तो यायचा परभणीच्या मुक्ताजीन मध्ये, सायकल रिक्षातून. आणि मग आम्ही भाचे मंडळी जाऊन त्याच्या ढेरी वर गुद्दे मारायचो. जी असोशी, जे प्रेम त्याने सत्तर ते ऐंशीच्या दशकात दिलं, त्यात तसूभरही बदल झाला नाही पुढच्या चार दशकात. आणि हे माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येकासाठी. काही लोक अशी असतात की त्याच्या संपर्कातल्या प्रत्येकाला वाटतं की त्याचं आणि माझं नातं जरा स्पेशल आहे. तीन व्यक्ती येऊन गेल्या आयुष्यात, शरद मंडलिक, विलास कुलकर्णी आणि तो, माझा मामा सुरेश सीतारामपंत पाठक.
सुरेश मामाच्या घरी गेलो की सॉलिड कौतुक ओसंडायचं, त्याच्या शब्दातून, कृतीतून. हक्कानं पाया पडायला लावायचा आणि भरभरून आशीर्वाद द्यायचा. काही लोकांच्या पाया पडायचं म्हणजे मनात फक्त येतं की पाठीला व्यायाम होतोय आणि काही लोकांचे पाय पकडताना पाठीच्या कण्याला वाकायची आज्ञा आपसूक होते. मामा दुसऱ्या कॅटेगरी मधला होता.
माझ्या आईचा लाडका भाऊ. तसा चुलत, पण सख्ख्याच्या पलीकडे. कारण ती त्या चार भावंडांबरोबर मोठी झाली हैद्राबादला. आमच्या घराबरोबर अजब प्लाटॉनिक प्रेम होतं त्याचं. १८ जून २००९ ला सकाळी त्याला कळलं मी बाबांची तब्येत बरी नाही म्हणून सुट्टी घेतली. तर केवळ मी सुट्टी घेतली म्हणजे प्रकरण सिरीयस आहे हे जाणून साडे तीन तासात, दुपारी दोनच्या सुमारास तो घरी आला. संध्याकाळी पाच वाजता बाबा गेले.
मला राजा म्हणणाऱ्या फार कमी व्यक्ती, त्यात तो एक. अन तो मला राजा सारखी ट्रीटमेंट पण द्यायचा. ठाण्याला गेलो अन मी श्रीरंग सोसायटीत त्याच्या घरी गेलो नाही असं क्वचित व्हायचं. अगदी चहा बिस्कीट घेण्यासाठी अर्ध्या तासासाठी का होईना मी जाऊन यायचो. त्याला जाम अभिमान होता माझा. सेटको, त्या अनुषंगाने भारतात आणि परदेशात माझं फिरणं, अ.....अभियंत्यांचा पुस्तक, इथे फेसबुकवरील लिखाण ही प्रत्येक गोष्ट त्याने भरभरून एन्जॉय केली. माझ्यासमोर आणि इतर नातेवाईकांसमोर तो बिनदिक्कत माझं या सगळ्यांसाठी बेफाम कौतुक करायचा.
सगळ्यांवर निरामय प्रेम करणारा एक भाविक, कुणाचाही मृत्यू वेदनादायी असतोच पण सुरेश मामाच्या बाबतीत असं काही लिहायला हात धजावत नाही आहेत.
दररोज रात्री गादीवर चादर टाकताना तुझी ती एक सुरकुती न पडणारी चादर आठवत राहील, दर गणपतीला तुझी ती आरास आठवत जाईल, कुणाही मोठ्याचा आशीर्वाद घेताना तुझे ते "येत जा रे राजा, बरं वाटतं" हे शब्द कानात गुंजन करतील, कुणाही मोठ्यांची सेवा या हातून घडलीच तर तू आजोबांची जी काळजी घेतली ती बेंचमार्क म्हणून सतत मनात राहील.
माहिती आहे, आपली भेट आता होणार नाही, कारण तू अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहेस. पण वी ऑल विल नेव्हर मिस यु, Suresh मामा. कोणत्या ना कोणत्या कारणाने तू आम्हाला सतत आठवत राहशील. मला माहिती आहे, तुला इंग्रजी फार आवडत नाही पण काय करणार घसा दुखत असताना आणि कॉम्प्युटर चा स्क्रीन अंधुक दिसत असताना भावना व्यक्त करण्यासाठी इंग्रजीचा सहारा घ्यावा लागतोय.
No comments:
Post a Comment