Saturday 5 August 2017

मुक्तेश्वर

मागील एक आठवडा मी एका अद्भुत वातावरणाचा साक्षीदार होतो. आमचे बिझिनेस कोच मनीष गुप्ता यांच्या एका अप्रतिम कोर्समध्ये सहभागी व्हायची मला संधी मिळाली. कोर्सचं नाव होतं माय लाईफ. हा कोर्स उत्तराखंड मध्ये मुक्तेश्वर नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी सरांच्या घरीच झाला. आम्ही २२ सहभागी, सर, सरांच्या पत्नी आणि आमची एकहाती सरबराई करणारे सरांचे सत्तरीतले वडील. आणि सरबराई या शब्दाचा अर्थ जसाच्या तसा घ्यायचा. पंचवीस जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हा गृहस्थ एकट्यानं बनवायचा. (सरांची आई, मुलांची काळजी घ्यायला पुण्यात होती). जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी अंकल त्यांच्या वीस एकर जागेवर स्वतः च पिकवतात. दुधाच्या मिठाई सकट. त्यासाठी आठ दुभत्या गाई आहेत त्यांच्याकडे.

पागल झालो आम्ही बावीस जण तिथे. वीस वर्षाच्या मुलामुलीपासून ते साठी पर्यंतचे स्त्री पुरुष तिथे सहभागी झाले होते. तिथला सूर्यास्त, नीरव शांतता, दर्याखोऱ्यातून निसर्गाचं विलोभनीय दर्शन, मुक्तेश्वरच्या डोंगरावरून हिमालयाचं दिसणारं भव्य रूप या प्रत्येकावर खरंतर स्वतंत्र लेख होतील.

एका सकाळी मी एकटाच खोल दरीत चालून आलो. भारावून परत आलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीत लिहिलं. अक्षरशः एका बैठकीत पंधरा मिनिटात सरसर उतरत गेलं.  सर हिंदी भाषिक असल्यामुळे हिंदीत लिहावं वाटलं.

दहा मिनिटे इकडे तिकडे केल्यावर थोडं विचित्र वाटायला लागलं. जाणवलं की, माझं मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे. मग पटकन त्याचा मराठीत अनुवाद करून टाकला. तेव्हा कुठे शांत वाटलं.

एम जी सर, किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही,
हो, हेच वाटलं आज सकाळी फिरताना
किती अस्वस्थ वाटत होतं मला
फुफुस्सात इतका सारा ऑक्सिजन भरल्यावर
बाहेर उभ्या कारचा एक्झॉस्ट चालू करता का
श्वास भरून कार्बन डाय  ऑक्साईड घेईन म्हणतो
बहुतेक बरं वाटेल मग मला

आज गेलो होतो त्या खोल दरीमध्ये
मातीत पडलेले वाळके पत्ते टोचत होते हो
स्पोर्ट्स शूजच्या सोलला छेदून जात
फुलांचा एक आगळाच गंध नाकाला स्पर्शून गेला
इथे तुम्ही न उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या कुंडीची व्यवस्था नाही करू शकत का, एम जी सर

आणि या पक्ष्यांचे आवाज
कसं वाटतं ना कानाला ही चित्र विचित्र किलबिलाट ऐकल्यावर
कशी जगतात लोकं इथे
लाऊडस्पीकर वरून पहाटे बेसूर आवाजात आपापल्या देवाला बोलावल्याशिवाय
आश्चर्य वाटतंय मला

आश्चर्य वाटतंय मला याचंही
कुणी एक सत्तरीतला तरुण असं कसं जगू शकतो
वीस एकरात फैलावलेल्या खडकाळ जमिनीचं
वनराईत रूपांतर करत, एकहाती तिला सांभाळत
आणि वर आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलामुलींना
प्रेमभराने जेवण भरवत, स्वतः तृप्तीचे ढेकर देत

आणि हे काय लावलंय तुम्ही, एम जी सर
याच्या गळ्यात पड, त्याची उराउरी भेट घे
उद्याच्या ब्रेकफास्टमध्ये बाबांना सांगून
थोडा अहंकार, जरा चिडचिड द्यायला सांगा
आम्ही सज्ज होऊ मग आमचं जीवन जगण्यासाठी

छ्या एम जी सर, हे कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला
जिवंतपणी स्वर्गवासीच झालो आम्ही तर

किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही
एम जी सर.

No comments:

Post a Comment