कालची संध्याकाळ अद्भुत गेली. स्वरूपा आणि नंदूचा "पार्कातल्या कविता" हा कार्यक्रम पु ल देशपांडे गार्डन मध्ये होता. कार्यक्रम विंदांना समर्पित होता. मला निमंत्रण होतं. विंदांच्या कविता मला आवडतात अन हे स्वरूपा ला माहीत आहे.
आठ ताकदीचे कवी/कवियत्री होते. अन सगळ्यांनी नितांत सुंदर कविता पेश केल्या. काही गझल, मुक्तछंद, गेय कविता हे कवितेचे वेगवेगळे फॉर्म सादर झाले. सुप्रिया जाधव, निर्मिती, वैभव देशमुख यांना आधी ऐकलं होतं. बाकीच्यांना पहिल्यांदाच ऐकलं.
आणि मग नंदूने माझ्या नावाचा पुकारा केला. विंदांच्या कविता सादर करण्यासाठी. स्वरूपा ने निमंत्रण देताना थोडी कल्पना दिली होती. पण इतक्या तालेवार कवी/कववीयत्रीच्या मांदियाळीत मी खरं तर दबकलोच होतो. समोर म भा चव्हाण बसले होते, दत्तप्रसाद रानडे होते आणि त्यांचे वडीलही होते. बरं मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वाला माणूस. फार तर उद्योजकतेवर बोलणारा. कविता म्हणाल तर एक हौस म्हणून वाचतो. लोकांच्यासमोर म्हणाल तर खर्डेघाशीच्या एका कार्यक्रमात म्हंटलेल्या. पण ते आपले सगळे मित्रच.
इकडेतिकडे विखुरलेलं अवसान गोळा करत तीन कविता सादर केल्या. "माझ्या मना बन दगड", "असा मी कसा मी" आणि "तेच ते तेच ते". सुदैवाने तिन्ही कविता मला पाठ आहेत. लोकांना आवडल्या. अन मलाही आवडल्या.
नंतरचे पंचेचाळीस मिनिटं मात्र चांदण्यांची बरसात होत गेली. पहिले म भा चव्हाण सरांनी एकच पण वडिलांवर अफलातून कविता सादर केली.
आणि मग दादा रानडे, जे वयाने सत्तरीच्या घरात असतील, यांनी पुढील अर्ध्या तासात कवितेच्या हर एक फॉर्मचा एकेक दागिना पेश केला, त्याने सारेच मुग्ध झालो. जागा सोडून त्यांचे कधी त्यांचे पाय धरले हे कळलंच नाही.
समारोप उत्तेकर यांनी तन्वीर सिद्दिकी च्या अत्यंत समर्पक कवितेने केला.
नंदूने कार्यक्रमाचा फ्लो मस्त मेंटेन केला.
तरंगत घरी आलो.
रात्री झोपल्यावर बरेच वर्षांनी कंपनी, बिझिनेस याव्यतिरिक्त वेगळीच स्वप्नं पडली.
अशी स्वप्नं अधूनमधून पदरात पाडून घ्यावी.
छान वाटतं.
No comments:
Post a Comment