Thursday 21 April 2016

मिथिला ताई

साधारण दोन एक वर्षापूर्वी मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तशी भित भित. कारण नुकतंच त्यांचं फेसबुकवर घमासान युद्ध झालं होतं. त्यामुळे विनंती स्वीकारतील याबद्दल साशंकता होती. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे त्यांनी ती विनंती स्वीकारायला खूप वेळ घेतला. आणि दोन तीन दिवसात मला त्यांची एक पोस्ट शेयर करण्याची सुरसुरी आली. मी केली.

ज्यांच्या बरोबर त्यांचे वाद झाले होते, त्यांनी त्या शेयर केलेल्या पोस्टवर काही मित्रांनी कॉमेंट टाकल्या. त्यांची टिंगल करण्याच्या. बाईनी तिरमिरीत येउन मलाच उडवलं. मला काही कळलं नाही. मी विचार केला, त्याचं डिसिजन. आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पण संध्याकळी त्यांची परत फ्रेंड रिक्वेस्ट आली. 

अशी मैत्रीची डळमळीत झालेली सुरुवात आज मात्र गाढ दोस्तीत परावर्तीत झाली हे आश्चर्यच आहे. 

त्यांच्या बद्दल एका मित्रवर्याने पोस्ट टाकली होती. मी तेव्हाच कॉमेंट टाकली होती "यांची प्रतिमा फेसबुकवर जशी आहे त्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत. रोखठोक असल्यातरी, स्वभावाने प्रेमळ असाव्यात. आणि झोकून देणाऱ्या असाव्यात." And believe me, I was not wrong in assessing this lady.

जन्म lलखनौ जवळील एका गावचा. बालपण इलाहाबाद मध्ये. जन्मदात्रीचा त्यांच्या बालपणी मृत्यू. नशिब त्याचं त्यांना मुंबईला घेऊन आलं. लग्न झालं. बाई इंदोर ला गेल्या. आयष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तितकीच ताकदीने उत्तर देत स्वत:ला आणि स्वत: बरोबर पोटच्या पोरीला अक्षरश: घडवलं. चंदेरी दुनियेत काम करताना स्वत:चे होश जागेवर ठेवत करियर ही बनवलं. आणि ते होत असताना मनस्वी पणे आपली एक स्वत:ची दुनिया बसवली. आणि त्यात समावेश झाला तुमच्या सारख्या साध्या लोकांचा.

मानसशास्त्रीय जाणीवेचा अंदाज देत त्या इतक्या फटकळ का आहेत, भडभडून बोलणं का आहे, हे ही सांगितलं.  बरं सगळं सांगताना अधूनमधून इतिहासाचा व्यासंग ही दिसत होता. रामायण आणि महाभारत च्या प्रचलित कथेपेक्षा त्याला असणारे वेगळे आयाम सहजगत्या उलगडून दाखवले. कुणाची भीडमुर्वत न ठेवता त्या लिहितात आणि तसेच बोलतात ही.

फेसबुकवर अत्यंत कठोर वाटणाऱ्या ताई, स्वत:चा जीवनप्रवास सांगताना डोळ्यातलं पाणी थोपवून धरत होत्या तेव्हा माझ्या मनात कालवाकालव झाली. "तुझ्या सारखं आयुष्य जगणाऱ्या माणसाला काय दिव्यातून जावं लागलं याची मला जाणीव आहे आणि म्हणून मला तुझ्यात माझा भाऊ दिसतो" असं म्हणाल्या तेव्हा मी आपसूक त्यांचे पाय पकडले.

जमलेल्या पंधरा जणांना, माहेरची माणसं भेटल्यासारखं कडकडून भेटल्या आणि अगदी आग्रह करून खाऊ पिऊ घातलं. निरोपाची वेळ आली तेव्हा प्रेमभराने माझा हात हातात घेत म्हणाल्या "तुम्हाला माहित नाही, तुम्हा सगळ्यांना भेटून मला किती आनंद झाला आहे" त्या करडया मनाच्या डोळ्यात तळं साचलेलं दिसलं आणि मी त्यांच्या पाठीवर थोपटल्या सारखं केलं आणि झटकन तिथून बाहेर पडलो. शिगोशिग प्रेमभावात भिजल्यानंतर मला आवंढ्याची चव कशी असते हे जाणून घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

नतमस्तक ……………मिथिला ताई. 

No comments:

Post a Comment