रेल्वे मला खूप आवडते. गेले काही वर्षे मी सेकंड एसी ने प्रवास करतो. त्यातून प्रवास करताना सहसा मला साईड बर्थ मिळतो, बहुतेकदा लोअर साईड बर्थ. या साईड बर्थची गंमत आहे. सेकंड एसी मध्ये असला तरी त्या जागेची काही दुःख आहेत. मेन कुपेमधील लोकं साधारणपणे या बर्थच्या लोकांकडे दुर्लक्ष करतात. का कुणास ठाऊक पण रेल कोच अटेंडन्ट सुद्धा साईड बर्थवाल्यांशी जरा हाडतुड करत बोलतो, असं मला वाटतं. बऱ्याचदा मला ब्लॅंकेट किंवा नॅपकिन दिलं नाही असा अनुभव येतो तो या जागेवर बसलं की.
सेकंड एसी मधून कधी प्लॅटफॉर्म वर उतरलं की मी छाती ताणून चालतो. पण साईड बर्थची दुःख काय आहेत ते मला चांगलं माहीत आहे. एक तर दोन्ही बाजूने तो बर्थ अर्धा पडत असल्यामुळे मध्ये एक गॅप पडते. झोपल्यावर ती फार तापदायक असते. मुळात साईड बर्थ ची लांबीमध्ये मी मावत नाही. त्यात त्याची रुंदी पण कमी असते.
या साईड बर्थ वर मांडी घालून बसलं की पायाला सॉलिड कळ लागते. तिथे जेवताना ताट ठेवायला नीट जागा नसते. नेहमी काहीतरी सांडउबड होते. इतकंच काय पण तिथे पाण्याची बॉटल ठेवायला जागा नसते. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे तिथे मोबाईल चार्जिंगचा पॉईंट पण नसतो. आपल्या काही गोष्टी ठेवण्याचा कप्पा हा पाठीशी असतो त्यामुळे तिथे नीट बसता पण येत नाही.
त्या साईड बर्थ वर झोपलो की मधल्या गल्लीतून फिरणाऱ्या लोकांचा हात लागतो, कधी बॅग चं हँडल लागतं. मेन कुपेतील लाईट बंद जरी होत असतील तरी गल्लीतील लाईट मात्र चालू असतात. या गोष्टींमुळे झोपमोड होते.
साईड बर्थ वर मला बरेचदा आर ए सी मिळते. म्हणजे एकाच सीटवर दोघांनी मिळून प्रवास करायचा. अशी सीट मिळताना मला नेहमीच पुरुष जोडीदार मिळाला आहे. एकदा वैभवीला आणि मला आर ए सी त एकंच साईड बर्थ मिळाला होता. मी गुलुगुलु विचार करत पोहोचलो तोवर टी सी ने मला चार कुपे सोडून दुसरा बर्थ ऍलोट केला होता, अर्थात साईड अप्पर.
हा साईड बर्थ मध्यमवर्गीय माणसाला रिप्रेझेन्ट करतो. मेन कुपे मधील लोकं श्रीमंत वर्गातील असल्यासारखी वागतात. प्लॅटफॉर्म वरील सेकंड क्लास च्या माणसासमोर मी शायनिंग टाकत उतरतो. ती माझ्याकडे असूयेने पाहत असावीत असा माझा गैरसमज असतो. माझा शायनिंगचा अविर्भाव असला तरी आत बोगी मध्ये माझी कशी सॉलिड लागलेली असते हे माझं मला माहित असतं. पण हे सांगणार कुणाला? श्रीमंत लोकं माझ्याकडे ढुंकून पण बघत नसतात, अन प्लॅटफॉर्म वरच्या सो कॉल्ड गरीब वर्गाला माझी कैफियत सांगण्यात मला एक तर लाज वाटते किंवा इगो आडवा येतो.
अशी ही साईड बर्थ ची सीट. माझ्यातल्या मध्यमवर्गीय माणसाचं चपखल प्रतिनिधित्व करते. म्हणून मी त्या सीटच्या प्रेमात असतो.
अर्थात त्याशिवाय मला काही चॉईस नसतो.
No comments:
Post a Comment