Wednesday, 17 June 2020

भास्कर मंडलिक

भास्कर अनंतराव मंडलिक, ऑगस्ट १९४१-१८ जून २००९.

बऱ्याचदा माझे नातेवाईक असं म्हणतात, इतक्या जणांवर लिहितोस पण स्वतःच्या वडिलांबद्दल लिहिलं नाहीस कधी ते! आज अकरा वर्षे झालीत त्यांना जाऊन. इतके फादर्स डे झाले. पण धीर नाही झाला.

जे मला माहिती आहे त्यांच्या बद्दल He was man of people. एमएसईबी मध्ये मंडलिक साहेबांना ओळखत नाही असा माणूस विरळा.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालपण गेलेलं. कधी बोलायचे नाही ते त्याबद्दल. पाचव्या वर्षी मातृछत्र हरवलेलं. सावत्र आई आणि तिने दिलेला प्रचंड त्रास. फार वर्षांपूर्वी बोलले होते. काटा आला होता अंगावर ऐकताना. ६३-६४ च्या सुमारास लागले एमएसईबी मध्ये. बी एस्सी की  बी ए होते ते. तिसरं वर्ष पण पूर्ण नव्हतं झालं बहुधा. पण दुनियादारीच्या विद्यापीठात विशेष प्राविण्यासह पास  होते ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण काय हे विचारायची गरज ही पडली नाही.

"नाही" शब्द नव्हता त्यांच्या शब्दकोशात. परभणी, बीड, यवतमाळ, औरंगाबाद, नासिक, पुणे, मुंबई आणि पुणे अशी भ्रमंती झाली. बाकी महाराष्ट्रातल्या तमाम गावांना त्यांनी भेट दिलेली. प्रवासाची आवड मला त्यांच्याकडून मिळाली यात शंका नाही. प्रचंड कामसू. मंडलिक साहेबांना काम दिलं आणि ते झालं नाही अशी तक्रार नाही कधी, वरिष्ठ आणि कनिष्ठ, दोघांकडून.

घरात कायम लोकांचा राबता. ऐंशीच्या दशकात, मराठवाड्यासाठी पुणे म्हणजे परदेश. भास्करचं घर आहे, या इतक्या माहितीवर परभणी आणि इतर गावातून लोक धडकायची आणि काम करून परत जायची.

बिझिनेस या प्रकारावर फार त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याला कधीही त्यांनी प्रोत्साहन नाही दिलं. किंबहुना विरोधच केला. एसकेएफ ला जॉबला लागताना त्यांनी अगदी आवर्जून प्रयत्न केले. पण व्यवसायाने बाळसं धरेपर्यंत ते कायम साशंक राहिले. व्यवसायाला चार पाच वर्षे झाल्यावर मात्र थोडा विश्वास वाटू लागला त्यांना. मग ते त्यांच्या मित्रांना कौतुकाने कंपनी दाखवायला आणत असत.

या ना त्या कारणाने त्यांची आठवण निघत असतेच. पण अ....अभियंत्याचा च्या प्रकाशन सोहळ्यात आणि आता नवीन कंपनीच्या पूजेच्या दिवशी मात्र त्यांची आठवण प्रकर्षाने झाली. अर्थात पुस्तक प्रकाशन सोहळा त्यांच्या मित्रांच्या डोळ्यातून पाहिला असेलच. कंपनीचं आजचं रूप पाहून मात्र ते हरखून गेले असते हे नक्की.

एम एस ई बी त आयुष्य व्यतीत केल्यावर आम्हा सर्वांचं व्यवसायिक आयुष्य पाहून त्यांना खूप बहुदा टेन्शन यायचं. अर्थात त्या पिढीतल्या लोकांप्रमाणे कधी बोलले नाही. त्यात सुवर्ण सहकारी बँक प्रॉब्लेम मध्ये आली जिथे त्यांनी काही पैसे गुंतवले होते. या सगळ्यांची परिणीती कँसर मध्ये झाली. १८ जून २००९ ला त्यांना देवाज्ञा झाली.

आजही जुन्या नातेवाईकांना आणि परिचिताना भेटल्यावर भास्कर मंडलिक यांच्या आठवणी आवर्जून काढल्या जातात, यावरून ते किती समृद्ध आयुष्य जगले याची जाणीव होते.


No comments:

Post a Comment