Tuesday 16 September 2014

इंजिनियर्स डे

तसं म्हंटलं तर मी स्वत:ला हाडाचा इंजिनियर समजतो. (अरे, हाड़ हाड़ कोण म्हणतंय) (माझी बायको मात्र हाडाची डाॅक्टर नाही तर ती pathologist आहे अशी दळभद्री कोटी करण्याचा अनावर मोह झाल्यामुळे मुळ पोस्टमधे न लिहीता कंसात लिहीतो). पण त्यामुळेच असेल पण डाॅक्टर्स डे चा जेवढा बोलबाला फेसबुकवर झाला तेव्हढा इंजिनियर्स डे चा नाही झाला असं मला वाटलं. तेव्हा आपलाच डंका आपणच वाजवावा. असो.
परवाच WhatsApp वर इंजिनियरचे गुण म्हणून एक मेसेज आला तो बहुधा college going engineer चा असावा. स्वत:ला अभियंता जमातीचा प्रतिनिधि समजत असल्यामुळे मग मी माझे खालीलप्रमाणे अवगुण लिहीले. मला असं उगाचच वाटतं की ते सर्व इंजिनियर ला लागू असावे.
१) jack of all, master of none ही म्हण पहिला इंजिनियर जेव्हा तयार झाला, तेव्हा प्रचलित झाली असावी.
२) इंजिनियरला कामावरून सुट्टी घेणं म्हणजे पाप वाटतं.
३) इंजिनियरला ५००० रू चा सुट किंवा २०० रूपयाची बनियन घ्यायला सारखाच वेळ लागतो.... ५ मिनीटे
४) इंजिनियर कंपनीच्या कामाला एकाच स्थितप्रज्ञतेने जातो, मग ते स्वित्झर्लंड असो वा मालेगाव.
५) इंजिनियर आर्थिक व्यवहारात मुर्ख असतो.
६) "काय रे अभ्यास केला का?" पोराला इतकं विचारलं म्हणजे बाप म्हणून कर्तव्य पूर्ण झालं असं इंजिनियर मानतो.
७) दात घासण्याचा ब्रश सोडून बाकी ब्रश वापरायला फारसं आवडंत नाही उदा: दाढीचा, शू पाॅलीश आणि रंगाच्या ब्रशशी त्याची विशेष दुश्मनी.
८) इंजिनियरचा कामाचा टेबल हा भरलेला असेल तरच तो काम करतो असं त्याला स्वत:ला वाटत असतं.
९) इंजिनियरला कपडे अंग झाकण्यासाठी, खाणं पोट भरण्यासाठी आणि ड्रिंक्स (घेत असेल तर) डोक्याला मुंग्या येण्यासाठी आहे इतकंच माहित असतं. थोडक्यात त्याला color plus आणि Peter England, ऊँची lobster आणि prawns किंवा glenfidich आणि royal stag यांच्यातील किंमतीच्या फरकाशिवाय दुसरं काहीच कळत नाही.
आणि काडी लावणारा शेवटचा मेसेज. हा मला माझा फेसबुकवरचा प्यारा दुश्मन अनिकेत यांनी पाठवला.
१०) इंजिनियर परदेशी टूरवर बायकोला घेवून जात नाही. एकवेळ तो टूर कॅंसल करेल, पण .....
इंजिनियर असून यामधील एकही गूण नसेल तर तो अपघातानेच या profession मधे आला असावा.
ता.क. सदर गुण हे फक्त पुरूष इंजिनियरचेच आहेत.
तेव्हा सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा. (इथे स्त्री अभियंतापण)

No comments:

Post a Comment