Saturday 6 September 2014

सुपारी

खरंतर गणपती विसर्जन आमच्याकडे धार्जिणं नाही. म्हणजे आमचे पूर्वज पुरोगामी विचाराचे होते. (पुरोगामी शब्दाला पर्यायी शब्द सापडला नाही, मला माफ करा पूर्वजांनो). थोडक्यात त्याच मूर्तिची आम्ही दरवर्षी पूजा करावी असं अभिप्रेत  होतं. पण नंतर २० व्या शतकाच्या सुरूवातीला माझ्या पणजोबांनी किंवा खापरपणजोबांनी दरवर्षी नवीन मूर्ती आणायचं ठरवलं असावं. (कुठलं विशेषण वापरू, नाही तर नको राहू देत, शेवटी मी पडलो त्यांचा वशंज) माझे वडील एम एस ई बी त होते (अरे, अरे असं चिडून नका बघू, administrationसाईडला होते). बदली होणारी नोकरी. क्वार्टर मधे रहायचो. जितके वर्ष रहायचो, तितके गणपती जमा व्हायचे. क्वार्टर सोडून जाताना, येणार्या कुटुंबाला सांगून जायचो, मूर्ती तुम्ही विसर्जित करा. १९९९ साली आम्ही स्वत:च्या घरात रहायला आलो. तेव्हापासून मंडळाला देतो, अन सांगतो विसर्जन करा हौदात. कुठे करतात गणपती जाणे. मी आईला सांगावं म्हणतो, की विसर्जन नाही तर एकाच मुर्तीची दरवर्षी पूजा करू यात. पण घाबरतो. याबाबतीत आई फारंच चिडते माझ्यावर.

आता आजचीच गोष्ट घ्या. गौरी विसर्जन झालं. (इथे मात्र त्याच मुर्त्या दरवर्षी पूजतो) निर्माल्य जमा झालं.

आई: वैभवी, जरा ते निर्माल्य सांग लॅबच्या मुलाला टाकण्यासाठी.
मी: मी टाकतो.
आई: नको, तु कचर्याच्या पेटीत टाकतो
मी: अगं, कचराच तो. खरंतर घरातल्याच कचरापेटीत टाकायला पाहिजे. तुला वाईट वाटेल म्हणून कंपनीच्या जवळच्या कचरापेटीत टाकतो.

मी घेऊन जाताना आई काहीतरी पुटपुटते, माज आलाय किंवा तत्सम.

रात्री सलूनला गेलो होतो. (हां हां, ते unisex सलून नाही बरं, आॅल मेन.) डोकं भादरल्यावर मला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, दरदरून घाम आला, चक्कर आली. रिझवानला बोललो, मला दुकानाच्या बाहेर ने. बाहेर त्याने खुर्ची ठेवली. मी कसाबसा धडपडत त्यावर बसलो. मेडिटेशन मधे कसं तुम्ही वेगळ्या विश्वात जाता (हो, तुम्हीच, मी कधीच नाही) तसं ३-४ मिनीटे मी ट्रान्स मधे होतो. २८ आॅगस्ट ला डाॅ हरदास यांच्या नावाने कडकडीत ₹ ४००० ची पावती फाडली होती. स्ट्रेस टेस्ट, एको, ब्लड रिपोर्ट टकटकीत होते. रिझवानने फुस फुस पंपाने पाणी मारलं अन मी हळू हळू पृथ्वीवर आलो.

घरी आलो, वैभवीने बीपी चेक केलं लो झालं होतं बहूधा. आईला सांगितलं हे सगळं. "करा अजून मस्ती. शिलशिल करत होतास जास्त. तो बघतो आहे वरून. बरोबर झटका दाखवतो" माता उवाच.

आई असं घाबरवते, त्यामुळे लहानपणापासून मी पुरो..... जाऊ दे शिविगाळ नको बाप्पाच्या लेखात
*********************************************************************************

मी, वैभवी आणि नील (वय दहा वर्ष) कुठेतरी निघालो होतो. नील ने ९३.५ एफ एम लावलं होतं. कुणीतरी आर जे, बिनकामाचं हसत ओरडत होतं. आणि तितक्यात संगीताचा महामेरू हनीसिंग यांच्या सुश्राव्य आवाजातलं "चार बोतल व्होडका" हा आजच्या काळातील अभंग चालू झाला. मग मात्र माझी सटकली (हे राम, त्याचंच ना हे पण) आणि मी चॅनेल बदलला. नील वदला " का बदललं" मी बोलल " अरे कसले घाणेरडे शब्द आहेत त्या गाण्याचे. काही अर्थ आहे का त्याला" हे बोलेपर्यंत मी लावलेल्या चॅनेल वर "जलते है जिसके लिएँ, तेरी आँखों के दिये" हे तलतचं नितांत सुंदर गाणं लागलं होतं. नील परत मागच्या सीटवरून करवादला " हं सांगा बरं या गाण्याचा अर्थ. कसलं भंगार गाणं आहे" आता काय बोलणार यावर कप्पाऴ.
********************************************************************************

हे आहे हे असं आहे. पन्नाशीला पोहोचेल मी चार वर्षात. एक मुलगा आणि बाप म्हणून समाजमान्य असलेली बरीच कर्तव्ये पार पाडली आहेत तरीही मागच्या आणि पुढच्या पिढीच्या अडकित्यात सापडलेला असा सुपारीचा खांड आहे.


No comments:

Post a Comment