२००९ ची गोष्ट आहे. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. मुलगा लंडन चा होता, त्यामुळे पाहुणे तिकडून मुंबईला आले होते. मला मित्राने त्या पाहुण्यातील काही लोकांची काळजी घ्यायला सांगितली होती. त्यात काही लोक ऐंशी च्या वयाचे होते. सकाळच्या चहापासून ते त्यांना कारमध्ये बसवायचं, सामान लोड करायचं, कार्यालयात त्यांना काय हवं नको ते पाहायचं हे सगळं मी फार आवडीने केलं. हे करत असताना मी काही फार वेगळं करतोय असं ही मला वाटत नव्हतं.
लग्नाचा सोहळा संपला. निरोपाची वेळ आली. आणि न भूतो न भविष्यती असा प्रसंग घडला. त्या लंडन मधील पाहुण्यातील बाबुभाई मकवाना म्हणून मुलाचे काका आणि त्यांचं कुटुंबीय हे माझ्या आई बाबांच्या समोर अक्षरश: हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. ऐंशी वर्षाच्या बाबूभाईंनी माझ्या बाबांची गळाभेट घेतली आणि म्हणाले "तुमच्या पोटी देव जन्माला आला आहे." तो प्रसंगच इतका हृदय होता की मला सुद्धा गदगदून आलं.
परवा एका मित्रवर्याने फार छान आणि सौम्य शब्दात सांगितलं की देवत्व तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. त्यावर विचार करत असताना मला हा प्रसंग आठवला. प्रत्यक्ष जीवनात असे अनेक प्रसंग आले जिथे लार्जर दॅन लाईफ अशा प्रतिमेत अडकायची भीती होती. मला वैयक्तिक असं वाटतं की त्यापासून मी सुदैवाने लांब आहे. त्या भावनेला माझ्या कक्षेच्या बाहेर ठेवलं आहे. आणि जर प्रत्यक्ष आयुष्यात ही परिस्थिती आहे तर या आभासी जगात तिथं अडकण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.
असं सांगावं लागतं हे खरंतर विचित्र आहे. कारण या आधी पण मी एकदा नमूद केलं होतं की इथल्या लाईक्स अन कॉमेंट्स काही क्षण आनंद देत असतीलही. पण खरा आनंद मला माझ्या बिझिनेस मध्ये काही जबराट घडलं तर होतो. एखाद्या कस्टमर ने ऍप्रिसिएशन लेटर पाठवलं तर मी दिवसभर हवेत असतो. कंपनीतल्या पोरांनी जर काही कारणामुळे कुठल्या निर्णयाची स्तुती केली तर मी सातवे आसमान वर पोहोचतो. खूप कमी वेळा होतं ते, पण जेव्हा होतं तेव्हा मोगॅम्बो खुश होतो.
मुळात मी स्वतः देवत्वाच्या गाभाऱ्यात फार कमी जणांना बसवतो. या पृथ्वीवर आणलं म्हणून आई वडिलांना देव मानतो. त्याव्यतिरिक्त फार कमी व्यक्ती आहेत ज्यांना मी देव मानतो. आणि जे आहेत ते आज जगणारे जिते जागते माणसं आहेत. त्यात काही समाजासाठी काम करणारे आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही मेंटॉर्स आहेत. त्यांचं कवित्व पण फार लिमिटेड गातो. त्यांना गाभाऱ्यात ठेवत नाही किंवा त्यांची आरती पण गात नाही. इतिहासातल्या लोकांबद्दल आदर आहे, त्यांनी केलेल्या कामातून काही शिकतो सुद्धा. पण त्या शिकवणीचा उपयोग पायरी म्हणून करतो आणि त्यावर उभं राहून भविष्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यातील कुणालाही देवत्व देण्यास मन धजावत नाही.
थोडक्यात सांगायचं म्हणजे देवत्वाच्या कसोटीवर मी स्वतः लोकांना फार तावून सुलाखून घेतो. आणि या फेसबुकवरची कसोटी फारच तकलादू आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. इथं जर कुणी ते तथाकथित देवत्व द्यायचा प्रयत्न केला तर त्याला तिथंच झटकून द्यायची मानसिकता अगदी पुरेपूर बाळगून आहे, याची खात्री बाळगावी.
इथं खऱ्याखुऱ्या मानव्याचा अंगीकार करायला आयुष्य कमी पडतंय. ती देवत्वाची खोटी झूल हवी कशाला?
No comments:
Post a Comment