Saturday, 30 April 2016

वसुली

आता मी त्या कस्टमरचं खरं नाव नाही लिहीत. आणि आडनाव पण नको. तर महेश म्हणू. 

तर महेशचं आमच्या कंपनी ला  काही पेमेंट बाकी होतं. म्हणून मी वसुलीला गेलो होतो. (आयला, काय लिहीलं ना "वसुलीला गेलो होतो" म्हणे. साधं वरण भातावर साजूक तुप अन लिंबाची चतकोर फोड़ पिळून शरीर पोसलेल्याकडून वसुली होत नाही. तुम्ही त्याला पैसे उधार मागायला जाता तसं जायचं). 

तर महेशच्या कंपनीत पोहोचलो. चांगला एकराचा प्लॉट अन प्लॉटच्या एका कोपर्यात दीड एक हजार स्क्वे फूटाची फँक्टरी. जरा गावापासून दूर. मी पोहोचलो तर तसा सन्नाटाच होता. म्हणजे कंपनीत हालचाल असेलही, पण मेन गेट वरून शांत वाटत होतं. मी अंदाज घेत त्या फाटकाची कड़ी उघडली आणि ते भलं मोठं गेट बंद करून पाच सहा पावलं चाललो असेल. महेश असेल का, चेक देईल का, दिला नाही तर काय वाक्य त्याच्या तोंडावर फेकायची याची उजळणी करत होतो. 

आणि कुठुन कुणास ठाऊक पण एक जर्मन शेफर्ड किंवा तत्सम विलायती कुत्रा, कुत्रा कुठला सिंहच तो, माझ्या दिशेने धावत आला. मी त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्याने पाहत असतानाच तो माझ्यापर्यंत पोहोचलाही आणि काही कळायच्या आत माझ्या पोटाच्यावर त्याचे पुढचे पाय ठेवत जीभ बाहेर काढत उभा राहिला. 

थिजणे म्हणजे काय, किंवा गाळण उडणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. कुणी येतं आहे का याची अगतिकतेने वाट पाहत असतानाच त्या श्वानराजाचा मालक, ढेरपोट्या महेश डुलत येताना दिसला. मी कसाबसा बोललो "(भाड्या),अरे लवकर ये ना" कंसातला शब्द अर्थात मनात. तर तो महेश्या म्हणतो कसा "अरे घाबरू नकोस, तो काही करत नाही" असं म्हणत त्याने हाक मारली "शेरू, कम हियर". पाहुण्यासमोर लहान पोराला सांगितलं, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, म्हण तर ते कसं ढिम्म बसून राहतं, तसा तो शेरू तशाच जिभल्या हलवत उभा होता. महेश डुलत आला आणि त्या शेरू नामक धूडाच्या बखोटीला धरत त्याने खाली उतरवलं आणि इतका वेळ रोखून धरलेला जीव भांड्यात पडला. आणि परत तो महेश पचकला, 
"अरे घाबरू नकोस, तो काही करत नाही"

तो शेरू पण तो परत ऑफीसमधे गेला अन मी शेर झालो. म्हंटलं, "पांडू, घाबरू नकोस काय. कुठं मुतायचं असेल तर तो तुला विचारत नाही, चावायचं असेल तर तो तुला विचारणार आहे का? काहीही बोलतोस भावड्या तु" (पांडू च्या ऐवजी त्याचं यमक जुळणारा आणि भावड्या ऐवजी दोन अक्षरं पुढेमागे करून त्याचं संबोधन केलं हे वेगळं सांगायची गरज नाही). 

बसलो ऑफीसमधे. पैसे मागितल्यावर नेहमीचं रडगाणं झालं. मी थोडा आवाज चढवून पैसे कसे द्यावे लागतील हे सांगायला सुरू केलं. तितक्यात त्याने वॉचमन ला विचारलं "शेरूला बांधलं ना रे" 

मला इशारा कळला. पंधरा दिवसाने चेक दे असं ठोक बजावून मी धडधडत्या हृदयाने फाटक उघड़ून कारमधे बसलो. पंधरा दिवसाने पैसे नाही दिलं त्या महेशला कसे शाब्दिक फटकारे मारायचे याची उजळणी करत गाडीला स्टार्टर मारला. 

No comments:

Post a Comment