Sunday, 4 April 2021

सुरेश-

"झाले बहू, होतील बहू, या सम हाच" ही उक्ती सार्थ करणारा माझा भाऊ, सुरेश पाठक, २८ मार्च ला आम्हाला सगळ्यांना दुःखसागरात लोटून निघून गेला. खूप आठवणी आहेत त्याच्या. त्याच्या मनाचा मोठेपणा हा की आयुष्यभर सर्वांचे फक्त सद्गुण पाहणारा तो. कोणाविषयी काही वावगं बोललं तरी लागलीच म्हणणार "जाऊ दे गं, आपण आपलं कर्तव्य करावं आणि बाकी सोडून द्यायचं." निरागस हसणारा आणि दुसर्यांना हसवणारा. त्याच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर फेर धरून नाचत आहेत. 

माझ्या काकांना चार मुलं आणि आत्यालाही चार मुलंच. आजी माझ्या वडिलांना म्हणायची "इथं हैद्राबाद मध्ये आठ मुलंच आहेत. तुझ्या चार मुलींपैकी एक इकडे पाठवून दे." त्या आजीच्या आग्रहामुळे माझी रवानगी परभणीहून हैद्राबाद ला झाली, माझ्या काकांकडे, म्हणजे सुरेशच्या वडिलांकडे. तेव्हा मी दुसरीत होते. हैद्राबाद मोठे शहर. काका आणि आत्या, दोघांचे घर सुलतान बाजारात होते. घराजवळ डावरे स्कुल होती. त्या शाळेत सुरेश, अत्याचा मुलगा शरद आणि मी असे सारे जायचो. हैद्राबाद मोठं शहर, त्यामुळे मी थोडी घाबरायची. पण सुरेश माझ्या पाठीशी असायचा. मला मार्क चांगले मिळायचे. तो वैतागायचा. म्हणायचा "तुला जास्त मार्क मिळतात म्हणून मला मी अभ्यास कमी करतो म्हणून सगळे बोलतात.तू जरा अभ्यास कमी करत जा." शाळेतून घरी येताच आम्ही लगेच खेळायला बाहेर पळायचो. सर्व भावात मी एकटी बहीण. पण विटीदांडू, लगोरी, पतंग उडवणे या सगळ्या खेळात मला सहभागी करून घ्यायचे. गच्चीवर तो पतंग उडवायचा आणि मी त्याच्या मागे चक्री घेऊन फिरायची. या सगळ्यामुळे मी खेळात अगदी प्रवीण झाले आणि शाळेत टीमची कर्णधार झाले. 

पुढे मग भाषावार प्रांतरचनेत हैद्राबाद आंध्र प्रदेश मध्ये गेलं आणि मराठवाडा महाराष्ट्रात आलं. त्यावेळेस माझे काका, सुरेशचे वडील सीतारामपंत पाठक, हे मुंबईला कोर्टात रजिस्ट्रार म्हणून गेले आणि मी परभणीत परत आले. कारण मुंबईत जायची माझी डेअरिंग नव्हती. अर्थात सुरेश पुन्हा आयटीआय करण्यासाठी आमच्या घरी परभणीला आला. त्यामुळे आमची जुगलबंदी चालूच असायची. पुढं माझं लग्न झालं आणि मी मंडलिक झाले आणि सुरेश चं लग्न वाशिमच्या माळोदे घरातील सुनीताशी झालं. सुनीता वहिनी पण सुगृहिणी. सुरेशने आई वडिलांची प्रचंड सेवा केली आणि वहिनींनी त्याला तितकीच साथ दिली. घरात कायम पाहुण्यांची वर्दळ असायची. वहिनी आणि सुरेश खूप आदरातिथ्य करायचे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. मला दोन मुले. अनेक दिवाळी आणि राखीपौर्णिमा ला आम्ही भेटत राहिलो. बहीण भावाचं नातं अजून घट्ट होत गेलं. आम्ही पुण्यात आलो, अन सुरेश आमच्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला हजर व्हायचा. सकाळी यायचा, दहा ते दुपारी चार आम्ही हास्य जत्रेत मश्गुल असायचो. रात्री तो परत ठाण्याला जायचा. 

मध्ये दुर्दैवाने त्याच्या मुलाचे, सचिनचे, निधन झाले. पण त्याची वाच्यताही तो कुठे करत नसे. ते दुःख तो कधीच कुरवाळत बसला नाही. त्याला त्याच्या सर्वच भाच्यांचं विशेष कौतुक. माझ्या मुलांचा पण त्याला खूप अभिमान. त्यांचं शिक्षण, व्यवसाय याचा त्याला विलक्षण अभिमान होता. राजेशने कुठं कविता म्हंटली, किंवा त्याचं कॉलेज मध्ये भाषण वगैरे झाले की सुरेश मला आवर्जून फोन करायचा आणि राजेशची भरभरून स्तुती करायचा. उन्मेषच्या बांधकामाच्या व्यवसायाचं त्याला कौतुक होतं. त्यानेच बांधलेली राजेश ची फॅक्टरी बघायची त्याची इच्छा अपुरी राहिली. 

त्याची मुलगी सुचेता ही खऱ्या अर्थाने कन्यारत्न आहे. जावई तुषार आणि नातू अथर्व यांचा त्याला सार्थ अभिमान. अथर्व आणि त्याचं नातू-आजोबाचं नातं मोठं मोहक होतं. सुचेताच्या सासूबाईंची पण तो नेहमी तारीफ करायचा. हे कौटुंबिक सुख मात्र त्याला भरभरून मिळाले, याचं मला समाधान वाटतं. 

त्याचा जवळपास मला दररोज फोन असायचा, सकाळी आठच्या सुमारास. दररोज फोन आला तरी आम्हाला गप्पाना कधीच तोटा नव्हता. अथर्वची अमेरिकेतली खबरबात, परभणीतील मुक्ताजीनचे सोनेरी दिवस, हैद्राबादच्या आठवणी, इतर नातेवाईकांची चौकशी असे अनेक विषय असायचे. आयुष्य हसून खेळून जगायचं हे मी त्याच्याकडे बघून शिकले. त्याच्यापेक्षा मोठ्यांशी आणि वयाने लहान असणाऱ्यांशी तो एकाच सहजतेने बोलायचा. कुठल्याही दुःखाला न गोंजारता, दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणारा असा माझा भाऊ!

लहानपणी मला एकटीला सोडून तू  पळत निघायचा आणि मग काका किंवा आत्या तुला बोलायचे की बेबीला एकटं सोडून का पुढे पळतोस. आताही परत मला एकटीला सोडून पुढे निघून गेलास. स्वर्गात असणारे काका आणि आत्याचे बोल खाशील तिथे पण, की इथेही बेबीला एकटं सोडून निघून आलास. लहानपणी परत यायचास, आता मात्र तू परत येणार नाहीस आणि मी तुझ्या आठवणी काढत रडत बसणार! त्याशिवाय काय उरलं आहे माझ्या हातात?

जन्मोजन्मी हाच भाऊ मिळो!

 कुमुद मंडलिक

No comments:

Post a Comment