अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाला समाधानी कधी वाटू शकतं?
आत्मसमाधानी वाटण्याच्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे तब्येत चांगली असणे आणि दुसरं म्हणजे एखाद्या नोबल कामातून आत्मिक समाधान मिळणे.
फिजिकल आरोग्य चांगलं असेल तर प्रत्येकाला भारी वाटतंच. (इथे अजून एक गंमत आहे. चांगल्या तब्येतीचं महत्व आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आजाराला सामोरे जाऊन बरे झालो असतो. माझ्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य चांगलं असणं काय याची मला जाणीव आहे). गल्लत होते ती अर्थपूर्ण काम समजून घेण्यात. अर्थपूर्ण काम म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्यातून अर्थार्जन होतं ते. ज्यातून अर्थार्जन होतं ती म्हणजे नोकरी. नोबल काम करणे आणि नोकरी करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. किंवा स्वर्ग आणि नरकाचा फरक आहे असं म्हणू यात. त्यामुळेच कदाचित नोकरी करणे हे कंटाळवाणे काम होऊ शकते.
एखादं अर्थपूर्ण किंवा नोबल काम करणे म्हणजे नोकरी करणे असं नसतं. झोकून काम केलं तर ते आपल्याला उत्साहित करतं, आणि नोकरी समजून काम केलं तर ते निरुत्साही करतं. अर्थपूर्ण काम करण्यासाठी तन आणि मनाने झोकून द्यावं लागतं, नोकरी मध्ये मात्र आपण धनाची अपेक्षा करत असतो. एखादं मिनिंगफ़ुल काम करताना त्याचा ताण जाणवत नाही, नोकरी म्हणून काही काम केलं तर आपण प्रचंड तणावात असतो. म्ह्णून नोकरी करणारे लोक वीक एन्ड कधी होतो याची वाट पाहत असतात आणि सोमवारी त्यांना कामावर जाण्यासाठी पायांना ओढावं लागतं. काम एन्जॉय करणारे लोक सोमवारी सकाळी उत्साहाने मुसमुसत असतात. नोकरी करणे ही आर्थिक गरज आहे पण अर्थपूर्ण काम हे उदात्त उद्देशातून केलं जातं.
नीतिमूल्याना जागत जेव्हा कुणी काम करण्याची वृत्ती ठेवते, ती व्यक्ती आयुष्याच्या शेवटापर्यंत निवृत्त होत नाहीत. (उदा: ए पी जे अब्दुल कलाम, नुकतेच ८२ व्या वर्षी निर्वतलेले प्रगती ऍटोमेशन चे साठे सर, किंवा नव्वदाव्या वर्षी निधन पावलेले एन आर बी कंपनीचे चेअरमन त्रिलोचनसिंग सहानी). नोकरी तुम्हाला श्रीमंत करेलही पण अर्थपूर्ण काम हे तुमचं आयुष्य संपन्न करतं.
मी नोकरी करू नका असं म्हणत नाही आहे पण ती नोकरी नीतिमूल्यांना जागत, अर्थपूर्ण पद्धतीने केली तर आकाशाला कवेत घेण्याची ताकद तुमच्यात येईल आणि मग कदाचित नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला निरुत्साही वाटणार नाही. त्यामुळे नोकरी बदलताना पे राईज घ्या पण त्यापेक्षा जास्त महत्व तुमच्या नीतिमूल्यांचा, मूळ सिद्धांताचा मुक्तहस्ते वापर करण्याची तुम्हाला मुभा मिळणार आहे का याबद्दल शोध घ्या असं माझं नम्र आवाहन आहे.
Be an employee.....be an employer.
(पॅशन या शब्दाबद्दल बरेच गैरसमज आहेत. काम इतकं झोकून करायचं की त्यातून मिळणाऱ्या रिटर्न्स चा ही विसर पडावा. जगातील सगळी अचाट कामं हे पॅशन, काम झोकून देणं, या वृत्तीतून झाली आहेत)
No comments:
Post a Comment