Wednesday, 14 December 2016

सेल्समन

तसं माझं करिअर एस के एफ मध्ये प्रॉडक्शन इंजिनियर म्हणून चालू झालं. तिथे असताना काहीतरी बिझिनेस करावा असा किडा डोक्यात वळवळू लागला. आणि मी तो पार्टटाइम चालू ही केला. त्याला मदत म्हणून मी १९९४ साली रेसिडेंट इंजिनियर म्हणून सेल्स चा जॉब शोधला. आणि मी खऱ्या अर्थाने सेल्समन झालो.

सेल्समन, ऐकायला कसं वाटतं ना! "नुसते बोलबचन असतात रे" "फेकू असतात" "लाळघोटे असतात" "धंदा मिळवण्यासाठी काय करतील सांगता येत नाही" असे एक ना अनेक पासिंग कॉमेंट्स पास होतात. आज या घडीला माझा मेन डोमेन सेल्स आहे असं सांगितलं की लोकं आदराने बघतात. ते माझ्या सेल्स डोमेन कडे बघून नव्हे तर मॅनेजिंग डायरेक्टर या पदामुळे याची जाणीव आहे मला.  कारण मला माहित आहे, इंडस्ट्री मध्ये किंवा एकुणात सेल्स च्या माणसाला किती टक्के टोणपे खावे लागतात ते. मी ही खाल्ले. कारकिर्दीच्या सुरुवातीला इतके नकार आणि अपमान सहन केले आहेत की काय सांगू तुम्हाला! पण तो एकेक नकार सेल्स च्या माणसाला व्यवसायात स्ट्रॉंग बनवत जातो. नकार पचवणं अवघड असतं आणि म्हणून ह्या जॉबला लोकं कंटाळतात. अन त्यातल्या एम्प्लॉयर ने धंद्याचं प्रोफाइल फालतु ठेवलं असेल तर मग बेकार वांदे. उदा: टेली मार्केटिंग, एम एल एम.

अशा कित्येक कंपन्या आहेत ज्यांचे उंबरठे वर्षानुवर्षे झिजवले. तिथल्या आढ्यताखोर लोकांनी तीन तीन तास केबिनच्या बाहेर बसवून ठेवलं. पण हरलो नाही. बंगलोर मधील अशा एका कंपनीने सातत्याने ३-४ वर्ष अशी ट्रीटमेंट दिली. अन आज गेली सहा वर्षे तीच कंपनी टॉप १० कस्टमरच्या लिस्टमध्ये एक नंबर ला आहे.

जॉब मध्ये असताना पुण्यातल्या एका कंपनीने सकाळी अकराची अपॉइंटमेंट दिली होती. साडेपाच लाखाची ऑर्डर. १९९५ साली ती खूप मोठी ऑर्डर होती, आजही आहे. रात्री साडेआठ वाजता तो एम डी आमच्यासमोर त्याच्या असिस्टंट ला "यांना उद्या सकाळी ९ वाजता बोलाव" असं सांगून तोऱ्यात निघून गेला. दुसऱ्यादिवशी ऑर्डर तर घेतलीच आणि त्यानंतर अशी आमची चटक लावली की  जॉब सोडेपर्यंत त्या कंपनीत मी जायचो तेव्हा पायघड्या टाकायच्या बाकी राहिलं होतं.

आज जवळपास बावीस वर्ष झालीत मी सेल्स मध्ये आहे. दोन रुपयांच्या हायड्रोलीक सील पासून ते सव्वा कोटीच्या आटोमेशन सिस्टम पर्यन्त बरंच काही विकलं. सुदैवाने ज्यांच्या साठी काम केलं ती उत्तम प्रॉडक्टस होती. प्रॉडक्ट ची चांगली क्वालिटी ही पहिली गरज तर आहेच, पण त्याबरोबर कामात कमालीची consistency, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात perseverance, मार्केट बद्दल सजगता, फिरण्याची आवड आणि वर लिहिल्याप्रमाणे येणाऱ्या नकाराने खचून जाता परत दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने दिवसाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवणे हे गुण अंगिकारले तर तुमची तर उन्नती होतेच, पण ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता, ती पण पुढच्या कक्षेत प्रवास करते.

मला स्वतः ला त्यामुळे सेल्स च्या माणसाबद्दल प्रेमादर वाटतो. अगदी सिग्नल वर येणाऱ्या वस्तू विकणाऱ्या लोकांना ही मी हाडतुड करत नाही. टेलिमार्केटिंग वाल्या मंडळींना व्यवस्थित उत्तर देतो. कधीकधी राग आवरत नाही म्हणून चिडतो पण त्यांचा तिरस्कार करत नाही.

तसं बघायला गेलं तर आयुष्यात आपण थोड्या फार फरकाने का होईना, पण प्रत्येकजण सेल्स मन असतो. कोणत्याही नात्यात मग ते प्रोफेशनल रिलेशन असो वा पर्सनल. हो पर्सनल नात्यात ही, एक आई मूल सोडलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्यातले सेल्सचे गुण डिस्प्ले करावे लागतात......मग तुम्ही माना वा न माना. 

No comments:

Post a Comment