शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद आलियास GPA. माझ्या आयुष्यातलं एक साधं सरळ स्वप्न. हं, माझी नाशिकची शाळा हे मोहक स्वप्न होतं तर माझं इंजिनियरिंग चं कॉलेज हे दु:स्वप्न होतं. तर GPA हे वास्तव. मी आज जो काही अभियंता म्हणून समाजात मिरवतो त्याचा पाया इथे घातला गेला.
नाशिकच्या स्वप्नवत शाळेतून मी औरंगाबाद ला आलो. विल्को च्या घरातून गादी वगैरे घेऊन मी हॉस्टेल ला राहायला आलो. त्या दिवशी ग्राउंड मधल्या झेंड्याच्या पोल च्या चौथऱ्यावर बसून पहिल्यांदा रडून घेतलं आणि मग रात्री पलंगावर आधीपासून स्वागतास तयार असलेल्या ढेकणापासून वाचण्यासाठी खाली गादी टाकली आणि त्याच्या बाजूला रॉकेल ओतलं आणि मग झोपलो.
आणि मग पुढची तीन वर्षं अक्षरश: जगलो. GPA ची स्टोरी लिहायची म्हंटल तर मी त्या कॉलेज मध्ये वर्गात काय शिकलो हे लिहायचं तर दोन ओळी पण लिहिता येणार नाही. पण हॉस्टेल अन एक्स्ट्रा Curricular यामध्ये जो काही धिंगाणा घातला तो आज नैया वल्व्हवण्यासाठी मदत करतो असं म्हंटल तर अतिशयोक्ती होणार नाही. त्या तीन वर्षात भेटलेले मैतर आज ही तितक्याच असोशीने भेटतात, शिव्या घालतात. किती म्हणून नावं लिहावीत. काही लिहितोच. माझा तीनही वर्षं रूम पार्टनर असलेला अत्यंत पापभीरू असा सिव्हिल इंजिनियर संतोष देशपांडे, मी ज्याला जयभीम चा अर्थ पहिल्यांदा विचारला अन त्यानेही मला समजावून सांगितला असा रमेश नारखेडे, नगरच्या श्रीराम उद्योगाचा डायनामिक मालक सुनील कानवडे, त्याचा रूम पार्टनर आणि टॉप च्या पोझिशनचा competitor शहानवाझ, आणि या दोघांचे उपकार नेहमीच कबूल करणारा रतन, कुठल्याही गाण्याचे गायक/संगीतकार/गीतकार अन चित्रपट माहित असलेला संजय भोगावकर, दोन वर्ष राहिलेला पण ज्याच्या घरचे ही मला अत्यंत प्रेमाने बोलावतात असा मंगेश पाठक, जिगीषा या आजच्या अत्यंत नावाजलेल्या नाट्यसंस्थेच्या उमेदीतल्या काळातला सदस्य विवेक पत्की, ज्याच्या नगरच्या घरी आम्ही नेहमीच जायचो तो विवेक चव्हाण, केवळ माझं व्हिजिटिंग कार्ड दिसलं तर त्यावरून फोन करून घरी येउन भेटलेला बोर्डे, अतुल मिरजगावकर, राजेश बोरा असे अगणित मित्र. बऱ्याच जणांची नावं केवळ विस्तारभयास्तव लिहित नाही.
मुद्दलात दरमहा रु २५० यायचे. त्यातले ९० रु मेसला. (शेवटी ११० की १२० झाले होते), ३०-४० रु चहा नाश्ता, इस्त्री वगैरे साठी. ५० रु जास्त मागितले कधी, तर कशासाठी पाहिजे हा प्रश्न बाबा विचारायचे. पहिला बूट (हो, आणि त्याला आजकाल शूज म्हणतात) रु ४४ चा घेतला. सकाळी दुध टाकणारा गवळी जसा वापरतो तसा तो बूट. घेतला त्या दिवशी फक्त घालू शकलो. हे सगळे आकडे लिहिताना गंमत वाटते.
GPA चं हॉस्टेल हे एक अजीबोगरीब प्रकरण होतं. रूम ला दरवाजे केवळ नावाला होते जसे आमचे अंगावरचे कपडे. एका रूम मध्ये किती जणांनी ठिय्या ठोकायचा याला काही धरबंध नव्हता. काय खायचो, काय प्यायचो याचा काही तपास नव्हता. रात्र भर टे टे खेळायचो. शेवटी निबंधे सर यायचे आणि मग आम्ही खाली मान घालत रूम मध्ये परतायचो.
मुद्दलात दरमहा रु २५० यायचे. त्यातले ९० रु मेसला. (शेवटी ११० की १२० झाले होते), ३०-४० रु चहा नाश्ता, इस्त्री वगैरे साठी. ५० रु जास्त मागितले कधी, तर कशासाठी पाहिजे हा प्रश्न बाबा विचारायचे. पहिला बूट (हो, आणि त्याला आजकाल शूज म्हणतात) रु ४४ चा घेतला. सकाळी दुध टाकणारा गवळी जसा वापरतो तसा तो बूट. घेतला त्या दिवशी फक्त घालू शकलो. हे सगळे आकडे लिहिताना गंमत वाटते.
GPA चं हॉस्टेल हे एक अजीबोगरीब प्रकरण होतं. रूम ला दरवाजे केवळ नावाला होते जसे आमचे अंगावरचे कपडे. एका रूम मध्ये किती जणांनी ठिय्या ठोकायचा याला काही धरबंध नव्हता. काय खायचो, काय प्यायचो याचा काही तपास नव्हता. रात्र भर टे टे खेळायचो. शेवटी निबंधे सर यायचे आणि मग आम्ही खाली मान घालत रूम मध्ये परतायचो.
Badminton चं खरं तर कोर्ट नव्हतं. कुठेतरी हात साफ करायचो अन मग जळगाव ला इंटर कॉलेज खेळलो. फायनल ला माझ्यामुळे हरलो म्हणून रनर अप झालो. क्रिकेट ही खूप खेळलो.
तिथल्या इलेक्शन झालेल्या. दोन्ही पार्टीत मित्र. सिव्हिल आणि मेक ची नेहमी खुन्नस, पण इथे मिलाप झालेला. आज ही मला कोण कोणाच्या विरोधात होतं ते आठवत नाही. पण इलेक्शन जिंकल्यावर झालेल्या पार्टीत आवर्जून बोलावलं होतं. अहो पार्टी म्हणजे काय हो, डिलक्स हॉटेल मध्ये चहा. आणि तो हॉटेल वाला LP वर गाणे लावू द्यायचा आणि आम्ही नाचायचो. याच पार्टी मध्ये पहिल्यांदा मी धूम्रपानाचा आस्वाद घेतला.
तिथलं शेवटचं gathering पण खूप एन्जोय केलं. दुसऱ्या वर्षीच्या gathering ला विवेक ने खूप प्रयत्न करून म……मरणाचा म्हणून नाटक बसवलं होतं. आणि आम्हा दगडाकडून अभिनय करवून घ्यायला पार प्रशांत दळवी अन चंद्रकांत कुलकर्णी यांना बोलवायचा. त्यांनी पण खूप इमानेतबारे प्रयत्न केला, पण मूळ इथे आडात नव्हतं तर पोहऱ्यात कुठून येणार. तिसऱ्या वर्षी मात्र fishponds, ऑर्केस्ट्रा, क्विझ या सगळ्यांचा ऑर्गनायझर होतो. आणि सॉलिड धमाल केली होती. ह्या असल्या उद्योगामुळे इंटर्नल मध्ये मास्तरांनी दिल खोल के मार्क दिले आणि फायनल इयर च्या मार्कलिस्ट वर फर्स्ट क्लास चा ठप्पा लागला. कारण थियरी मध्ये जे दिवे पाजळले त्यावरून समोर अंधार च होता. पण मास्तर लोकांनी ओरल अन प्रोजेक्ट मध्ये कृपा केली अन पुढं मग डिग्री करण्याची आफत माझ्यावर आली.
औरंगाबाद च्या मेस हा एक संशोधनाचा विषय आहे. त्या उस्मानपुरा परिसरातल्या यच्चयावत बल्लावानी या पोटावर जे अत्याचार केले आहेत त्याने जगातले कुठलेही अन्न पचवायची ताकद दिली हे निर्विवाद.
बाकी ते तंत्रनिकेतन आणि आम्ही यांत्रिकी अभियंता. त्यामुळे मराठवाड्या सारखं रुक्ष. हिरवळ एकदम कमी. नाही म्हणायला आमच्या वर्गात दोघी जणी होत्या. मृगजळ जणू. बाकी सिव्हिल आणि DERE मध्ये भरणा होता. पण वर्गातील पोरगी म्हणजे राखी बांधून घेणे ह्या नाशिक च्या शिकवणुकीचा पगडा भारी पडला आणि तसंही मुळात अरसिक असलेलं हृदय हे आम्हा मित्रांच्या हसी मजाक मध्ये आनंद मानत राहिलं.
तर अशी आमची GPA ची स्टोरी. शाळेचा विषय निघाला की थोडा भावूक होतो. या कॉलेज चं अगदी तसं होत नाही पण स्टेशन रोड हून जाताना कॉलेज बघण्यासाठी मान उंचावतेच आणि ते दिसो न दिसो एक कृतज्ञतेचि भावना अंगभर सरसरत जाते.
No comments:
Post a Comment