Friday, 18 December 2015

आजीचा सल्ला

मी लहान असताना माझी आजी आमच्याकडे रहायची. मला खेळण्याचा खूप नाद. त्यात माझे मित्र असे अतरंगी होते की मी अभ्यासाला बसलो, की बिल्डींगच्या खाली उभे राहून विशीष्ट आवाजात शिट्टी मारायचे. ती शिट्टी ऐकली की माझ्या मनात चलबिचल व्हायची. आईबाबा घरात असतील तर काही तरी कारण सांगून मी घरातून पसार व्हायचो. परत जेव्हा यायचो तेव्हा आईची बोलणी खाऊ नये म्हणून गुपचूप अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसायचो. आमची आजी डोळ्याच्या कोपर्यातून ही सगळी माझी नाटकं बघायची. दहावीला फक्त मित्र खेळायची म्हणून मी पण खेळायला जायचो. ज्याला आजकाल पिअर प्रेशर म्हणतात ना, साधारण तोच प्रकार. मित्र असं वागतात ना, मग आपणही तसंच वागायचं.

एके दिवशी घरात कुणी नसताना आजीने मला तिच्या समोर बसवलं आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाली "हे बघ राजेश, मी काय बोलते ते लक्ष देऊन ऐक. मी बघतेय की गेले काही महिने तु फक्त मित्र असं करतात म्हणून तसं वागतोयस. हे तुझ अभ्यास अर्धवट टाकून खेळायला जाणं हा तुझा पिंड नाही आहे. पण मित्रांच्या वागण्याचालण्याचं, बोलण्याचं तु अंधानुकरण करतो आहेस. तुझे काही मित्र असे आहेत की ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि मग ते खेळायला येत आहेत. तर काही जण असे आहेत की ज्यांना अभ्यासाचा काही गम नाही आहे. ते दिवसभर टिवल्याबावल्याच करत असतात. पण तु न या गावचा न त्या गावचा. त्यामुळे तु मनात आधी पक्क कर, कसं वागायचं ते. म्हणजे अभ्यास पूर्ण करून मैदानात उतरायचं की त्या दुसर्या मुलांसारखं फुकाचा टाईमपास करण्यासाठी चकाट्या पिटायच्या ते. जा आता."

काही वर्षांनी आजी देवाघरी गेली. पण तिचा सल्ला मी कायम लक्षात ठेवला. मग कॉलेजमधे मित्रांच्या हेयरस्टाईलची कॉपी केली, किंवा सिगरेट पिली किंवा कधी पिअर प्रेशर खाली कंपनीच्या पार्टीत ड्रिंक्स घेतले आणि हे पुन्हा पुन्हा घडलं की घरी आल्यावर फोटोतली आजीची नजर मला बेचैन करायची. आणि मग फक्त मित्र हे करतात, ते असं बोलतात,  म्हणून मी पण करायचं हे लागलीच टाळायचो.

आज मी ४७ वर्षाचा आहे. माझी आजी जाऊन कित्तेक वर्ष झाली. पण तिचा सल्ला मी फेसबुकवरही काटेकोरपणे पाळतो. त्यामुळे सहसा पिअर प्रेशरमुळे चालू वादाच्या मुद्द्यावर केवळ मित्र लिहीतात म्हणून मी लिहीत नाही, काही आदरणीय मित्र लिहीतात म्हणून मग मी पण इतक्या मंडळींना नारळ दिला असंही  लिहीत नाही. आजीची शिकवण आयुष्याच्या या टप्प्यावर कामाला येईल असं कधी वाटलंही नव्हतं.

माझी आजी फारच हुशार होती, नै. 

No comments:

Post a Comment