२०१५ मध्ये जेव्हा माझी दुसरी प्लास्टी झाली तेव्हा मी स्वतःवर जाम वैतागलो होतो. विचार यायचा, सालं आपण इतकं काम करतोय पण त्यामुळे तब्येत जर खराब होत असेल तर काय उपयोग? मी सेटको बोर्डाला रीतसर सांगून टाकलं की मला या जबाबदारीतून मुक्त करा. अर्थात हे मी निराशेतून लिहिलं होतं. मी जास्त लावून धरलं असतं तर कदाचित मला बोर्डाने सोडलं पण असतं, पण रणछोडदास म्हणून ओळखला गेलो असतो. कारण सेटको वजा राजेश मंडलिक यासाठी काहीच तयारी नव्हती.
मग माझी मनीष गुप्ता सरांशी ओळख झाली ज्यांनी बिझिनेस करण्याचा स्ट्रक्चर्ड फॉरमॅट शिकवला, ज्यामध्ये सक्सेशन प्लॅनिंग किती गरजेचं आहे याची समज आली. २०१७ पासून त्यावर काम केलं, आणि कंपनीत दुसरी आणि तिसरी फळी तयार केली. आज २०२१ मध्ये परिस्थिती अशी आहे की जरी मी कंपनीचा निरोप घेतला तरी कंपनी व्यवस्थित चालेल, किंवा कुणास ठाऊक जास्त चांगल्या पद्धतीने चालेल. आणि मुख्य म्हणजे हे निरोप घेणं फार सकारात्मक मोड वर असेल. माझ्या मनात कुठलाही गिल्ट नसेल, आणि एक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान असेल.
मला असं नेहमीच वाटत आलं आहे की चांगल्या पद्धतीने निरोप घेणं ही पण एक कला आहे. आणि जर हा निरोप निराशा वा वेदना देणारा न देता, पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये झाला तर त्या निर्णयाचा आदर होतो.
बिझिनेस चालू करण्याच्या अगोदर मी दोन जॉब केले, एक एस के एफ आणि दुसरा रॊलॉन. दोन्ही जॉब पैशासाठी नव्हे तर काही विशिष्ट कारणासाठी सोडले. आजकालच्या मुलामुलींना हे वाचायला थोडं विचित्र वाटेल पण दोन्ही चेंजओव्हर मध्ये मी आधीपेक्षा कमी पगार घेतला. तर सांगायचं हे की एसकेएफ सोडून २६ वर्षे झाली आणि रॊलॉन सोडून १८, पण आजही तिथले कलिग्ज संपर्कात आहेत. त्याचं कारण हेच की निरोप घेताना कुणाच्याही मनात कटुता नव्हती, आणि नंतरही व्यवसायाची पद्धत अशी ठेवली की कधीही कुणी समोर आलं तर तोंड चुकवून जावं लागणार नाही.
माझ्या अजून एक लक्षात आलं आहे की आपली गरज इथे संपली आहे हे ताडता यायला हवं आणि ते तर अगदी एक तासाच्या भेटीत सुद्धा लागू होतं. विधात्याकडे मी नेहमी एक प्रार्थना करतो की कुणीही जा म्हणण्याच्या अगोदर मला तिथून निघायचं धैर्य आणि सुबुद्धी द्यावी.
थोडक्यात काय तर पृथीवरची आपली एक्झिट आपल्या हातात नाही आहे पण ती सोडून प्रत्येक ठिकाणच्या एक्झिट वर आपलं नियंत्रण हवं.
No comments:
Post a Comment