Tuesday 29 March 2016

भारती

कालच्या लेखात इंजिनियरिंग एक दु:स्वप्न असं लिहिल्यावर एका मित्राचा फोन आला आणि असं का म्हणतोस हे विचारलं. का कुणास ठाऊक मला भारती विद्यापीठाबद्दल विलक्षण अढी आहे. खरं तर कारण काहीच नाही. म्हणजे त्यांच्यामुळे मी डिग्री झालो आणि पुढे त्याचा मला खूप फायदा ही झाला. पण जी कृतज्ञतेची भावना शाळेबद्दल किंवा पॉलीटेक्निक बद्दल आहे ती या कॉलेज बद्दल नाही हे तितकंच खरं. याची काही कारणं ही असावीत:

- प्रायव्हेट कॉलेज हा कन्सेप्ट त्यावेळेस आजच्या इतका बोकाळला नव्हता. गव्हर्नमेंट कॉलेज ला admission नाही म्हणजे आपल्यात काही ग्रॉस कमी आहे असं वाटायचं. आजही बी ई कुठून झाला या प्रश्नाचं भारती विद्यापीठ असं उत्तर देताना हलकीशी कळ उमटतेच. COEP ला आपल्याला admission मिळाली नाही हा सल आजही आहे.

- वर्षाला आठ हजार फी. आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून भरलेली. आपल्या हातून काहीतरी मोठं पाप घडलं अशी भावना आज ही माझ्या मनात येते.

- बरीच नॉन महाराष्ट्रीयन मुलं. आणि प्रचंड श्रीमंत असायची ती. त्यांना महिन्याला येणारे पैसे ऐकून माझे डोळे विस्फारायचे. परत त्यांच्या गाड्या घोड्या. मी सायकलपटू. दरमहा रु २५० वाला. बुजलोच म्हणा ना. खेळात पीछेहाट. अभ्यास सोडून सगळ्या क्षेत्रात मागे.

- मराठी मित्र झाले. नाही असं नाही. पण ते बहुधा असेच मारून मुटकून आलेले असावेत. सगळ्यांनी चेहेऱ्यावर एक विचित्र मुखवटे चढवलेले. वेंधळेपणाचे, बेफिकीरपणाचे, बावळटपणाचे. अन मी बहुधा सभ्यतेचामुखवटा चढवला असावा.

- परत तिसऱ्या वर्षापासून बी जे चा नाद. प्रेमाचा पफलू तिकडं फिट होत होता. तशाही भारती च्या पोरी अजिबात घास टाकत नव्हत्या.

या अशा अनेक घटकांमुळे माझी आणि कॉलेज ची नाळ काही शेवटपर्यंत जुळली नाही हे खरं. नाही म्हणायला काही जणांना इंडस्ट्री मध्ये भेटत राहिलो. मग त्यात काझी आहे, राजेश देशपांडे आहे, नुकतंच प्रशांत नलावडे शी बोलणं झालं, गिरीश ची कंपनी जवळ आहे, केतन मध्ये येउन गेला. पण हे अगदी बोटावर मोजण्याइतके. मागच्या वर्षी  २७-२८ जण भेटले हॉटेल मध्ये. सगळ्यांशी ओळख रिव्हाईव करण्याचा भारी मौका होता. पण माझीच angioplasty झालेली २ सप्टे ला आणि हे रियुनियन होतं ६ ला. मी फक्त सगळ्यांशी गळाभेट करण्यापुरता गेलो. आता परत भेटायचं ठरलं तर जाईन नक्की.

जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींवर असोशीने प्रेम करणारा मी, या कॉलेज बद्दल मी खूपच अनभिज्ञ राहतो. इतका की त्याच्या समोरून जाताना मी एखाद्या जुन्या मित्राला टाळल्यासारखा अगदी नजर चुकवून जातो. 


No comments:

Post a Comment