Tuesday 2 February 2021

चेतन बच्छाव

 सोशल मीडियामुळे अनेक आनंदी क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं आहे त्यात अजून एक भर पडली चेतन बच्छाव लिखित काहूर या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात सहभागी झालो. चेतन पण इंजिनियर आहे आणि माझ्यासाठी तो एक आत्मीयतेचा भाग आहे. "इंजिनियर असूनही इतकं कसं काय लिहितो रे?" हा प्रश्न मला माझ्या नातेवाईकांनी विचारला होता. मला त्यामागचं लॉजिक कळलं नाही. बहुधा यंत्र, बिल्डिंग मटेरियल किंवा कॉम्प्युटर या सारख्या निर्जीव वस्तूंशी खेळताना इंजिनीअरच्या मनातील सजीवतेचा मृत्यू होत असावा असा एक गैरसमज प्रचलित आहे. तो चूक आहे हे अनेक जणांनी सिद्ध केलं आहे. चेतन ने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

प्रकाशन हस्ते होणार म्हणजे पुस्तक वाचायला हवं. वेळ कमी होता, पण काहूरचं वैशिष्ट्य हे की मी ते रविवारी एका बैठकीत वाचून काढलं. पुस्तक उत्कंठावर्धक असल्याशिवाय तसं होत नाही. त्यावरून काहूरचा दर्जा तुमच्या लक्षात येईल. तसा चेतन फेसबुकवर लो प्रोफाइल राहतो. म्हणजे त्याच्या वॉल ची फारशी चर्चा नसते. असं असताना त्याने एक दर्जेदार कादंबरी लिहिली आणि तिचा तितकाच दणकेबाज प्रकाशन सोहळा केला हे नक्कीच कौतुकास्पद. 

काहूर, नायकाच्या दृष्टीने दुःखांतिका आहे, तर नायिकेच्या अनुषंगाने सुखांतिका. लेखकाने चतुरपणे कोण बरोबर, कोण चूक यावर भाष्य टाळलं आहे. त्याने ते बहुधा वाचकांवर सोडलं आहे. पुणेरी भाषेत सांगायचं तर, कादंबरी विकत पण घ्यायची आणि प्रश्नाचं उत्तरही शोधायचं आहे. 😊 नायक-नायिकेमधील प्रेमप्रकरण अजून रंगवलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे पहिल्याच भेटीत दोघांनी चुंबन घेणे हे माझ्यासारख्या नववृद्धाला झेपलं नाही. म्हणजे मी पौगंडावस्थेत असताना चित्रपटात चुंबन दृश्य म्हणजे दोन फुलांनी एकमेकांना स्पर्श करणे. अर्थात आजकालच्या तरुणाईच्या स्पीडला लेखकाचा विचार साजेसा आहे.  

चेतनची पहिली कादंबरी असली तरी त्यात नवखेपणा जाणवत नाही. प्रवाही लेखन आहे. तार्किकतेने चेतनने प्रसंग उलगडले आहेत. एकदम भलतेच रेफरन्स वाचनात येत नाहीत. 

पुस्तक प्रकाशनावेळी सगळं गुडी गुडी बोलायचं नसतं, थोड्या चुका शोधायच्या असतात असा एक प्रघात आहे. त्या सांगायच्या म्हणजे काही व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका आहेत. प्रिंटिंग मध्ये काही टेक्निकल फॉल्ट आहेत. पण ते पुढच्या आवृत्तीत दूर होतील अशी खात्री आहे. 

प्रकाशक ऋषिकेश वडके, प्रूफ रीडर गजानन परब आणि मुखपृष्ठ कलाकार रोहित लाड यांचेही अभिनंदन. 

अजून असेच नवीन विषय घेऊन चेतनने लेखन प्रवास चालू ठेवावा यासाठी शुभेच्छा. 

अभिनेता राहुल सोलापूरकर, चित्रपट निर्माते भाऊसाहेब भोईर, माजी आमदार विलास लांडे, सैंदाणे साहेब अशा नेते अभिनेते यांच्या मांदियाळीत व्यसपीठ शेअर करायची संधी मिळाली याबाबत चेतनचे आभार.  



No comments:

Post a Comment