माझ्यात धोका पत्करण्याची क्षमता कमी आहे असं मला सारखं वाटतं. पण जेफ मध्ये ती माझ्यापेक्षा कमी आहे असं मला अनेक महिने वाटायचं. पण माझ्या लक्षात आलं की एखादी कल्पना पूर्ण समजून घेण्यात तो खूप वेळ घेतो. पण एकदा त्याला पटली की तो मनापासून पूर्ण पाठिंबा द्यायचा आणि ती कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वाटेल ती मदत करायचा.
सेटको अमेरिकेच्या अनेक लोकांनी अमेरिकन लोकांच्या स्वभावाच्या माझ्या अनेक समजाला सुरुंग लावले. पण जेफने त्या सगळ्यांवर कडी केली. मी बुसाक शामबान नावाचा एक अमेरिकन प्रॉडक्ट १९९४ ते २००२ खूप विकला. त्यावेळेस खूप अमेरिकन लोकांबरोबर मी भारतभर फिरलो. त्यांच्या कंजुषीपणाच्या कथा मला आठवल्या तर आजही हसायला येतं. याउलट जेफ इतका सढळ हात असणारा अमेरिकन माझ्या पाहण्यात नाही. हे पाश्चात्य लोक बाहेर आपल्याशी लाख चांगलं बोलतील पण पाहुणचार करायला घरी नेणं वगैरे अगदी दुरापास्त, असा माझा समज होता. पण जेफने दोन वर्षांपूर्वी मला आणि यशला त्याच्या टेनेसीतल्या फार्महाउस ला तीन दिवस नेलं आणि तुफान बडदास्त ठेवली.
माझा मुलगा यश अमेरिकेत शिक्षण घेत होता. त्याचं करिअर मार्गाला लागतं आहे की नाही याची काळजी माझ्यापेक्षा जेफला जास्त असायची. माझ्याशी आणि यश बरोबर कायम त्या विषयावर बोलायचा. यश किंवा माझ्या बिझिनेस पार्टनर ची मुलगी, सेटको मध्ये यावी ही त्याची आंतरिक इच्छा. पण यशने त्याबद्दल जेव्हा फार काही इंटरेस्ट दाखवला नाही तेव्हा माझ्याइतकं जेफला पण वाईट वाटलं. इतकं होऊनही जेव्हा नुकताच यशला जॉब लागला, तो रेफरन्स जेफनेच दिला. आता आम्ही दोघे बिझिनेस पार्टनरची मुलगी सेटको ला जॉईन होते का याची आतुरतेने वाट पाहतोय.
तर असा हा जेफ ३० जून २०२१ ला निवृत्त झाला. याची तयारी त्याने किती आधीपासून चालू केली असेल, असं तुम्हाला वाटतंय. तर तब्बल आठ वर्षे. त्याने त्याचा सक्सेसर आणला, आमच्याशी तो या विषयावर बिनदिक्कत बोलायचा, एक्झिट प्लॅन वर चर्चा करायचा. आणि ती घडवून पण अशी आणायचा की जणू काही एखादा महत्वाचा बिझिनेस प्लॅन डिस्कस करतोय. म्हणजे त्यात पूर्ण व्यावसायिकता असायची आणि जणू एखादी मशीन आणणं हे ग्रोथ साठी जसं महत्वाचं आहे तसं मी सेटको सोडणं हे पण ग्रोथ साठी गरजेचं आहे असा सूर असायचा. जोर का झटका धीरेसे लगे या न्यायाने त्याने मला डायरेक्टर बोर्ड वरून पण पायउतार होतो आहे असंही सांगितलं. थोडक्यात त्याने हे सगळ्या जबाबदारीतून मुक्त होणं याचा माझ्यासारख्या इमोशनल माणसाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने घडवून आणलं. एखाद्या जबाबदारीला ग्रेसफुली कसा निरोप द्यायचा याचा त्याने वस्तुपाठ घालून दिला. समाधानाची बाब इतकीच आहे की आहे की तो अजूनही आमच्या ऍडव्हायजर बोर्ड वर आहे.
आजही माझ्या अमेरिकन बोर्डबरोबर झूम मिटिंग होतात. पण सध्यातरी जेफ त्या मीटिंगमध्ये नसतो. मिटिंग संपते. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ऍडव्हायजर बोर्ड वर असल्यामुळे तो परत येईल ही आशा आहेच. तो पर्यंत वाट पाहणं इतकंच माझ्या हातात आहे. त्याचा निरोपसमारंभ करण्यापेक्षा ही वाट पाहणे बरा पर्याय आहे.
No comments:
Post a Comment