Wednesday, 13 April 2016

दुनियादारी

काल मी बंगलोर ला आलो. इथे माझा एक जवळचा मित्र राहतो. कृष्णा नाव ठेवू आपण त्याचं. बरोबर काम करायचो आम्ही. तो मूळ दिल्लीचा. वर्ष सरली, तो आता एका कंपनीचा मोठा अधिकारी झाला आहे. एकटाच राहतो. फॅमिली दिल्लीत.

तो ज्या कंपनीत काम करतो ती मोठी आहे, पण सध्या काम नसल्यामुळे गळपटली आहे. चार सहा महिन्यापासून पगार पण नाही असं ऐकत होतो. त्यानेच मला फोन करून सांगितलं होतं.

काल बंगलोर ला आल्या आल्या माझा फोन झाला त्याच्याशी. दुपारी मी एक्झिबिशन चा स्टॉल सजवत असताना मला त्याचा परत फोन आला "अरे राजेश, मला आताच्या आता दहा हजार रुपयाची गरज आहे. आताच्या आता देऊ शकतोस का? साला पगार नाही झाला चार महिने. अन तिकडे दिल्लीहून बायकोचा फोन आला की महत्वाच्या कामासाठी पैसे हवे आहेत, आजच्या आज"

आता एकदा दोस्ती केली म्हंटल्यावर प्रश्न मिटला. आजकाल क्रेडिट कार्ड मुळे खरं तर कॅश ठेवत नाही, पण सुदैवाने होती. पाच दिवस कंपनीचे तिघे राहणार, त्यांना लागेल कदाचित म्हणून ठेवले होते. लागले तर मी काहीतरी करून जमवू शकत होतो.

एक्झिबिशन चा स्टॉल सजवत होतो. त्यात तो म्हणाला की जरा पिनिया ला ये आणि तिथे आणून दे पैसे. झालं, टॅक्सी केली, धावपळ करत पिनिया ला गेलो आणि त्याला पैसे दिले अन परत गेलो.

दुसऱ्या दिवशी कृष्णा एक्झिबिशन पाहायला आला. मी आणि तो जेवायला गेलो. जेवताना त्याला विचारलं "काय जमलं का काल सगळं?"
तर म्हणाला "जमलं यार, पोराला ट्रिप ला जायचं होतं आणि पैसे भरायची लास्ट डेट होती. पोरगं खूप नाराज झालं होतं. म्हणून बायकोचा फोन आला, काहीही करा, पण पैसे पाठवा" पुढं म्हणाला "तुला लागत नव्हते ना पैसे"

मी म्हणालो "अरे, नाही रे. म्हणजे पोरं पाच दिवस राहणार. एक चेन्नई हुन येणार. त्यांना लागेल म्हणून आणले होते. त्यांच्या कडे असतीलच पैसे, पण सेफ्टी म्हणून आणले होते. आता पुण्याला गेलो की पाठवतो"

इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. पुढं कृष्णा जे बोलला त्याने मात्र चकित झालो.

"अरे, सांगायचं की मला. मी केले असते पैसे कुठून तरी मॅनेज. माझा चुलत भाऊ बंगलोर मधेच राहतो, पण त्याचं घर जरा लांब होतं, म्हणून मी तुला मागितले. तू सांगायचं मला की तुला पैसे लागणार म्हणून. मी जमवलं असतं कसं तरी"

मी चकित तर झालोच पण व्यथित ही झालो. एकदा कृष्णाने पैसे मागितले, मग मी काही मागचा पुढचा विचार नाही केला. कधी परत देणार तेही विचारलं नाही, आज सहा वर्ष झाली तो बंगलोर मध्ये आहे, मग त्याचं मित्र मंडळ जमा नाही का, जे त्याला मदत करतील, मी समजा आज बंगलोर मध्ये नसतो तर त्याने काय केलं असतं. आणि हा म्हणतोय "अरे, इतकं काय मोठं. मी जमवलं असतं कुठून तरी"

धन्य झालो. आईच्यान, पन्नाशी आली, पण दुनियादारी काही कळत नाही राव अजून.

No comments:

Post a Comment