Wednesday 30 March 2016

आसक्ती

माझ्या आयुष्यात अशी बरीच मंडळी आली, म्हणजे ही लोकं अशी की ज्यांना मी सुरुवातीला भेटलो तेव्हा सॉलिड इम्प्रेस झालो होतो. असं वाटायचं की माणसाने असं असावं. मग या लोकांशी माझे व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणामुळे संबंध आले. अर्थात नैतिक. दिवस सरत गेले, महिने गेले आणि वर्ष ही गेली. काळाच्या कसोटीवर मात्र यातील काही निष्प्रभ झाले. म्हणजे जगाच्या दृष्टीने असतीलही ते कर्तृत्ववान वगैरे पण माझ्या मनावरचा त्यांचा प्रभाव संपला. यातील काही लोकांना मी काही दिवसात जोखलं, तर काहींना ओळखण्यात महिने गेले. काही अति हुशार मंडळींनी कित्येक वर्षं मला गंडवल.

मनाचा तळ दिसणं फार अवघड असतं, नाही? कारण त्यावर कधी प्रेमभावाचं शेवाळं साचलं असतं तर कधी दोस्तीच्या आवरणाखाली तो तळ लपलेला असतो. काही जणांच्या मनावर हुशारीचा तवंग साचलेला असतो तर काही जण शूरपणाचा आव आणत जगत असतात. काहींनी अत्यंत व्यवहारकुशलतेचा मुखवटा घातलेला असतो. आणि आपण त्या बाह्य रुपाला फसतो. (ज्यांना पटतंय त्यांनी "आपण" बहुवचनी शब्द घ्यावा, ज्यांना नाही त्यांनी मी स्वत: ला आदरार्थी संबोधतो असे समजावे).

मग कधीतरी नियती नावाची अद्भुत शक्ती एक धक्का देते. पाणी डचमळतं. तो मुखवटा कधी स्वत:हून फेकून द्यावा लागतो तर कधी परिस्थिती तो ओरबाडून घेते. कुणीतरी असं औषध फेकतं की शेवाळं बाजूला होतं, तवंग हटतो. आणि मग तो मानवी मनाचा तळ दिसू लागतो. अगदी लख्ख.  आणि मग नजरेसमोर येतात कधी अत्यंत निर्बुद्ध तर कधी निर्ढावलेले नालायक चेहरे. शुरपणाच्या नावाखाली लपलेली अत्यंत भित्री जमात. व्यवहार कुशलतेच्या आवरणाखाली ओरबड्णारे अणकुचीदार नखं असलेले पंजे. दुसऱ्याचं भलं करण्याच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरणारे नराधम.

मग हे असं काही दिसल्यावर, काहींना दूर लोटता येतं. काहींना तो विधाता आपल्या वाटेतून अलगद बाजूला काढतो तर काहींना मात्र आपण झेलत राहतो. आयुष्यात फासे असे पडले असतात की मान पक्की अडकली असते. अन मग ही लोकं आपल्या आयुष्याचा भाग बनतात. सहनही होत नाही आणि सांगणार तरी कुणाला असा एक विचित्र तिढा बसतो. आपणही तळ दिसलाच नाही असा अभिनय करत राहतो. समोर दिसणाऱ्या आवरणाला चांदीचं मखर सजवण्यात धन्यता मानतो. परस्पर संबधातला रस निघून जातो, आयुष्य फरफट होतं आणि आपण सक्तीने जगण्याचा पर्याय निवडतो.

खरं तर अशा जगण्याला आसक्ती म्हणायला पाहिजे.  

No comments:

Post a Comment