लॉक डाऊन चा पिरियड जसा वाढत गेला, आणि कंपनीतले सगळे कर्मचारी एक तर त्यांच्या गावी घरी पोहोचले होते किंवा पुण्यात असतील तर ते घाबरले होते. सगळ्यात पहिलं आव्हान होतं ते त्यांच्या मनात विश्वास जगवायचा की कंपनी त्यांच्या पूर्ण पाठीशी असेल. त्या विश्वासाची त्यांना गरज होती की माहिती नाही, कदाचित मलाच त्याची गरज जास्त होती. जिथं शक्य आहे तिथं प्रत्यक्ष भेटून किंवा झूम द्वारे मी त्यांच्या संपर्कात राहिलो. त्याद्वारे आम्ही काही ट्रेनिंग सेशन्स प्लॅन केले. काही टेक्निकल, सेल्स, सॉफ्ट स्किल्स हे विविध विषय घेऊन आम्ही लोकांशी सतत बोलत राहिलो.
दुसरं आम्ही ग्राहकांशी संपर्कात राहण्याचा एक अभिनव प्रोग्रॅम आखला. आमच्या बिझिनेस च्या अनुषंगाने आम्ही एक सेमिनार बनवला होता "Why do spindles fail and how to prevent it". हा विषय घेऊन आम्ही मग ऑनलाईन सेमिनार केला. लॉक डाऊन काळ आणि नंतर बिझिनेस जागेवर येईपर्यंत आम्ही ३० पेक्षा जास्त वेळा सेमिनार घेतला आणि तब्बल ३००० पेक्षा जास्त ग्राहकांशी संपर्कात आलो. इतकं काम तर आम्हाला इन पर्सन भेटायचं असलं असतं तर कमीत कमी दीड वर्षे गेली असती
हे सगळं करत असताना एक वेगळा प्रश्न उभा राहिला. आमच्या तिकडच्या सहकार्यांनी मला दबाव आणला की नोकर कपात करा म्हणून. एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात मला दररोज संध्याकाळी फोन यायचा आणि काही भलतीच आकडेमोड करून मला सांगण्यात आलं की कमीत कमी वीस लोक कमी कर. इथं दोन फॅक्टस होत्या. एकतर मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात, व्यवसाय बरोबर चालत नाही म्हणून कुणाला काढलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय असलेल्या माझ्या कर्मचाऱ्यांना केवळ ही नैसर्गिक आपत्ती आली म्हणून काढून टाकायचं हे मूळ सिद्धांताला धरून नव्हतं. शेवटी याच लोकांच्या जीवावर ही कंपनी भारतात नंबर एक ची आणि जगातल्या पहिल्या पाच मध्ये नावारूपाला आलेली आहे ही वस्तुस्थिती मला माहित होती.
सुरुवातीला मी त्यांना शाब्दिक विरोध केला. मग शासनाने केलेलं आवाहन दाखवलं, तरीही ही मंडळी काही ऐकत नव्हती. शेवटी मला एक परिपत्रक सापडलं ज्यात शासनाने अशा व्यवसायिकांवर कारवाई करू हा नियम त्यांना दाखवला. हे लोक जर घाबरत कशाला असतील तर ते कायद्याला. थोडं त्यांच्या मागणीतला जोर कमी झाला. पण कटकट चालू होती.
शेवटी मी त्यांना उपाय सांगितला की एप्रिल आणि मे मध्ये आपण पगार कपात करू २५% आणि जेव्हा कार्यक्रम जागेवर येईल तेव्हा परत देऊन टाकू, डिसेंबर २० नंतर. त्यांचा लागलीच पुढचा प्रश्न आला की त्याने वित्त पुरवठा सुधारेल पण तोटा तर कायम राहील. त्यांना काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं. एक क्षणाचाही विचार न करता मी त्यांना सांगितलं की माझा आणि व्यवसायिक सहाध्यायी यांचा पगार आपण अर्धा करू आणि ती तात्पुरती कपात नसेल तर बुक्स मध्ये अकौंटिंग करायचंच नाही. एप्रिल २०२० पासून ते मार्च २०२१ पर्यंत.
याद्वारे तुमचा नफा जागेवर राहील.
पण माणूस एकही काढणार नाही यावर ठाम राहिलो. आणि त्या शब्दाला जागलो सुद्धा! त्यांची कटकट थांबल्यावर एक त्यांना मेल लिहिली, त्याचा मराठी अनुवाद पुढच्या पोस्टमध्ये.
करोना डायरी भाग २
No comments:
Post a Comment