माणसाने या काळात सकारात्मक राहावे काय? असा प्रश्न प्रसाद ने विचारला. सरळ उत्तर द्यायचं असेल तर, हो. किंवा थोडा प्रश्नाच्या रूपात उत्तर द्यायचं असेल, तर दुसरा चॉईस काय आहे?
एका गोष्टीपासून दूर राहायचं असेल ती म्हणजे टॉक्सिक सकारात्मकता. करोना चालू झाला होता तेव्हा ते एक डॉक्टर म्हणत होते, कुठला करोना, काय आहे ते वगैरे वगैरे. (ते डॉक्टर पण करोना ने गेले असं ऐकलं मी). ही झाली विषारी सकारात्मकता. किंवा आजच्या तारखेला याच फाजील आत्मविश्वासापायी अखिल भारतातील नेत्यांचं वर्तन. किंवा ते हरिद्वार..... जाऊ दे नकोच तो विषय. ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी बऱ्याचदा सौम्य निगेटिव्हिटी पेक्षा घातक असते.
जेवण करत असताना दाताखाली खडा आला तर आपण तो तसाच चावत पुढे जात नाही. आणि चिडून खाणं पण सोडत नाही. जसा तो खडा आपण फेकून देतो आणि पुन्हा जेवायला चालू करतो त्याच पद्धतीने एखाद्या घटनेमुळे नकारत्मकता वाटली तर तिचा त्याग करणं आणि पुन्हा आपलं काम जोमाने चालू करणं आणि काही गोष्टी आपण बदलू शकणं हे केवळ दुरापास्त आहे, त्या कोणत्या आहेत हे ओळखून त्याच्यापासून दूर राहणं यात शहाणपण आहे, असं मला वाटतं.
काही लोकांची सकारात्मकता फसवी पण असते. तोंडदेखले ही लोक खूप उत्साही आणि चैतन्याने सळसळली आहेत असं वाटतं. ही मंडळी खूप भ्रामक जगात वावरत असतात. म्हणजे अगदी गणपत वाणी बिडी पिताना, चावायाचा नुसतीच काडी, म्हणावयाचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, या कवितेप्रमाणे ही लोक कल्पनेचे फक्त इमले चढवत असतात आणि या काल्पनिक जगात खुश राहतात. प्रत्यक्षात मात्र कशात काय अन फाटक्यात पाय अशी परिस्थिती असते. (राजकारणी लोकांच्या मागे धावणारे कार्यकर्ते याचं परफेक्ट उदाहरण आहे)
नकारात्मकता बऱ्याचदा झेलता येते. फक्त ती आपली थोडी एनर्जी खाते. पण आपल्या कृतिशील निर्णयामुळे तिला झाकोळता येते. प्रॉब्लेम येतो तो निराशावादी लोकांना हाताळताना. शक्यतो निराशावादी लोक हे सायलेंट किलर असतात. ते एकूणच वातावरण गढूळ करून टाकतात. ही लोक घाबरट असतात. सौम्य निराशावाद वाढला की त्याचं रूपांतर डिप्रेशन नावाच्या रोगात होतं. आणि त्याचे एक्स्ट्रीम परिणाम आपण सगळे जाणतो.
असो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रश्नाला हाताळताना कृतिशील निर्णय ज्यामुळे घेता येतात ती सकारात्मकता. आणि तिचा अंगीकार मी, तुम्ही आणि सर्व भवतालाने घ्यायला हवं असं मला वाटतं.
No comments:
Post a Comment