Monday, 12 June 2017

रायगड

"तुला रायगडावर काय आवडलं" रविवारी तिथे जाऊन आल्यावर नील ला विचारलं. तो म्हणाला "मला ट्रेक आवडला"

"आणि तुम्हाला" नील ने विचारलं

मी म्हणालो "ते गाईडने सांगितलं ते"

"गड बांधून झाल्यावर महाराज गडाच्या आर्किटेक्टला, हिरोजी इंदुलकर, यांना विचारतात, काय बक्षिसी देऊ. तर हिरोजी म्हणतात "महाराज, दररोज तुम्हाला माझी आठवण यावी अशी काही तरी बक्षिसी द्या". महाराज विचारात पडतात. आणि हिरोजींना म्हणतात "तुम्हीच सांगा" तर हिरोजी उद्गारतात "ज्या पायरीवर पाय ठेवून तुम्ही जगदीश्वराचे दर्शन घ्यायला जाता, त्या पायरीवर लिहा

"सेवेसी ठायी तत्पर
हिरोजी इंदुलकर"

काय तो राजा अन काय त्यांचे सहकारी. भाग्य लागतं अन करिश्मा पण लागतो. 

हं म्हणत नील विचारतो

"पण तो गाईड शिवाजी महाराजांबद्दल सांगत होता तेव्हा तुम्ही रडत होता असं दादू म्हणाला. का?"

मी सांगितलं "अरे काय एक एक प्रसंग. महाराज मृत्यूशय्येवर आहेत अन हिरोजी फर्जंद त्यांना म्हणतात "महाराज, आग्र्याला तुमच्या जागेवर झोपलो. आज सुद्धा मी तुमच्या जागेवर झोपतो. यम मला घेऊन जाईल अन तुम्ही या दरवाजातून निघून जा. बाजीप्रभू म्हणतात, "राजे, तुम्ही जावा. आमच्यासारखे लाख मेले तरी चालेल, पण त्यांचा पोशिंदा जगलाच पाहिजे" तानाजी म्हणतात "आधी लगीन कोंढाण्याचे, अन मग रायबाचे". उण्या पुऱ्या पन्नास एक वर्षाचं आयुष्य. त्यात असे जीव देणारे सहकारी भेटणं हे पाहून गदगदून येतं रे. त्याचं महत्व हे जर तू कधी आयुष्यात लीडर झालास तर लक्षात येईल तुझ्या.

काय अफाट आयुष्य जगले महाराज. ते कवी भूषणचं काव्य. त्यांच्या कर्तृत्वावर प्रेम दाटून येतं अन मग आपसूक डोळ्यातून पाणी वाहू लागतं"

"अच्छा, तुम्हाला जर इतकं त्यांच्या बद्दल प्रेम वाटतं तर तुम्ही ते बाकीच्या लोकांसारखं जय भवानी, जय शिवाजी वगैरे ओरडत नव्हता. किंवा भगवा झेंडा घेऊन तुम्ही पुतळ्याशेजारी उभं राहून फोटो का नाही काढला?" नीलने विचारलं.

काय सांगावं आता या पोराला. त्याला कितपत कळलं ते माहीत नाही, पण सांगितलं त्याला की "हे असलं दिखाऊ प्रेम काही कामाचं नाही. महाराज मनात पाहिजेत. त्यांचा जगण्याचा उद्देशच किती उदात्त अन उन्नत होता. असा आकाशाला गवसणी घालणारा उद्देश असला की मग भव्य दिव्य हातून घडतं की चार शतकांनंतर ही त्यांची कहाणी ऐकली की उर अभिमानाने भरून येतो"

अर्थात महाराजांच्या मानव्याला देवत्वाच्या चौकटीत जखडणार्या या जगात नीलच्या मनात ते किती काळ राहील हा एक प्रश्नच आहे.

No comments:

Post a Comment