Saturday 16 April 2016

गजलरंग

काव्य आवडतं. कळतं का, असं विचारलं तर हो म्हणायला जड़ जाईल. पहिल्या फटक्यात वाचून कळणं बर्याचदा अवघड जातं. कुणी सादरीकरण व्यवस्थित केलं तर अर्थ कळायला सोपं पडतं. खरं तर अशा वेळेला ती मनात उतरत जाते. सरसर. 

गजलरंग ला ही अनुभूति बर्याचदा येते. अण्णांनी चालू केलेली ही मुशायरा ची बैठक आता चांगलीच बस्तान बांधत गेली आहे. त्याच्याबद्दल खूप लिहीलं ही गेलं आहे. मी सहा सात मुशायरांना हजेरी लावू शकलो. येणार म्हंटल्यावर अण्णा नेहमीच खुर्चीवर नाव लिहून जागा आरक्षित करतात. पण कंपनीतल्या गजलांची मैफल काही सात वाजेपर्यंत संपत नाही आणि मला नेहमीच कार्यक्रमाला उशीर होतो. 

कालही झाला. गेलो तेव्हा क्रांती सडेकर उर्दू ग़ज़ल सादर करत होत्या. कुठलाही अभिनिवेश न बाळगता अवघड शब्दांची सोपी मांडणी अन स्वभावात सादगी. फोटोवर इतक्या भारी कँप्शन देणार्या क्रांती खुपच शांत आहेत. IAS, अलीबाग़ असं कंसात ज्यांच्या नावापुढे लिहीलं आहे अशा पांढरपट्टे सरांनी भारदस्त आवाजात रचना सादर केल्यावर सुधीर मुळीक बरसले. मुळातच ताकदीचे शब्द लिहील्यावर त्याला परत आत्मविश्वासपुर्ण सादरीकरणाची जोड़ असल्यावर काय उतरतं याचा वस्तुपाठ मुळीक आपल्या तालेवार आवाजात नेहमीच देतात. कालही दिला. 

मुशायरा संपल्याची घोषणा झाली. 

मी हे का लिहीलं याचं कारण पुढे आहे. 

अर्ध सभागृह रिकामं झालं. श्री रामदास फुटाणे कुणा विष्णु सुर्या वाघ नामक गोव्याचे आमदार आहेत, उपसभापति आहेत पण कवीही आहेत, त्यांची मुलाखत घेणार असं सांगण्यात आलं. फुटाणे साहेब काय म्हणतात हे ऐकावं अन निघावं असा विचार केला. (वीस एक वर्षापुर्वी डेक्कन क्वीन मधे माझी सीट त्यांच्या शेजारी होती. सॉलीड गप्पा मारल्या होत्या). प्रस्ताविक बोलून त्यांनी वाघ साहेबांकडे माईक दिला. 

अन पुढचे पाऊण तास आम्ही अक्षरश: चिंब झालो. अस्मिता, गर्व, अभिमान या शब्दांशी फारकत घेतलेलं त्यांचं मराठी भाषेवरचं निस्सिम प्रेम. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते कुठल्या फ़ादर स्टीव्हन्स ने मराठीत काय काय लिहून ठेवलं याचे मुखोद्गत संदर्भ. मराठी भावगीताचं इंग्रजी त रूपांतर करण्याइतका त्याही भाषेचा अभ्यास आणि तितकाच मिश्कील स्वभाव. आणि लोकगीतापासून ते गजलेपर्यंत अशा कवितेच्या प्रत्येक प्रांतात मुशाफिरी करण्याची क़लंदर वृत्ती याचं मनोज्ञ दर्शन फक्त ४५ मिनीटात वाघ साहेबांनी उलगडून दाखवलं. काय नव्हतं त्यांच्या कवितेत. अर्थवाही शब्द, त्याला भारदस्त आवाजाची साथ, गेयता, अन सादर करताना टपकणारं भाषेवरचं प्रेम. आपण तर फ़िदा झालो. 

एकदा पावसाळ्यात रायरेश्वरला जाताना निसर्गाचा आनंद लुटताना अवघड चढण आली. ती चढून जावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना हिय्या करून वर पोहोचलो आणि धुक्यात हरवलेल्या एका छोट्या तळ्याच्या काठी उमललेल्या पांढर्या फुलांचा मनोहारी अविष्कार दिसल्यावर हरखून गेलो होतो. तसंच काहीसं कालही झालं. 

राजकारणासारख्या अशात बदनाम झालेल्या क्षेत्रात कार्यरत राहूनही आपली संवेदनशीलता बरक़रार ठेवणार्या वाघ साहेबांना आपला मानाचा मुजरा ......... एकदम तहेदिलसे 

No comments:

Post a Comment