Saturday 10 June 2017

नेटसम्राट

To be or not to be, that is the question.

लॉग इन असावं की डी ऍक्टिव्हेट व्हावं हा एकच सवाल आहे

या सोशल मीडियाच्या कचराकुंडीत
एका पोस्टचा थ्रेड पकडून
नाचावं उसन्या आनंदाने
की खोटं रडावं, चिडावं
अन मग फेकून द्याव्यात त्या भावना
कुठल्या तरी सर्व्हर मध्ये सडत राहण्यासाठी.
आणि मग करावा लॉग आउट
एकाच क्लिकने
व्हाट्स अप, इन्स्टाग्राम अन फेसबुकचा सुद्धा

इथल्या जात्यंधतेच्या नागाने
असा डंख मारावा
की भिनत जावं ते विष
हळूहळू
अन त्यातून कधी बाहेर पडू
लागलो तर

इथेच तर मेख आहे
खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांशी
दोन हात करण्याची ताकद नसते
म्हणून आम्ही खेळत असतो
लुटुपटू खुश होणं अन चिडणं
कधी सहन करतो, कधी वार करतो
खोटेपणाचा मुखवटा चढवून

आणि अखेर असाह्यतेचं बोट वापरून
क्लिक करतो लॉग इन होण्यासाठी
आमच्याच मारेकऱ्याच्या साईटवर

हे मार्कंडेया, तू इतका चालू कसा निपजलास?
एका बाजूचे मित्र आम्हाला "बॉर्डर वर जा" म्हणून हिणवतात
तर दुसऱ्या बाजूचे मित्र "एसीत बसू नका" म्हणून ओरडतात
मग आभासी जगाला चटावलेलं हे मन घेऊन
हे झुकेरबर्गा
आम्ही डबल ढोलकीवाल्यानी
कोणा साईटच्या लॉगइन मध्ये बोट खुपसायचं
कोणत्या-लॉग इनमध्ये- कोणत्या




No comments:

Post a Comment