Wednesday 16 March 2016

ड्रेसकोड

नवरत्न नावाच्या बिल्डिंग मध्ये आम्ही चौथ्या मजल्यावर राहायचो. दुसऱ्या मजल्यावर पाटील म्हणून कुटुंब राहायचं, रादर अजूनही राहतं. फारच मस्त कुटुंब आहे ते. पाटील काकू म्हणजे मायेचा झरा नुसता. आणि बोलण्याला थोडी ग्रामीण हेल. डोक्यावर कायम पदर घेणाऱ्या काकूंचे बोलणं म्हणजे कानाला मस्त वाटायचं.  नवरत्न सारख्या कॉस्मोपॉलिटीन इमारतीत त्यांनी आपलं मराठमोळं गावपण जपलं आहे. त्यांचा मुलगा बंटी आज पोलीस डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या कामगिरीवर तैनात असतो.

मी सांगतोय तो काळ 2001 च्या सुमारास. त्यावेळेस बंटी असावा विशीच्या आसपास.

त्याच दुसऱ्या मजल्यावर शिरसकर काकू अन त्यांची दोन मुलं राहायचे. मोनिका आणि समीर.  दोघंही बंटीला दादा च म्हणायचे. खूप निर्व्याज मैत्री आहे दोन्ही कुटुंबाची. तेव्हाही होती. मोनिका साधारण बंटी पेक्षा एखाद दोन वर्षांनी लहान.

दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक एकमेकांना ओळखायचे. दोन दशकापूर्वी अशी नाती असायची.

तर झालं असं की एके दिवशी मोनिकाच्या तीन चार मैत्रिणी तिच्या घरी राहायला आल्या. आता बंटी दादा ला त्यांची भेट घडवणं हे क्रमप्राप्त होतं.

दुसऱ्या दिवशी या पंचकन्यांचा मोर्चा बंटी दादा कडे. नव्या जमान्याच्या मुली त्या. शॉर्ट, स्लिव्हलेस बनियन टाईप काहीतरी टॉप. असा तो अवतार. आणि पाटलांच्या दरवाजावर थाप "बंटी दादा, हे बघ मी माझ्या मैत्रिणींना घेऊन तुझ्याकडे आली आहे" इति मोनिका

बंटी भौ, चड्डीत अन बनियन मध्ये सोफ्यावर तंगड्या पसरून टीव्ही पाहत होते. मोनिका चा आवाज आणि तिच्या बरोबर मैत्रिणी हे ऐकल्यावर तो तारुण्य सुलभ भावनेने ताडकन कपडे बदलण्यासाठी निघाला.

किचन च्या खिडकीतून पाटील काकूंना हा पोरींचा जत्था दिसला आणि त्या ओरडल्या "अरे बंटी दार उघड बाळा" बंटी लगबगीत म्हणाला "आलोच कपडे व्यवस्थित करून. चड्डी अन बनियन वरच आहे मी"

तर काकू आपल्या मस्त ग्रामीण भाषेत म्हणाल्या "आरं, नगं उगी लगबग करूस. त्या पोरीबी तसल्याच कपड्यात हायेत. गप, दार उघड".

चड्डी या विषयावर खूप चर्वण चालू आहे. म्हंटलं आपण पण हात धुऊन घ्यावेत.

(बाय द वे, वडाच्या झाडाला मी एकदा शायनिंग टाकत बनियन ट्री म्हणालो तर इंग्रजी माध्यमात शिकलेली आमची एक मैत्रीण फणकाऱ्याने म्हणाली, अरे ते बॅनियन ट्री म्हणायचं. काही नाही, लिहिता लिहिता आठवलं आपलं.

बॅनियन ट्री म्हणे)ड्रेसकोड

No comments:

Post a Comment