Sunday 24 January 2021

वसुधैव कुटुंबकम"

गेल्या दहा महिन्यातील उलथापालथ अभूतपूर्व आहे. मार्च २०२० मध्ये न्यूयॉर्क मधील एका मासिकाने भारतात करोनमुळे भयानक परिस्थिती निर्माण होईल असे भविष्य वर्तवले होते. त्यांनतर चारच महिन्यात बोस्टन मध्ये भारताच्या करोना परिस्थिती हाताळण्यावर मानवीय अपयश असे संबोधले गेले. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेत वैज्ञानिक भारताला करोनाचं गांभीर्य कळलं नाही असा आरोप करत होते. लगोलग बीबीसी ने बातमी दिली की दिल्लीतील करोना व्हायरस ची परिस्थिती भयावह आहे. तेरा महिन्यापूर्वी वुहानमध्ये करोना व्हायरस चा उदय झाला हे सर्वज्ञात आहे. आणि एक वर्षापूर्वी चीन बाहेरील देशात पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला. भारतातील पहिला रुग्ण २९ जानेवारीला केरळ मध्ये सापडला जी वुहान मधून परतलेली मेडिकलची विद्यार्थिनी होती. 

आज परिस्थिती अशी झाली आहे की इंग्लंड मध्ये दररोज पंधराशेवर लोक करोनमुळे बळी पडत आहेत. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये रुग्णालयांना युद्धभूमीचं रूप आलं आहे. रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. अमेरिकेत जवळपास अडीच कोटी लोक करोनाबाधित झाले आहेत जे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या ८% तर जागतिक रुग्णसंख्येच्या तब्बल २५% आहे. अमेरिकेत अनेक राज्यातील हॉस्पिटलवर प्रचंड वैद्यकीय भार आहे. कॅलिफोर्निया हे करोनाचे नवीन केंद्र बनले आहे. एकुणात प्रगतीशील अशा पाश्चात्य देशात परिस्थितीवर नियंत्रण अजून दृष्टीक्षेपात नाही आहे. 

आशियाचा विचार केला तर सगळ्यात जास्त त्रास भारताला झाला. त्यामागील कारणे अनेक आहेत. त्या पार्शवभूमीवर आज भारताचा विचार केला तर दररोजची रुग्णसंख्या ही एक लाखांपासून आता दहा हजाराच्या घरात आहे. आणि मुळात एकूण पीडित रुग्णांची संख्या दोन लाखाच्या आत आहे. हे सगळं घडत असताना भारताने लसीकरण प्रकल्पात विस्मयकारी गती पकडली आहेत. भारतातील १३० कोटी लोकांना लशीकरण करायचा मानस असणाऱ्या भारतात पंधरा लाखावर लोकांना लस टोचण्यात आली आहे. जुलै २०२१ पर्यंत भारतातील ३० कोटी लोकांना लस दिली जाईल असा अंदाज आहे. जवळपास २ लाख लोकांना लस देण्याचं प्रशिक्षण आतापर्यंत देण्यात आलं आहे. भारतात जवळपास २९००० शीतकरण सेंटर्स उभारले गेले आहेत जिथं लस स्टोअर करता येतील. 

या पलीकडे जाऊन जगाला आश्चर्य वाटेल अशी मदत भारताने अनेक देशांना केली आहे. मग कुणी त्याला वॅक्सीन डिप्लोमसी म्हणोत वा कुणी राजकारण पाहोत. पण वस्तुस्थिती आहे की भारताने भूतानला दीड लाख, एक लाख कोविशील्ड डोस मालदीव ला, दहा लाख लशी नेपाळला, आणि कहर म्हणजे ज्या बांग्ला देशाने सतत भारताला त्रास दिला तिथे तब्बल वीस लाख डोसेस पाठवले, रोहिंग्यांचा प्रश्न ज्या म्यानमार मुळे उभा झाला तिथे पंधरा लाख लशी, तसेच सेशल्स आणि मॉरिशस ला भारताने लशी पाठवल्या. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि आफ्रिकेतील मोरोक्को मध्ये मेड  इन इंडिया लशी पोहचल्या. यातील काही व्यापारी तत्वावर तर गरीब देशांना मदत म्हणून पाठवल्या गेल्या. श्रीलंका आणि अफगाणिस्तानला काही दिवसात लस पोहोचवली जाईल. जगभरात एक  कोटी लस पाठवण्याचा मानस आहे ज्यायोगे या देशात करोनाविरुद्ध लढणाऱ्या अनेक लोकांना लस देण्यात येईल. 

भारतातील परिस्थिती वर नियंत्रण मिळवताना भारताने इतर देशाला केलेली मदत अद्भुत आहे. सार्क देशाशिवाय इतर अनेक खंडातील देशांना भारताने वॅक्सीन पुरवले आहे. काही देशाचे प्रीमियर भारताला दुवा देत आहेत तर काही लस पुरवण्याचं आवाहन करत आहेत. याची काही कारणं आहेत, एक तर त्यांची किंमत स्वस्त आहे. ३० डॉलर प्रति डोस अमेरिकन कंपनीची किंमत आहेत तर रशियन वा युरोपियन डोस ची किंमत १० डॉलर आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिरम वा भारत बायोटेक लसीची किंमत ६ डॉलर आहे. इतर वेळेस भारतीय फार्मा उत्पदकांच्या नावाने शिमगा करणाऱ्या पाश्चात्य देशांना अचानक भारतातील फार्मा उत्पादन जागतिक दर्जाचं असण्याचा साक्षात्कार झाला आहे. सिरम, भारत बायोटेक, सिप्ला, डॉ रेडीज,  कॅडीला, पॅनिशिया बायोटेक, सिंजेन, इंटास, वोखार्ड या जगासाठी लस उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या आहेत. आजमितीला जगातील एकूण लसींपैकी ५०% लशी भारतात तयार होतात असा अंदाज आहे. या सगळ्यात पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ही या उद्योगातील शिरोमणी आहे हे निःसंशय. वर्षाकाठी दीडशे कोटी विविध लस  बनवणारी ही कंपनी जगात या क्षेत्रात नंबर एकला आहे. 

भारताची ही कोविड डिप्लोमसी मुळे देशाची प्रतिमा उजळणार यात शंका नाही. जगभरातल्या उद्योजकांनी भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. करोनामुळे ज्या बिल गेट्स वर अश्लाघ्य आरोप करण्यात आले ते त्यांनी ट्विट केलं "“It’s great to see India’s leadership in scientific innovation and vaccine manufacturing capability as the world works to end the COVID-19 pandemic.” ज्यांचं वक्तव्य नेहमी वादग्रस्त होतं ते who चे प्रेसिडेंट म्हणाले 'Thank you India and PM Narendra Modi for your continued support to the global COVID-19 response. only if we #ACTogether, including sharing of knowledge, can we stop this virus and save lives and livelihoods." भूतानचे, मालदीवचे, वर्षांपूर्वी ज्याने भारताची खोडी काढली त्या नेपाळचे, बांगला देशाचे, प्रेसिडेंट भारताची स्तुती करताना थकत नाही आहेत. भारताशिवाय जगात पुरेसे वॅक्सीन तयार होणे हे केवळ अशक्यप्राय आहे, हे पीटर पियॉट, जे लंडन स्कुल ऑफ हायजिनचे प्रमुख आहेत,  यांचं वक्तव्य भारताचं काँट्रीब्युशन अधोरेखित करण्यात पुरेसं आहे. 

ज्या देशात या व्हायरस चा जन्म झाला त्या चीनच्या वागण्याच्या पार्श्वभूमीवर भारताचं वागणं हे नक्कीच मानवी मूल्यांचा अंगीकार करणारं आहे यात शंका नाही. जगाला संकटाच्या खाईत लोटून स्वतः नामानिराळे राहण्याचा आणि त्यावर काही देशांना वॅक्सीन पुरवताना आर्थिक गळा घोटण्याचा चीनचा पवित्रा हा भारताच्या पथ्यावर पडला आहे. या सगळ्यांचा परिपाक म्हणून भारतीय उद्योगजगताला न भूतो न भविष्यती अशा संधी उपलब्ध होत आहेत. फार्मा व्यतिरिक्त मशीन टूल, ऑटोमोबाईल, हेवी इंडस्ट्रीज या सगळ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ट्रॅक्टर प्रोडक्शन जोमात चालू आहे. दरवर्षी शेअर मार्केट घोडदौड करू लागलं की  तो बबल आहे, कधीतरी फुटेल अशा वावड्या उठत असतात. यावर्षीही उठल्या. पण ही तेजी भविष्यातील भारताला उत्पादन क्षेत्रातील संधी यास अनुसरून असावी असा एक अंदाज आहे. एक दोन महिने सोडता, पुढील किमान एक वर्ष मार्केट तेजीत राहील असा अंदाज वर्तवण्यात काही धोका नसावा. 

फक्त या करोनाने परत आता डोकं वर काढायला नको...... बास 


(इंटरनेट वरील काही बातम्या तसेच व्हिडीओ वर आधारित)






No comments:

Post a Comment