बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेपोटी काही जण खूप मोठी कंपनी सोडून एखादी छोटी कंपनी जॉईन करतात. त्यात काही चुकीचं आहे असेही नाही. पण सहसा हे यशस्वी होत नाही. त्याला काही कारणं आहेत.
एकतर मोठ्या कंपन्या, थोडक्यात मल्टी नॅशनल, ह्या सिस्टम ड्रीव्हन असतात. त्या सिस्टम्स, प्रोसेसेस खूप अभ्यास करून लागू केल्या असतात. ते करण्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत तज्ञ मंडळी काम करत असतात. त्या सिस्टमने आखलेल्या सीमेच्या आत राहून काम करत राहिलं की रिझल्ट्स येत जातात. तुम्ही फार क्रिएटिव्ह नसलात तरी चालून जातं. काम करण्यात शिस्त असेल तर सिस्टम तुम्हाला रिझल्ट्स आणण्यात मदत करते.
छोट्या कंपन्या या पर्सन ड्रीव्हन असतात. तिथे एकतर सिस्टम्स नसतात. तुम्हाला सिस्टम्स लावाव्या लागतात. पण त्या लावण्यासाठी कंपनीच्या मालकाची मानसिकता असावी लागते. त्याउपर तुम्हाला ही क्रिएटिव्ह असावं लागतं. त्या सिस्टम्सचे रिझल्ट दिसायला वेळ लागतो. कंपनीच्या मालकाने जर सिस्टम्स लावण्यासाठी पैसे खर्च केले असतील तर तो ते रिझल्ट बघण्यासाठी उतावीळ झाला असतो. ते जर आले नाहीत तर तो ह्या मोठ्या कंपनीतून आलेल्या माणसावर आगपाखड करू लागतो.
त्यामुळे जर कुणी मोठ्या कंपनीत काम केलं असेल, अन त्यातल्या त्यात ती जर मल्टी नॅशनल असेल, तर त्याने देशी आणि छोट्या कंपनीत जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा. मल्टी नॅशनल च्या सिस्टम्स मध्ये तुम्ही फार काही लुडबुड करू शकत नसल्यामुळे नैराश्य येतं. आणि या नैराश्यावर मात करण्यासाठी मग हा प्रोफेशनल निम्म्या किंवा पाव टर्नओव्हर च्या कंपनीत जायचं ठरवतो. पण तिथं त्याची गत आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी होते.
एखाद्या मल्टी नॅशनल चा अनुभव आहे आणि तिथल्या सिस्टम्स पेक्षा कुणाला वेगळं करून दाखवायची खाज असेल तर त्याने छोटी कंपनी स्वीकारताना त्याच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचं स्वातंत्र्य मिळेल का याची खातरजमा करून घ्यावी नाहीतर सरळ स्वतः चा बिझिनेस टाकावा.
मल्टी नॅशनल सारख्या कंपन्या हे अदरवाईज पर्सनल आणि कुटुंबाचं आयुष्य भौतिकदृष्ट्या सुखी करण्यासाठी आदर्श जागा आहे, असं माझं मत आहे......अगदी सोन्याचा पिंजरा वगैरे म्हंटलं तरीही.
No comments:
Post a Comment