ललिता जेम्स चा दुसरा प्रश्न मला होता, तू इतका फिरतोस, आपलं घर च्या मिटिंग करतोस, कधी कविता म्हणतो, खेळतोस, वर फेसबुकवर टाईमपास पण करतोस, मग बिझिनेस कधी करतोस? ही एकतर कॅम्लिमेंट होती किंवा अशी शंका असू शकते की, खरंच तुझं बरं चालू आहे की.....
यावर मी पण विचार केला की हे कसं जमत गेलं. कारण उशिरा येण्याच्या सवयीप्रमाणे इथं सुद्धा आनंदी आनंद होता. समोर येणारं काम करायचं आणि दिवसभर बिझी असल्यासारखं दाखवायचं, ही माझी रेग्युलर प्रॅक्टिस होती. मागच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या एम जी सरांच्या कोर्सनंतर जादू झाली.
साधारण २०१६ च्या नोव्हेंबर मध्ये आमचा व्हिजन बोर्ड तयार झाला. ज्यामध्ये मूळ सिद्धांत, मूळ उद्देश, मिशन स्टेटमेंट आणि एकंदरीत व्यवसाय आणि स्वतः याची होडी कशी हाकायची याच्याबद्दल असणारे समज, गैरसमज दूर होऊ लागले. भविष्याबद्दलचं जे धूसर चित्र आहे ते स्पष्ट होऊ लागलं. त्यांनतर जसे वर्ष जाऊ लागले, त्याबद्दलची भूमिका आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट दिसू लागले. हे एकदा झालं की , येणाऱ्या कामांची प्रायोरिटी ठरवणं सोपं होऊ लागलं. अर्थात हे एका रात्रीत झालं नाही तर त्यावर सातत्याने काम करत गेलो.
सध्या आयुष्यात अगदी स्पेसिफिक गोष्टी करतो आहे. सेटको व्यवसाय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, बाकी बिझिनेस ओनर्स बरोबर डिस्कशन, कॉलेजेस मध्ये जाऊन तरुणाई बरोबर चर्चा, आपलं घर बरोबर अगदी जुजबी काम, स्वतःची तब्येत, फॅमिली आणि मित्रांबरोबर पार्टी वा गेट टुगेदर या सहा गोष्टीभोवती माझं लाईफ विणलेलं आहे.
वरील गोष्टीशिवाय दुसरं काहीही करायचं असेल तर मी चेक करतो की वरीलपैकी काही ऍक्टिव्हिटी त्या दिवशी प्लॅन आहे का? नसेल तरच ती गोष्ट करायचं ठरवतो. अन्यथा नाहीच.
या सगळ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य व्यवसायाला. तिथं माझी गरज असेल तर नंतरच्या चारही गोष्टीला मी दुय्यम स्थान देतो. यात तब्येत हा प्रकार पकडला नाही आहे. तब्येतीच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या कुठल्याच कामाच्या आड येत नाही, अपवाद फक्त सकाळी विमानप्रवास असेल तर. तो असेल तरच माझा व्यायाम होत नाही.
राहता राहिला सोशल मीडियाच्या पोस्ट कधी लिहितो. लिंक्ड इन च्या पोस्ट मी कंपनी वेळेत टाकू शकतो कारण त्याने शक्यतो कंपनीचा ब्रँड पॉप्युलर व्हावा ही अपेक्षा असते आणि मी लिहितो पण त्या अनुषंगाने. फेसबुक वापरण्याच्या वेळ जनरली सकाळी पाच ते साडेपाच, रात्री आठ ते साडेनऊ यापैकी एक, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तसं, आदरवाईज विमानप्रवास.
असो. मोठा निबंध झाला. पण अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर तीन गोष्टी:
- व्हिजन बोर्ड तयार करणे (सगळ्यात अवघड काम)
- कामाची प्रायोरिटी ठरवणे (खूप अवघड काम)
- कामाचं डेलिगेशन करणे. माझ्यापेक्षा जी कामं दुसऱ्याला चांगली येतात, ती मी देऊन टाकली नाही. गंमत म्हणजे दुसऱ्यांपेक्षा मला चांगली जमणारी कामं आता एका बोटावर मोजण्याइतकी उरली आहेत. (अवघड काम)
एकदा ही अवघड कामं जमली की आयुष्य सोपं होऊन जातं.