Friday, 2 June 2017

पांढरपेशा मंडळींचे हित

उत्पादन क्षेत्रातील कुठलाही उद्योग मॅनेज करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

१. रॉ मटेरियल: मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रॉ मटेरियल ची उपलब्धता हा कळीचा मुद्दा असतो. ते जर कुणाच्या लहरीवर अवलंबून असेल तर तो उद्योग अनिश्चततेच्या भोवऱ्यात सापडतो. 

२. संकटाना सामोरे जाण्याची ताकद: आमच्या क्षेत्रात जी संकटे येतात ती मानव निर्मित असतात. उदा: क्रूडचे भाव कमी जास्त होणे, निश्चलनीकरण, कुठे युद्ध होणे वगैरे. ती मानवामुळे आहेत त्यामुळे त्याची व्याप्ती ही नियंत्रित असते आणि तिला सामोरे जाण्याची ताकद आम्ही बाळगून असतो. 

मानव निर्मित संकटाबरोबर निसर्गनिर्मित संकटे आम्हाला कधी फेस करावी लागत नाहीत. ती जर आलीच तर आम्ही उद्योजक हतबल होऊ. 

३. आम्ही जे बनवतो ते नाशवंत नसते. म्हणून गरज पडलीच तर आमचा भाव येईपर्यंत आम्ही वस्तू स्टोअर करून ठेवू शकतो. 

४. स्किल्डमनुष्यबळ: आमच्या उद्योगात मनुष्यबळ लागते. त्यासाठी आयटीआय ते आयआयटी अशी शिक्षणाची चेन गेल्या साठ वर्षात शासनाने तयार केली आहे. ती जर नसेल तर आमचं येड पळलं असतं. हें असे शिक्षण असल्यामुळे आम्ही वस्तू उत्पादन क्षेत्रातील लोकं सातत्याने सुधारणा करू शकतो. 

५. आर्थिक ज्ञान: मी स्वतः जरी अभियंता असलो तरी व्यवसाय करण्यासाठी लागणारे बेसिक अर्थशास्त्राची माहिती मला आहे, ज्ञान नव्हे. कर्ज कधी घ्यावं, त्यासाठी लागणारे ठोकताळे याची जुजबी का होईना माहिती आहे, ज्ञान नव्हे. अर्थात बेधुंद कर्ज घेणारे आणि नंतर हात पोळून घेणारे अनेक उद्योजक मला माहित आहेत. 

६. बाहेरच्या माणसाचे ज्ञान: आमच्या उद्योगात बऱ्याचदा आम्ही आम्हाला काही कळत नसेल तर बाहेरच्या माणसाला बोलावतो. त्याला बहुतेकवेळा आमच्या बिझिनेसचं  काहीही कळत नसतं, तरीही तो जे सांगेल ते आम्ही निमूटपणे ऐकतो. त्यातलं जे आमच्या उद्योगासाठी महत्वाचं आहे, ते उचलतो. आणि बहुतेकवेळा हा तिसरा माणूस आमच्या बिझिनेस मध्ये सोल्युशन देऊन जातो. 

७. असोसिएशन: उत्पादन क्षेत्रातील बरेच उद्योग, हे कोणत्यातरी असोसिएशनला संलग्न आहेत. तिथे अगदीच धुतल्या तांदळासारखी माणसं नसतात, पण शासनाला योग्य डेटा देऊन त्यांच्याकडून उद्योगाला लागणारे टॅक्स स्ट्रक्चर, सवलत यासाठी पाठपुरावा करतात. याचा थोडा का होईना पण उद्योगाला फायदा होतो. 

८. कुठलाही उद्योग फुलण्यासाठी एक इको सिस्टम लागते. ती तयार करण्याची जबाबदारी सरकारची असते. ती योग्य पद्धतीने वापरायची कुवत समाजामध्ये असावी लागते. सिस्टम नसेल तर हजारो हातांची क्रयशक्ती वाया जाण्याची शक्यता असते. 

९. तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या उद्योग क्षेत्रात काम करतो तो नसला तरी जग मरणार नाही. आपल्याकडे एक मोठा उद्योग हातात आहे, त्या उद्योगातून तयार होणाऱ्या गोष्टी या माणूसजातीला जगवतात. त्याकडे शासनाचे आणि एकूणच समाजाचे होणारे दुर्लक्ष हे अनाकलनीय आहे. त्या उद्योगाला सावत्र मुलाची ट्रीटमेंट देऊन बाकी निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या उद्योगाला अति प्रोत्साहन देणं हे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखं आहे. डेन्मार्क, न्यूझीलंड ने जसं दूधदुभत्याचे पदार्थ बनवून जगात श्रीमंत देश बनवले तशी संधी आपण राज्यकर्त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या नतद्रष्टतेपायी आणि दूरदृष्टीच्या अभावापायी गमावली आहे. त्या पलीकडे जाऊन आर्थिक विषमतेची दरी तयार करून तथाकथित मध्यमवर्गीय हे या उद्योगाची टिंगलटवाळी करतात हे दुर्दैवी आहे. 

तेव्हा ब्ल्यू कॉलर आणि व्हाइट कॉलर वाल्या स्त्री पुरुषहो आणि राज्यकर्त्यानो

काळ्या रंगाशी इमान राखणारा या देशाचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या ताकदवर बनण्यात बाकी पांढरपेशा मंडळींचे हित आहे. 

No comments:

Post a Comment