Friday, 14 May 2021

इंदू जैन

मृत्यू या विषयी इतके स्पष्ट आणि मोहक विचार फार कमी वेळा वाचनात आले. इंदू जैन यांचा  मूळ इंग्रजी लेख फारच सुंदर आहे. त्यात अभिप्रेत असलेला अर्थ पोहचवू शकलो नाही याबद्दल शंका आहे. पण तरीही अनुवाद करण्याचं धारिष्ट्य केलं आहे. चूभूदेघे. मूळ इंग्रजी लेख १४/०५/२०२१ टाइम्स ऑफ इंडिया च्या मुख पृष्ठावर आहे  


मृत्यू हा जगण्याच्या कलेचा एक भाग आहे. माझं सारं आयुष्य आरामात गेलं, पण खरी गंमत चार भिंतीबाहेरचं जे जग आहे त्यात मी अनुभवली.  आयुष्यातील प्रत्येक क्षण मी भरभरून जगले आहे आणि त्यायोगे अनुभवल्या जाणाऱ्या शांततेने माझं आयुष्य परिपूर्ण झाले आहे. 

अर्थात प्रत्येक जण अनुभवतो तसं मला सुद्धा काही मनासारखं नाही घडलं तर असमाधानी वाटतं. पण अशा प्रत्येकवेळी मी स्वतःलाच प्रश्न विचारते "हे घडलं खरं. पण त्यावर नाराज होऊन मला स्वतःला शिक्षा देणं हे खरंच गरजेचं आहे का?" उत्तरादाखल माझ्या मनातील नकारात्मक भाव कुठल्या कुठे पळून जातात. मला त्यामुळे खात्री वाटते की माझं इथलं तात्पुरतं वास्तव्य संपताना मी तर आनंदी असणारच, पण त्याही पेक्षा पुढील प्रवासाची मला प्रचंड उत्कंठा आहे. 

मृत्यू या प्रकाराबद्दल अनेकांना कुतूहल आहे, मला ही आहेच. पैलतीरावर काय आहे हे कुणाला माहिती नाही, पण काहीतरी नाविन्यपूर्ण असणार हे तर नक्की. ते अनुभवण्याची मला आस आहे. मृत्यूला कवटाळण्यास मी पण अधीर आहे. फक्त त्याच्या कानात मला हळूच सांगावंसं वाटतं "थोडं थांब. मी येणार तुझ्याबरोबर. पण त्याआधी मला या शय्येवर व्यवस्थित जुळवून घेऊ दे. उशी नीट करू दे आणि माझ्या रजईमध्ये निवांत होऊ दे." 

माझ्या मित्र मैत्रिणींना या शेवटच्या प्रवासाची पूर्ण कल्पना दिली आहे. जे माझ्या जवळचे आहेत आणि मला पूर्ण ओळखून आहेत त्यांचं सांत्वन करण्याची गरज पडणार नाही. त्यांना माहिती आहे की ज्या असोशीने मी जगण्यावर अतोनात प्रेम केलं, त्याच उत्सवी मन:स्थितीत मी मृत्यूला सुद्धा कवटाळणार आहे. माझ्या जवळच्या लोकांबरोबरच, ज्यांच्यामुळे मी परिपूर्णतेच्या पायऱ्या चढले त्या गुरूंना पण याची कल्पना आहे. ज्यांना माझ्या निर्गमनाचं दुःख होईल त्यांच्या बद्दल मला नम्र सहानुभूती वाटते. त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही की पैलतीरावर मी किती खुश आणि आंनदी असणार आहे ते!

जर मला कुणी माझी शेवटची इच्छा विचारली तर मी हेच सांगेन की माझ्या निधनाची बातमी कुणाला सांगू नका. "इंदू कुठं आहे?" असं कुणीही विचारू नये. कारण जिथं कुठं आनंद असेल, जिथं कुठं हास्याची लकेर असेल, त्या प्रत्येक लकेरीत माझं अस्तित्व असणार आहे. या वसुधेवर माझा शेवटचा प्रवास हा कसाही होऊ दे, पण पंचमहाभूतांची छेड  काढत मी मृत्यूच्या बाहुपाशात विसावणार आणि या अनंतात विलीन होईल. 


इंदू जैन 

No comments:

Post a Comment