Sunday 6 March 2016

५ मार्च २०१६.

शनिवार ५ मार्च २०१६, एक संस्मरणीय दिवस होता माझ्यासाठी.

फेसबुक वर मित्र आहेत डॉ जयंत पाटील, प्राचार्य आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि शिरपूर चे. स्वतः एम टेक आय आय टी खरगपूर अन डॉक्टरेट. अशा उच्च विद्याविभूषित माणसाला ह्या फेबु मुळे आपण मित्र वगैरे म्हणू शकतो, हे थोर आहे. तर
सरांनी मला वीस एक दिवसांपूर्वी फोन केला अन म्हणाले "मी तुमच्या पोस्ट वाचतो. तुम्ही आमच्या कॉलेज मध्ये entrepreneurship विषयावर मेकॅनिकल इंजि च्या फायनल इयर च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधाल का?" हो तर म्हणून गेलो मी. पण मनात आलं हे म्हणजे होतकरू फलंदाजांसमोर आशिष नेहरा ला उत्तम batting कशी करावी हे सांगायला बोलावण्यासारखं आहे. पाटील सर थोडे गल्ली चुकले का?

तर पोहोचलो सकाळी साडे आठ नऊ च्या सुमारास. आणि मग डोळे विस्फारत ते कॉलेज अन शिरपूर गावाची महती ऐकली, अनुभवली. भव्य बिल्डिंग, व्यवस्थित मेन्टेन केलेली लश ग्रीन लॉन, वातानुकूलित क्लास रूम, हजारो कॉम्पुटर असलेल्या लॅब, मॉडेल न ठेवता वर्क शॉप मध्ये खऱ्या मशिन्स, खेळण्याचं ग्राउंड, भली मोठी लायब्ररी, आणि सकारात्मकतेने भारलेलं असं ते कॉलेज.

अन गावभर काँक्रिटिकरण झालेले प्रशस्त रस्ते, उन्हाळा तोंडावर आलेला असताना पाणी टंचाई आसपास न फिरकणारी जल व्यवस्था, अंडर ग्राउंड ड्रेनेज सिस्टम असणारी नगरपालिका, पंधरा वर्षांपूर्वी ३५०फुटावर गेलेलं वॉटर टेबल आता जलसंवर्धनामुळे ३० फुटावर आलं आहे ते, कापूस पिकून तो बाहेर जाऊ नये म्हणून दहा हजार लोकांना जॉब आणि शेतकऱ्यांना मार्केट मिळवून देणारं टेक्स्टाईल पार्क, आशियातील पहिली गोल्ड रिफायनरी, हो, गोल्ड रिफायनरीच, कुठल्याही किमतीला शेत जमीन न विकण्याची मानसिकता. हो हो, मी आपल्याच देशातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या अमरीश पटेल नावाच्या नेत्याने केलेली करामत केलेलं गाव विस्मयचकित होऊन बघत होतो.

आणि मग अकरा वाजता माझं Entrepreneurship Development वर बोलणं चालू झालं. पोरांना विचारलं, मराठीत बोलू का. होकार मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. आणि मग एकेरी, दुहेरी धावा घेत मग जसे चौके, छक्के बसू लागतात तसं ते भाषण रंग भरू लागलं. हंशे वसूल होऊ लागले अन प्रसंगी टाळयाही पडू लागल्या. माझा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. त्या मुलांचं अन प्रोफ़ेसरांचं काय मत झालं ते तेच जाणे, पण मी मात्र ते १२० मिनिटे खूप एन्जॉय केले. हो, तब्बल दोन तास बोलत होतो. ज्या तत्वांना धरून हा बिझिनेसची नैय्या हाकली, ते सगळे पत्ते ओपन केले. आणि प्रश्नोत्तराच्या वेळे नंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो कित्येक दिवस माझ्या कानात गुंजत राहील. त्या दोन मुली आभाराचे भाषण वाचत होत्या अन मी उभ्या जागी थिजलो होतो.

शप्पथ सांगतो, मिळेल त्या वाहनाने इंटर सिटी प्रवास करण्यापासून फ्रिक्वेन्ट फ्लायर झालेल्या अन १९९४ साली एम ८० वरून मार्केटिंग करत आज वातानुकूलित कार मध्ये बिझिनेस मिटींगला जाणाऱ्या राजेश पेक्षा हा वयाच्या १२ व्या वर्षी पहिलं भाषण ३ मिनीटेही न बोलू शकणारा आणि आता १२० मिनिटे extempore बोलू शकणारा राजेश मला स्वतः ला जास्त भावला. आयुष्य सार्थकी लागलं.

अशा प्रसंगी तो मिळालेला बुके वक्ता तिथं सोडून जातात. मी मात्र तो घेतला बरोबर. त्या गुलाबाच्या सुवसाबरोबर मी १२० क्षण मी अंगात भिनवून घेतले. माझ्या मनाच्या कुपीत ते क्षण आता बंदिस्त झाले आहेत.

ध्यानी मनी नसताना त्या कॉलेजने पाकीट हातात दिलं, मानधानचं. हे काही बोललो नव्हतो मी, पण पाटील सरांनी आग्रहाने घ्यायला सांगितलं. वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेल्या पहिला पगार अन आयुष्याच्या या टप्प्यात  दैनिक सामना ने सदर लिहिल्याबद्दल दिलेला चेक अन हे पाटील सरांनी दिलेलं पाकीट, प्रत्येक वेळी आनंदाची अनुभूती तीच. रक्कम किती ते महत्वाचं नव्हतंच कधी. भाव महत्वाचा.

आनंद शितोळे म्हणालेच आहेत "फेसबुक म्हणजे हातात मिळालेली जळती काडी आहे. मग तिने स्वतः ला च प्रकाश देणारी पणती पेटवायची, की दुसर्यांना प्रकाश दाखवणारी मशाल पेटवायची की सगळंच दहन करणाऱ्या मारुतीच्या शेपटीला आग लावायची, हे तुम्ही ठरवायचं"

मला मात्र आयुष्याला अर्थ देणारे अनेक अध्याय फेसबुकमुळे वाचायला मिळाले आणि अजून कित्येक वाचायला मिळतील या बाबत माझ्या मनात शंका नाही. 

No comments:

Post a Comment