Saturday, 3 June 2017

बेफाम

परवा श्रीने विचारलं "बेफाम जगायचं आहे राव. काय करायला हवं?"

बेफाम जगण्यासाठी एक तर पोटात आग असायला हवी नाहीतर डोक्यात. आणि जेव्हा इथल्या आगी विझल्या असतील तर मग मात्र बुडाखाली आग लावावी लागते. खूप अवघड असतं  ते. स्वतः च स्वतः च्या बुडाला वात पेटवणं.

आणि मग आपण पुस्तकं वाचतो. नारायण मूर्ती, कलाम सर, सुब्रतो बागची, स्टीव्ह जॉब्स, बिल गेटस, कॅप्टन गोपीनाथ यांना  आपण मनोमन मार्गदर्शक मानू लागतो मेंटॉर. कधी आपण जिते जागत्या लोकांमध्ये आपण असे मेंटॉर शोधत असतो. मला असे खूप लोकं भेटले. एस के एफ मध्ये असताना असाध्य आजारावर विजय मिळवून आज अहमदाबाद चा प्लांट हेड असलेल्या अजय नाईक मध्ये, रॊलॉन मध्ये माझा एम डी संजीव शहा आणि मॅनेजर बोनी पॉल मध्ये, कस्टमर म्हणून जायचो पण ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने हरखून जायचो अशा असंख्य लोकांमध्ये.  टॅक्सी ड्रायव्हर मध्ये, बँक मॅनेजर मध्ये, सप्लायर मध्ये अगदी कुणीही हा मेंटॉरचा रोल निभावून जातं. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या उद्योजकांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी कसे उद्योग उभे केले हे ऐकताना पगलावून जायचो आणि त्यांनी दर्शवलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न केला. मार्गदर्शक. मेंटॉर.

बरं ही मार्गदर्शक लोकं स्वतः ला आरामशीर कॅरी करतात. म्हणजे त्यांच्यात तो गुरु बिरू चा आवेश नसतो. ते तुम्हाला फार शिकवतात असाही त्यांचा अविर्भाव नसतो. त्यांच्या बोलण्यातून ठिणग्या उडत असतात. अन एखादी ठिणगी आपल्या मनातील ज्योत पेटवून जाते.

प्रश्न असा आहे की आपल्यातली बारूद जिवंत आहे का? की  सुखासीनतेच्या आवरणाखाली ही बारूद ओली होऊन त्याच्यातली जान थंड झाली आहे.


No comments:

Post a Comment