2015

पारिजातक

लहान गावातून मी नुकताच या मोठया गावात आलो होतो. घर तसं शहराच्या बाहेरच होतं. चार दिवस आवराआवरी केल्यावर मी माझा सकाळचा मॉर्निंग वॉक चालू केला. माझ्या घरापासून तीनशे मीटर चालल्यावर मला पारिजातकाचा मंद सुवास आला. आणि थरथरत्या पण स्पष्ट आवाजात स्तोत्राचा स्त्रीचा आवाज ऐकू आला. सकाळच्या वेळेला पारिजातकाचा दरवळ आणि पार्श्वभूमीवर स्तोत्र.  अहाहा. मनाला प्रसन्न वाटलं. आवाजाच्या दिशेने लक्ष गेल्यावर एक साधारण पंचाहत्तरीच्या बाई दिसल्या. पाठमोऱ्या होत्या. पाठीमागे त्याचं टुमदार घर दिसलं. तीन एक खोल्यांचं. छोटं आंगण. अंगणात गवत अन छोटीसी बाग. बागेच्या एका कोपऱ्यात पारिजातकाच झाड. मी पुढे चालत गेलो.

दुसर्या दिवशी चालताना परत तो पारिजातक दरवळला. आज मला त्या बाई दिसल्या. निमगोर्या, कपाळावर कुंकू, गळ्यात मण्याच मंगळसूत्र, टापटिपीत नेसलेली साडी, चेहऱ्यावर प्रसन्न स्मित. हातात परडी. परडीत पारिजातकाची फुलं वेचून ठेवलेली. भिडस्त स्वभावाचा मी हसावं की नसावं अशा मनस्थितीत पुढे निघून गेलो.

दोन तीन दिवस हे असंच चालू राहिलं. स्मित हास्याची हलकी देवाणघेवाण व्हायची. चौथ्या दिवशी मात्र बाई च म्हणाल्या "काय म्हणतोस? कसा आहेस " त्यांनी हे म्हणे पर्यंत मी पुढे निघून गेलो. आणि त्यामुळे मी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि चालत राहिलो. मनात आलं. "किती हलकट आहे मी. ऐकूनही मी दुर्लक्ष केलं" मनाला दिवसभर रुखरुख लागली. ती थांबली, दुसऱ्या दिवशी. सकाळीच गेलो. सुवासिक पारिजातक आणि बाईंचं स्मित. त्या परत म्हणाल्या "काय म्हणतोस, कसा आहेस?" प्रश्नाची वाटच पाहत होतो. लागलीच मी म्हणालो "मजेत. तुम्ही कशा आहात?". त्याही म्हणाल्या "मस्त" आणि हे म्हणताना त्या अजून हसल्या. थोडा सुरकुतलेला त्यांचा चेहरा अजूनच छान दिसला. जाताना त्यांनी माझ्या हातावर त्यांनी अर्धी ओंजळ पारिजातकाची फुले दिली.

मग हा सिलसिलाच चालू झाला. मी जाणार, बाई कधी नमस्कार तर कधी सुप्रभात म्हणणार. मीही हसून प्रतिसाद देणार. त्या अर्धी ओंजळ पारिजातक देणार. मी शीळ वाजवत पुढे चालायला जाणार. परवा कंपनीत मला प्रमोशन मिळालं. काल मी हसऱ्या चेहऱ्याने गेलो. पाया पडलो. म्हणालो "नमस्कार करतो आई." त्यांनी सुद्धा हातातली परडी बाजूला ठेवली. तोंडभरून आशीर्वाद दिले. खरखरता हात माझ्या गालावरून फिरवला आणि म्हणाल्या "सुखी रहा". आणि ओंजळभर पारिजातक हातावर ठेवले.

आज सकाळी मी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघालो. आज बघतो तर पारिजातकाचा सडा जमिनीवरच सांडलेला होता. फुलं होती, पण तो नेहमीचा सुवास दरवळत नव्हता. घराच्या फाटकापाशी मला Ambulance उभी दिसली. दोघं-तिघं लगबग करत होते. मी विचारलं, काय झालं म्हणून. पण कोणी उत्तर दिलं नाही. तेवढयात एक वृद्ध गृहस्थ आले. माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले "काल रात्री शकुंतला उठली पाणी पिण्यासाठी. पाणी पिलं आणि परत झोपली ते न उठण्यासाठीच." मी हतबुद्ध झालो. थोडा तोल गेला म्हणून बाजूच्या दरवाजाचा सहारा घेतला. त्या वृद्ध गृहस्थाने माझ्या पाठीवर हलकेच थोपटून माझंच मूक सांत्वन केलं.

स्ट्रेचर आलं. बाई शांतपणे पहुडल्या होत्या. चेहऱ्यावरचं स्मितहास्य तसंच होतं. त्यांच्या शेजारी पारिजातकाची फुलं ठेवली होती. तिथे मात्र तोच परिचित सुवास दरवळला. त्या वासागणिक माझ्या तोंडून शब्द पडले "सुप्रभात. कशा आहात?" पण आज बाईनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. स्ट्रेचर Ambulance मध्ये गेलं. झटकन दरवाजा बंद झाला आणि मला काही कळायच्या आत ती शववाहिका गेली सुद्धा.

मी भेलकांडत निघालो. थोडयावेळाने घरी पोहोचलो. गालावर सुकलेले अश्रू चेहऱ्यावर पाणी उडवून धुऊन टाकले.

मला तशी बागकामाची फारशी आवड नाही. पण समोरच्या अंगणात जरा पारिजातकाचं झाड लावावं म्हणतोय. कुणास ठाव, एक दिवस हा पारिजातकही बहरेल. आणि माझी मॉर्निंग वॉक ची दिशा विरुद्ध झाली तरी पारिजातकाच्या दरवळातून  शकुंतला बाईंचा "सुखी रहा" हा आशीर्वाद माझ्यावर सतत वर्षावत राहील.

मूळ इंग्रजी लेख: शिल्पा केळकर. (हा मूळ लेखाचा अनुवाद नव्हे तर रुपांतर आहे)

No comments:

Post a Comment