ज्या घोषणेची आम्ही वाट पाहत होतो ती झाली आणि ती म्हणजे ३ मे ला कंपनी चालू करायची. पुणे/पिंपरी चिंचवड शहर सोडलं तर ग्रामपंचायतीत असणारे बिझिनेस चालू करा असं पेपर मध्ये छापून आलं. तसंही माझ्याकडे फार्मा कंपनीच्या लेटर मुळे कंपनी चालू करता येईल असं पत्र होतं. आणि नांदेड गाव ग्रामपंचायतीत येत असल्यामुळे मी कंपनी नक्की चालू करू शकत होतो आणि तशी आम्ही केलीही. पण दुपारी चार वाजता पोलीस आले आणि सांगितलं की कंपनी चालू करता येणार नाही. मी परवानगी दाखवली, मिन्नतवारी केली. पण पाळणाऱ्यांसाठी नियम म्हणजे नियम. औट घटकेची खुशी एक दिवस घेतली आणि पुन्हा शटर बंद केलं.
शेवटी गंगेत घोडं न्हालं आणि १३ मे ला कंपनी चालू करायची परवानगी मिळाली. नियमावलीत असंख्य गोंधळ होते, त्याला सामोरे जात कंपनी चालू केली. सगळ्यात मोठा प्रश्न होता मॅनपॉवर चा. बरेच लोक घरी जाऊन बसले होते. त्यांना परत पुण्यात आणायचं होतं. अनेक फोन आणि झूम कॉल्स च्या मदतीने त्यांना परत यायचं आवाहन केलं. हो ना करता करता, साधारणपणे १० जून पर्यंत ९०% जनता कंपनीत आली होती.
सगळ्यात पहिले आर्थिक ताळेबंद आणि मग ऑर्डर फ्लो चा आढावा घेतला. सर्व टीम बरोबर मिटिंग केली. काम कसं करायचं त्याचा आराखडा आखला. आणि मग पुढील नऊ महिन्यात तिन्ही प्लांट चे सेल्स आणि ऑपरेशन चे लोक यांनी अभूतपूर्व काम केलं.
आमचा बिझिनेस सेगमेंट तसा छोटा. स्पिंडल रिपेयर किंवा उत्पादन हा काही खूप मोठा सेगमेंट नाही आहे. मार्केट साईझ लहान. पण त्या मध्ये सुद्धा कल्पकतेने आणि कष्टाने सेल्स डिपार्टमेंट ने ऑर्डर्स आणल्या आणि ऑपरेशन डिपार्टमेंट ने त्याला तितकीच तोलामोलाची साथ देत कंपनीचा बिझिनेस जागेवर आणला.
पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होतं. आणि ऑर्डर्स मिळवायला कस्टमर ला भेटणं तर गरजेचं होतं. माझी एर्तीगा आणि आमच्या प्लांट हेड ची स्विफ्ट आणि सोबतीला एक ड्रायव्हर. सेल्स च्या पोरांनी कस्टमर व्हिजिट चा धडाका लावला. गुजरातेत राजकोट पर्यंत, हैद्राबाद, बेळगाव, नागपूर इथपर्यंत पोरं कार ने जायचे. नाशिक, औरंगाबाद,कोल्हापूर आणि मुंबई तर अक्षरशः "जरा शिवाजीनगर ला जाऊन येतो" इतक्या सहजतेने टूर मारायचे.
कंपनीतल्या सर्व ऑपरेशन डिपार्टमेंट ने सुद्धा तुफान काम केलं. प्रोडक्शन, असेंम्बली, टेस्टिंग, व्हेंडर डेव्हलपमेंट या सगळ्यांनी चौफेर काम करत सेल्स ऑर्डर ला यथायोग्य न्याय दिला.
कुठलीही आर्थिक चणचण जाणवली की पलीकडचे लोक ज्या भूभागाकडे मृत गुंतवणूक म्हणून बोट दाखवायचे, त्याचे पैसे कंपनीत टाकून ते तोंड बंद करायचं असं मी आणि वाघेला ने ठरवलं. पण पैसे होते कुठे आमच्याकडे? शेवटी वाघेला ने मॅनेज केले आणि माझ्या बाबतीत चमत्कार झाला की ज्यायोगे मी पण पैसे उभे करू शकलो. परत एकदा आम्ही पलीकडच्या लोकांना पुरून उरलो.
या सगळ्याचा परिणाम काय झाला आणि रिझल्ट कसे आले, ते पुढच्या भागात.
करोना डायरी भाग ४
No comments:
Post a Comment