Thursday 3 March 2016

कॉमेंट्स

मला काही मित्र सांगतात की पुस्तक काढ जे लिहितो त्याचं. मागे यावर थोडं लिहिलं होतं. फेसबुक किंवा ब्लॉग लिहिणं हा एक फॉर्म आहे. आपल्या क्रिकेट मध्ये कसं टेस्ट, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी तसं.  पुस्तक लिहायला एक कमिटमेंट लागते. फेसबुक वर मित्र यादीच्या १०-२०% लाइक मिळवणारा माणूस लेखक होऊ शकेल यावर मला शंका आहे. हं, कदाचित त्याच्यात लिहिण्याचा किडा असेल, पण ती सवय कल्टिव्हेट करण्यासाठी खूप पापड बेलावे लागतील.

फेसबुक वर लिहिलं जातं त्यात लांबीची फक्त काळजी घ्यावी लागते. रुंदी ची काळजी तुमचा स्क्रीन घेतो. मोबाईल, आय पॅड, डेस्कटॉप, काहीही असलं तरी रुंदी फिट बसते. बाकी फेसबुक वरच्या लिखाणाला खोली कुठे लागते? ती लागत नसल्यामुळे मी खूप फडफड करू शकतो. त्यामुळे कंटाळा न येईपर्यंत च्या लांबीत शब्द संपदा घुसडली की जमतं सगळं.

अगदी खरं सांगायचं तर, मला तर माझ्या पोस्ट वरच्या कॉमेंट्स जास्त आवडतात. म्हणजे, आता नावं लिहित नाही, काही मित्र अगदी कॉमेंट स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे ते पोस्टत नाहीत पण त्यांच्या कॉमेंट्स! क्या कहने. म्हणजे काही उत्तम लिहिणाऱ्या लोकांच्या कॉमेंट्स छान असतात च. पण मी लिहितो ती कॅटेगरी वेगळी. हे कॉमेंट पटू. प्रतिक्रियावादी. कधी संवादी तर कधी विवादी. त्यांच्या कॉमेंट्स मध्ये भावोत्कटता असते, अभिनंदन असतं, मैत्र असतं, हास्य असतं आणि कधी चीड ही. एक माझे मित्रवर्य असे ही आहेत की जे पोस्ट ला सहमत असतील तर लाइक ठोकून जातात अन नसतील तर खडूस, तिरसट अशी कॉमेंट आवर्जून करतात. माझे तर कित्येक ओळखीचे लोकं म्हणतात ही "राजेश, तु ठीक लिहितोस, पण त्या वरच्या कॉमेंट्स बहारदार असतात" मला तर हे ऐकून कधी कधी असं वाटतं की आपण काही न पोस्टताच कॉमेंट पडाव्यात.

मी स्वतः उत्तम कॉमेंट कर्ता नाही आहे. त्यामुळे मी कॉमेंटत नाही. मागे त्यामुळे आत्ममग्नतेचा माझ्यावर आरोप केला. म्हणजे काय तर मी माझ्याच पोस्ट वर बागडतो. खरंही असेल ते. पण पोस्ट लिहायची, कॉमेंट वाचायच्या, शक्य तिथे रिप्लाय द्यायचा अशी देशोन्नतीची कामं केल्यावर परत दुसऱ्यांच्या पोस्ट वाचायच्या अन त्यावर ही कॉमेंटायचं. खूप होतं ते. त्यामुळे अगदी वाचेल त्या पोस्ट वर कोमेंटायला होत नाही. आता काही पोस्ट असतात च अशा की जिथे प्रतिक्रिया क्रमप्राप्त असतं. आणि झालंय असं की पुण्यात 30 वर्ष राहिल्यामुळे दुसर्यांची स्तुती हात राखून करतो अन विद्रोह, अस्मिता वैगेरे भावनांशी तोंड ओळख नसल्यामुळे कॉमेंट पण एकदम सपक.

असो. तर सदर पोस्ट समस्त कॉमेंट कर्त्याना समर्पित. तुमच्या अशा विविध रसांनी ओथंबलेल्या कॉमेंट नसत्या तर हे प्रकरण फारच निरस असलं असतं.

आणि हो, आता मित्रांना सांगतोच आता की पोस्ट पेक्षा कॉमेंटचं संकलन करतो अन त्याचं पुस्तक काढू. माझ्या पोस्टीपेक्षा ते नक्कीच जास्त वाचनीय असेल. 

No comments:

Post a Comment