साधारण ६ एक महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी काही कामानिमित्त बडोद्याला गेलो होतो. तिथून मला राजकोट ला जायचं होतं. कामं आटोपून मी संध्याकाळी मुकुंद च्या घरी गेलो. गप्पांचा फड जमवला. माझी ट्रेन रात्री १२:०५ ला होती. दहा वाजता जेवण वगैरे झाल्यावर मुकुंदाने मला स्टेशन ला सोडलं.
स्टेशन ला मी चौकशी केली. माझी ट्रेन राईट टाईम होती, प्लॅटफॉर्म नं ६ वर येणार होती. वेळ असल्यामुळे मी वेटिंग रूम मध्ये जाऊन बसलो. मला आता आठवत नाही, बहुधा ब्लॉग लिहित होतो वा फेसबुक चाळत होतो.
साधारण ११:४५ ला परत प्लॅटफॉर्म तोच आहे याची खातरजमा केली. त्यांनी हे ही सांगितलं की ट्रेन १२ वाजता येईल. मी प्लॅटफॉर्म नं ६ वर जाऊन बसलो.
बरोबर रात्री१२ वाजता ट्रेन आली. मी माझ्या बर्थ पर्यंत पोहोचलो. पाहतो तर तिथे एक स्त्री अगोदर पासून झोपली होती. हिचा कुठला दुसरा बर्थ असेल आणि ती आता काही तरी पाचकळ कारण सांगून बर्थ एक्स्चेंज करायला सांगेल हे मी ताडलं. मी, ओ मॅडम म्हणत त्यांना झोपेतून उठवायचा प्रयत्न केला. दोन चार हाका मारल्यावरही त्यांची झोपमोड नाही झाली. मग अनिच्छेने का होईना, ओ बहेनजी, असा पुकारा केला. कूस बदलून त्यांनी जागं होत माझ्याकडे पाहिलं अन त्यांना बहेनजी संबोधून आपण घोडचूक केली याची जाणीव झाली. पण बाण सुटला होता. त्यांनी मला चेहऱ्यावरच्या बटा सावरत विचारलं "क्या है" मला दोन क्षण त्यांनी फक्त बटा चेहऱ्यावरून बाजूला करत राहव्या असं वाटत राहिलं. पण बहेनजी म्हंटल्याची चूक स्मरत मी म्हणालो "ये मेरा बर्थ है" तर त्या म्हणाल्या "आप फिरसे चेक करो, ये मेराही बर्थ है"
आमचा हा प्रेमळ संवाद चालू असताना, म्हणजे आता भावा बहिणीतला, ट्रेन ने बडोदा स्टेशन सोडलं होतं. एवढया रात्री आता ताईंना त्रास देण्यात काही अर्थ नव्हता. मी आपला टी सी ची वाट पाहत थांबलो.
टी सी आला. मी टेचात स्मार्टफोन वरचा मेसेज दाखवला. तो पण चक्रावला. १२:०५ची ट्रेन असली तरी जो नेहमी तारखेचा होतो तो घोळ पण नव्हता. त्याने परत मेसेज वाचला अन म्हणाला "क्या गुरू, आप गलत ट्रेन में चढे हो. तुम्हारी ट्रेन इसके पीछे आ रही है" मी पाहिलं, माझ्या ट्रेन चा नं १९८१२ होता तर ज्यात बसलो तिचा नं १९८२० होता.
मी खजील झालो. गेल्या २० वर्षात मी अक्षरश: हजारो ट्रेन प्रवास केले. आणि ट्रेन मध्ये चढायची आणि उतरायची वेळ २४ तासातील कुठलीही असायची, पण इतकी घोडचूक पहिल्यांदा झाली.
एव्हाना रात्रीचे १२:३० होऊन गेले. मला टी सी ने सांगितलं "आता आणंद ला उतर, तिथे तुझी मागून येणारी ट्रेन थांबते. एक स्टेशन जाईपर्यंत तुमचा बर्थ आम्ही दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही. त्यामुळे तुला बर्थ मिळेल".
त्याने सांगितल्या प्रमाणे केलं आणि माझा पुढचा प्रवास व्यवस्थित पार पडून मी राजकोटला पोहोचलो.
यात काय घडू शकलं असतं?
- मी ज्या ट्रेन मध्ये बसलो होतो किंवा जी माझी निर्धारित ट्रेन होती ती सुपर फास्ट असती आणि आणंद ला न थांबणारी असती तर?
- बडोदा जंक्शन वरून दोन ट्रेन चे मार्ग भिन्न असते तर?
- बाकी ती स्त्री प्रवासी आणि माझ्यातला संवाद कुठं पर्यंत पोहोचला असता, या कल्पनेला इथंच फुल स्टॉप देऊ.
तर मला हा प्रसंग का आठवला? एक पोस्ट बनवायची म्हणून?
तर दोन तीन महिन्यापूर्वी Linkedin वर WA आणि फेसबुक च्या आहारी जाऊन तुमच्या काय चुका होऊ शकतात यावर एक आर्टिकल वाचलं. यात ट्रेन, बस किंवा फ्लाईट चुकू शकतं हे लिहिलं होतं.
आता मी बडोदा स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये ब्लॉग लिहित होतो किंवा फेसबुक खेळत असेल. हे जर करत नसलो असतो तर मी ट्रेन मध्ये चढायच्या अगोदर ट्रेन चा योग्य नं आहे का हे मी चेक केलं असतं का? ब्लॉग वर आर्टिकल लिहित होतो तर त्याच्या विचारात गुंतलो होतो का आणि त्यामुळे चुकीच्या गाडीत चढलो का?
नेमकं आठवत नाही, पण या प्रश्नाची उत्तरं "हो" असण्याची दाट शक्यता आहे.
त्या लेखाचा शेवट ज्या वाक्याने केला तेच इथे परत लिहितो.
Remember, you are not made for social media. It should not control your deeds, actions. You might feel that social media's strings are at your fingertips and you make it dance while using it on smartphone. In fact it is exactly other way round.
No comments:
Post a Comment